हिंदु जनजागृती समितीचे पूर्व आणि पूर्वाेत्तर भारत मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे सुपुत्र श्री. सोहम् सिंगबाळ यांचा वैशाख कृष्ण पक्ष अष्टमी (२.६.२०२१) या दिवशी वाढदिवस आहे. श्री. सोहम् रामनाथी आश्रमात सेवा करतात. पू. नीलेश सिंगबाळ यांना श्री. सोहम् विषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
श्री. सोहम् सिंगबाळ यांना सनातन परिवाराकडून वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !
१. साधी रहाणी
‘लहानपणापासून सोहमची रहाणी साधी आहे. त्याला ‘स्वतःकडे चांगले कपडे असावेत किंवा नवीन कपडे घ्यावेत’, असे कधी वाटले नाही. तो विचार करून कपडे विकत घेतो. तो घरी वापरत असलेले कपडे अनेक वर्षे सांभाळून वापरत आहे.
२. मृदुभाषी आणि इतरांचा आदर करणारा
तो बालपणापासून मृदु भाषेत, इतरांचा आदर राखून आणि स्वतःकडे न्यूनता घेऊन बोलतो. त्याने ‘कुठल्याही प्रसंगात कधी इतरांना उलट उत्तरे देणे किंवा अपमानकारक बोलणे केले’, असे जाणवले नाही.
३. अनासक्त
सोहम् लहानपणापासून त्यागी वृत्तीचा आणि अनासक्त आहे. श्री गणेशचतुर्थीला आमच्या कुटुंबातील सर्वजण मूळ गावी एकत्र येतात. तेव्हा परिवारातील मुले वेगवेगळे महाग फटाके घेऊन यायचे; मात्र सोहमला लहान असतांनाही अशा गोष्टींची ओढ नव्हती.
४. काटकसरी
वार्षिक जत्रोत्सवात आम्ही खेळणी विकणार्या दुकानात जायचो. तिथे तो खेळण्यांचे मूल्य विचारून महाग खेळणी घेणे टाळायचा. त्याला शाळेत जातांना थोडे पैसे खिशात ठेवायला दिल्यास तो ते घरीच ठेवून जायचा आणि कधी लागले, तर आवश्यक तेवढेच पैसे घेऊन जायचा. त्याला एक भ्रमणभाष घ्यायचा विचार आल्यावर ‘छायाचित्रक (‘कॅमेरा’) नसलेला घेऊ’, असे सांगितल्यावर त्याने तसा भ्रमणभाष घेतला. सोहमने हा भ्रमणभाष ५ – ६ वर्षे अत्यंत काळजीपूर्वक वापरला. तो पावसाळ्यात भ्रमणभाष प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून ठेवायचा.
५. वैचारिक प्रगल्भता
सोहम् लहान असतांना आम्ही प्रसारासाठी सकाळी गेल्यावर संध्याकाळी उशिरा किंवा रात्री घरी पोचायचो; पण सोहमने ‘त्याला वेळ द्यावा किंवा आम्ही त्याच्या समवेत खेळावे’, अशी कधी अपेक्षा किंवा हट्ट केला नाही. त्यानंतर वर्ष २००४ मध्ये मी उत्तर भारतात प्रसारासाठी गेलो आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ रामनाथी आश्रमात सेवेसाठी जायच्या. तेव्हा त्याने हट्ट करणे दूरच; पण दूरभाषवर बोलतांनाही ‘मी पुन्हा गोव्यात यावे किंवा त्याला वेळ द्यावा’, असा विचार कधी व्यक्त केला नाही. त्याला लहान वयातच साधनेचे महत्त्व समजले होते. मी गोव्यात आल्यावर तो आनंदात असायचा आणि माझा परतीचा दिवस जवळ आल्यावर तो मनावर संयम ठेवून रहायचा. मला त्रास होऊ नये; म्हणून तो रडणे टाळायचा आणि जातांना नेहमी मला ‘साधना चांगली होऊ दे’, असे सांगायचा. तो लहान वयातही प्रगल्भ होता. ‘त्याची ही प्रगल्भता सतत टिकून रहाणे आणि उत्तरोत्तर ती वाढणे’, ही त्याच्यावर असलेली गुरुकृपाच आहे.
५ आ. वडिलांना त्रास झाला; म्हणून वाईट वाटून रडणे : एकदा तो शाळेत जात असतांना मी त्याला ‘शाळा सुटल्यावर घ्यायला येईन’, असे सांगितले होते. मी शाळेत गेल्यावर मला तो कुठेच दिसला नाही. त्याच दिवसात मुलांचे अपहरण होण्याचे काही प्रसंग गोव्यात घडले होते; म्हणून मला ताण आला. परतीच्या वाटेत सोहम् त्याच्या एका मित्रासह चालत घरी जात असल्याचे मला दिसले. मी घरी आल्यावर त्याला रागावलो आणि ‘मला किती शोधावे लागले’, याविषयी सांगितले. त्यानंतर त्याला पुष्कळ रडू आले. मला वाटले, ‘मी त्याच्यावर रागावलो; म्हणून तो रडला.’ मी त्याची समजूत घातल्यावर तो मला म्हणाला, ‘‘तुम्ही रागावल्यामुळे मी रडलो नाही. माझ्यामुळे तुम्हाला किती त्रास सहन करावा लागला’, हे समजल्यावर मला पुष्कळ वाईट वाटले आणि मला रडू आले. मी यापुढे असे कधीच करणार नाही.’’ त्याचे हे बोलणे ऐकून मला त्याच्यामध्ये इतक्या लहानपणी असलेली वैचारिक प्रगल्भता जाणवली.
६. परिपूर्णता आणि कुशलता
घरी एखादी वस्तू घ्यावी लागली किंवा काही दुरुस्तीचे काम असले, तर सोहम् त्याचा बारकाईने अभ्यास करतो. ‘मोजमाप घेऊन जागेचा अभ्यास करणे, तसेच वस्तूंच्या गुणवत्तेचा आणि किमतीचा अभ्यास करणे, ‘आवश्यक आणि अनावश्यक काय आहे ?’, हे पाहून तेच काम परिपूर्ण होईल, असे पहाणे’, हे त्याचे गुण आहेत. हे सर्व करतांना त्याच्यातील ‘निरीक्षणक्षमता, कला, काटकसरीने आणि विचारपूर्वक कृती करणे, विचारून करणे आणि इतरांचा विचार असणे’, हे गुण माझ्या लक्षात आले.
७. समंजस
घरी मनाविरुद्ध काही प्रसंग घडल्यास सोहम् ती परिस्थिती शांतपणे सांभाळून घेत असे आणि रात्री आई घरी आल्यावर तो आत्मनिवेदन करत असे. वर्षातून एकदा मी घरी आल्यावर एक मास अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन आणि शिबिरे यात माझा सहभाग असल्याने सोहमला तसा वेळ देणे मला शक्य होत नाही. काही दिवसांनी मला वाराणसीला परत जायचे असते. अशा वेळीही तो प्रत्येक वेळी सांभाळून घेतो आणि आहे त्यात समाधानी अन् आनंदी रहाण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळी ‘बाबांनी मला वेळ द्यावा’, असा विचार न करता ‘उपलब्ध वेळेत मी इतरांना कसा आनंद देऊ शकतो ?’, यासाठी त्याचे प्रयत्न असतात.
८. आवड-नावड नसणे
सोहम्ला लहान असल्यापासून वस्तू किंवा जेवणा-खाण्याच्या विशेष आवडी-निवडी नाहीत. तो घरी बनवलेले पदार्थच खातो. त्याला साधेच जेवण आवडते. त्याला बाहेरची काही निवडक प्रकारची साधी बिस्किटे आणि मिंटच्या गोळ्या आवडतात.
९. त्यागी वृत्ती
आमची (माझी आणि त्याची आई (श्रीचित्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची) साधना व्हावी, तसेच साधनेत अनुकूलता असावी, यात सोहमचा मोठा त्याग आहे.
१०. इतरांची काळजी घेणे आणि इतरांचा विचार करणे
१० अ. वडिलांना कमरेचा त्रास होत असल्याने सोहमने चारचाकी काळजीपूर्वक चालवणे : वर्ष २०१५ मध्ये मला आजारपणामुळे ५ मास गोव्यात रहावे लागले होते. माझा कमरेचा त्रास वाढल्याने माझ्यावर काही शारीरिक बंधने आली होती. त्या वेळी चारचाकी चालवतांना मला त्रास होऊ नये; म्हणून सोहम् स्वतः चारचाकी चालवायला शिकला. रात्री आश्रमातून घरी जातांना अत्यंत काळजीपूर्वक चारचाकी चालवायचा.
१० आ. घरातील व्यक्तींशी आणि साधकांशी प्रेमाने वागणे : त्याला घरातील आजी आणि कलाताई यांच्याविषयी आदर अन् प्रेम आहे. त्यांना त्रास होऊ नये, यासाठी तो त्यांना सांभाळून घेतो आणि त्यांच्याविषयी मनात कृतज्ञताभाव ठेवतो. घरी त्याचे बोलणे आणि वागणे प्रेमपूर्वक असते. तो माझ्याशी भ्रमणभाषवरून बोलतांना वाराणसी सेवाकेंद्रातील साधकांची आवर्जून विचारपूस करतो.
११. ‘स्वत:कडून सेवा होत नाही आणि परात्पर गुरु डॉक्टरांना अपेक्षित असे साधनेचे प्रयत्न होत नाहीत’, याविषयी त्याला खंत असते.
१२. भाव
१२ अ. आश्रमाप्रती भाव : सोहमला आध्यात्मिक त्रास असल्याने ‘झोप न येणे, सकाळी झोप लागणे, थकवा येणे’, असे नित्य होत असल्याने दिनचर्या सांभाळून घरून आश्रमात जाण्यासाठी त्याला उशीर होतो; पण कितीही उशीर झाला, तरी एखादा अपवाद सोडल्यास तो आश्रमात नियमितपणे जातो आणि नामजपादी उपाय करतो. ‘मी काही वेळ आश्रमात जाऊन आलो, तरी मला पुष्कळ चैतन्य मिळते. मला आध्यात्मिक लाभ होतो’, असेही तो सांगतो. यावरून त्याचा आश्रमाप्रतीचा भाव लक्षात येतो.
१२ आ. परात्पर गुरु डॉक्टरांप्रती भाव : आम्ही दोघेही घरी नसतो आणि आम्ही सोहमला पुरेसा वेळ देऊ शकत नाही. असे असले, तरी परात्पर गुरु डॉक्टरांनी त्याला घडवले. कधी त्याचे कौतुक केले, तरी तो लहान असल्यापासून म्हणायचा, ‘‘डॉक्टरबाबांमुळे (परात्पर गुरु डॉक्टर यांच्यामुळे) मी घडलो.’’ ‘लहान असतांना असा भाव असणे’, याचे मला आश्चर्य वाटायचे.’
– (पू.) श्री. नीलेश सिंगबाळ (वडील), वाराणसी (३१.८.२०२०)
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ संत होण्याच्या संदर्भात त्यांचा मुलगा कु. सोहम् याला जाणवलेली सूत्रे१. सोहळ्यात ठेवलेले सौ. बिंदाताईंचे छायाचित्र पाहून वात्सल्यभाव जाणवून ‘ते जिवंत आहे’, असे वाटणे सोहळ्याच्या ठिकाणी आईचे (श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे) एक छायाचित्र ठेवले होते. ते बघून पुष्कळ वात्सल्यभाव जाणवला आणि वाटले की, ते छायाचित्र जिवंतच आहे. ‘त्या छायाचित्रातील आई कोणत्याही क्षणी बोलायला आरंभ करणार’, असे वाटले. नंतर प.पू. डॉक्टरांची भेट होती. तेव्हा आईच्या तोंडवळ्यावर एवढा शरणागत आणि कृतज्ञता भाव अनुभवला, जो शब्दांत मांडणे अशक्यच आहे. २. आई सतत आनंदी असणे गेल्या महिनाभरात माझ्या मनात ‘आई एवढा वेळ सेवा करते, तिच्यात इतके गुण आहेत, तर ती अजून संत कशी झाली नाही ?’, असा विचार येत होता. आज आई संत घोषित होत असतांना पुष्कळ आनंद होत होता. काही वर्षांपूर्वी आईच्या मुखावर त्रास जाणवायचे, आता ती सतत आनंदी असते. (‘वयाने लहान असलेल्या कु. सोहम्चा संत झालेल्या आईविषयीचा भाव, तसेच त्याची निरीक्षणक्षमताही वाखाणण्याजोगी आहे.’ – संकलक) – कु. सोहम् सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्येष्ठ शुक्ल पक्ष चतुर्थी, कलियुग वर्ष ५११५ (१२.६.२०१३)) |
|