त्यागी वृत्ती आणि अहंचा लवलेशही नसलेले श्री. सोहम् सिंगबाळ !

कु. अमृता मुद्गल

१. शांत आणि समाधानी वृत्ती

‘सोहमदादाचा स्वभाव शांत, समंजस, प्रेमळ आणि समाधानी आहे. त्याला सर्वांप्रती आदर आहे.

२. व्यवस्थितपणा

तो छोटी छोटी कृतीही व्यवस्थित, परिपूर्ण आणि भावपूर्ण करतो. त्यामुळे त्याने केलेल्या कृतीतून चांगली स्पंदने येतात.

३. स्वीकारण्याची वृत्ती

त्याला रात्री उशिरा झोप लागते, तरी या संदर्भात त्याचा कधीही संघर्ष होत नाही. त्याविषयीचा त्रास तो कधीच कुणाला सांगत नाही. त्या वेळी मला वाटते की, त्याने हे किती सहजतेने स्वीकारले आहे.

४. त्यागी वृत्ती

‘त्याच्या जीवनातील त्याग हा मोठा गुण आहे’, असे वाटते; कारण श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आधी रात्री उशिरा घरी जायच्या, तरी तो कधीच काही म्हणायचा नाही. ‘आईने आपल्याला वेळ द्यावा’, असे त्याला वाटत नाही. तो स्वतःचे सर्व स्वतःच करायचा. पू. नीलेश सिंगबाळ (सोहमचे वडील) प्रसाराच्या निमित्ताने बाहेर असतात. तेही त्याला विशेष भेटत नाहीत, तरी तो कधीच काही म्हणत नाही. तो नेहमी आनंदात असतो.

५. साधकत्व

एकदा रात्री मी त्याला जेवण द्यायला गेले होते. त्या वेळी त्याने मला विचारले, ‘‘तुम्ही जेवलात का ?’’ मी म्हणाले, ‘‘नाही. मी जेवण न करण्याचे प्रायश्चित घेतले आहे.’’ त्या वेळी तो म्हणाला, ‘‘विचारून घेतले ना, विचारण्यात साधना आहे, फलकावर सूचना लिहिली होती की, प्रायश्चित विचारून घ्या. असे करू नका.’’ यातून त्याच्यातील साधकत्व, विचारून शिकणे आणि प्रेमळपणा हे गुण माझ्या लक्षात आले.

६. अहंभाव नसणे

सोहमदादामध्ये अहं जाणवत नाही; कारण त्याची कृती, वागणे, बोलणे सर्व काही छान आणि स्थिरतेने असते. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ त्याच्या आई आहेत. ‘स्वतःची आई देवी-सद्गुरु आहे’, याचा त्याला अहं नाही. कधी कोणत्या साधकाने श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना काही दिले, तर तो कधीच घेत नाही. तो आश्रमातील सर्वांसाठीचे जे केलेले असते, तेच जेवतो. तो नेहमी कृतज्ञताभावात असतो.

७. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याविषयीचा भाव

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्याविषयी त्याला आदर आणि प्रेम आहे. त्या त्याला जे काही सांगतात, ते तो लगेच ऐकतो आणि त्याप्रमाणे कृतीही करतो. तो दिवसभरात त्यांना जे साहाय्य लागते, ते करतो. समन्वयाचे निरोप देणे, सत्संगाची जोडणी करणे, काही घरची कामे इत्यादी तो झोकून देऊन पूर्ण करतो.

८. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले कौतुक

मागे एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले म्हणाले होते, ‘‘याची साधना चांगली चालू आहे. प्रगती होईल.’’

– कु. अमृता मुद्गल (वय १८ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.५.२०२१)