विषाणूला वेशीवरच रोखणार्या या सर्वच गावांतील ग्रामस्थांच्या प्रयत्नांचे कौतुकच करायला हवे !
नागपूर – जिल्ह्यातील १ सहस्र ६०५ गावांपैकी ५९ गावांनी कोरोना विषाणूला गावात प्रवेश करू दिला नाही. या गावांमध्ये मार्च २०२० पासून एकाही नागरिकाला कोरोनाचा संसर्ग झालेला नाही. गावकर्यांच्या सामूहिक प्रयत्नांतून केलेल्या उपक्रमामुळे या गावांत कोरोना पोचू शकला नाही, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
ते पुढे म्हणाले की, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रभावी आणि परिणामकारक उपाययोजना राबवल्या. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या मर्यादित राहिली. रुग्णसंख्या अल्प झाली असली, तरी कोरोना झाल्यानंतर बरे झालेल्या रुग्णांमध्ये ‘काळ्या बुरशी’सारखे आजार निदर्शनास येत आहेत. जनतेने अशा आजारांविषयी तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा ग्रामीण रुग्णालय येथे जाऊन तपासणी करावी.