पुणे – दळणवळण बंदीतील निर्बंध शिथिल झाल्यानंतर तब्बल पावणेदोन महिन्यानंतर शहर आणि उपनगरातील व्यापारी दुकाने उघडली आहेत, मात्र शहरातील मध्यभाग आणि उपनगरातील प्रमुख रस्त्यांवर मलनिस्सारण वाहिन्या टाकण्याचे काम संथ गतीने चालू असल्याने रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे बाजारपेठा उघडल्यानंतर नागरिकांनी खड्ड्यातून वाट काढत खरेदी केली. खोदकामामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून शहरात पाऊस चालू असल्याने रस्ते निसरडे झाले आहेत. ठेकेदारांनी वेगाने काम करून व्यापारी पेठेतील रस्ते मोकळे करावेत. दुकानातील कर्मचारी आणि ग्राहकांना वाहने लावण्यासाठीही जागा उपलब्ध नाही. ग्राहक खरेदीसाठी दुकानात पोहोचणार कसे ? याचा प्रशासनाने विचार करणे आवश्यक आहे, असे मत पुणे व्यापारी महासंघाचे सचिव महेंद्र पितळीया यांनी व्यक्त केले.