ऑनलाईन सत्संगाची ‘पोस्ट’ बनवण्याची सेवा करतांना रामनाथी आश्रमातील साधक श्री. निखिल पात्रीकर यांचे लाभलेले साहाय्य आणि जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये

संकेतस्थळांशी संबंधित सेवा करणारे रामनाथी आश्रमातील साधक श्री. निखिल पात्रीकर यांचा १७.५.२०२१ या दिवशी वाढदिवस झाला. त्या निमित्ताने सोलापूर येथील साधिका कु. श्रेया गुब्याड हिच्या लक्षात आलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

श्री. निखिल पात्रीकर

१. लहान बहिणीप्रमाणे काळजी घेणे

‘माझी आणि निखिलदादाची ओळख कोरोनामुळे झालेल्या दळणवळण बंदीच्या काळात ‘ऑनलाईन’ सेवेनिमित्त झाली. आम्ही प्रत्यक्षात कधी भेटलो नाही, तरीही दादा अगदी लहान बहिणीप्रमाणे माझी काळजी घेतो.

२. साधकांचे कौतुक करून सेवेसाठी प्रोत्साहन देणे

कु. श्रेया गुब्याड

आरंभी मी केवळ ऑनलाईन सत्संगाची ‘पोस्ट’ बनवण्याची सेवा करत होते. त्या सेवेत मी थोडे जरी नाविन्यपूर्ण प्रयत्न केले, तरी दादा मला प्रोत्साहन द्यायचा. हळूहळू दादाने ‘पोस्ट’चे पूर्ण दायित्वच मला दिले. यावरून ‘दादा साधकांचे कौतुक करून सेवेसाठी प्रोत्साहन देतो’, हे माझ्या लक्षात आले.

३. आरंभी साधिकेकडून एकच चूक पुनःपुन्हा होऊनही तिला शांतपणे समजून घेऊन सेवेत साहाय्य करणे

‘इमेज पोस्ट’ बनवण्याची सेवा करत असतांना ‘पोस्ट’ बनवून मी ती दादाला पडताळण्यासाठी पाठवते. आरंभी माझ्याकडून अनेक वेळा एकच चूक व्हायची; परंतु दादा नेहमी मला समजून घेऊन आणि शांत राहून ‘पोस्ट’मधील सुधारणा सांगायचा. माझ्याकडून एखादी मोठी चूक झाली, तरी दादा मला सांभाळून घेऊन ‘देवाला काय अपेक्षित आहे’, ते सांगतो. सेवेसाठी दादाचे मला पुष्कळ साहाय्य होते.

४. साधिकेला तिच्या मनातील न्यूनगंडाच्या भावनेची जाणीव करून देणे आणि त्यावर प्रयत्न करण्यासाठी दिशाही देणे

नामजप सत्संगाचे १५० भाग पूर्ण झाल्यानंतर दादाने त्याची एक ‘पोस्ट’ बनवण्याच्या संदर्भात मला विचारले होते. त्या वेळी मी ‘मला जमणार नाही’, असे दादाला कळवले. नंतर दादाशी बोलल्यावर त्याने मला माझ्या न्यूनगंडाची जाणीव करून दिली आणि म्हणाला, ‘‘न्यूनगंड बाळगण्यापेक्षा इतरांकडून शिकण्याच्या स्थितीत राहिलो, तर अधिक लाभ होतो. माझ्यामध्येही न्यूनगंड आहे आणि मी त्यावर प्रयत्न करत आहे.’’ या वेळी दादाचा ‘स्वतःकडे कमीपणा घेणे’, हा भाग मला शिकायला मिळाला.

५. निखिलदादाशी बोलल्यानंतर त्रासाचे प्रमाण उणावणे

एकदा रात्री माझे डोके पुष्कळ दुखत होते आणि मला झोप लागत नव्हती. तेव्हा एका सूत्राच्या संदर्भात माझे दादाशी बोलणे झाले आणि माझी डोकेदुखी लगेच थांबली. ‘मला काही त्रास होत असतांना मी दादाशी बोलले की, माझ्या त्रासाचे प्रमाण पुष्कळ न्यून होते’, असे मी अनेकदा अनुभवले आहे.

६. कर्तेपणा नसणे

दादाची परात्पर गुरु डॉक्टरांवर पुष्कळ श्रद्धा आहे. त्याच्यामध्ये कर्तेपणा जाणवत नाही. एकदा मी दादाला म्हणाले, ‘‘तुझ्यासारखी सेवा करणे मला जमत नाही.’’ तेव्हा तो म्हणाला, ‘‘परात्पर गुरु डॉक्टरच सर्व सेवा करवून घेतात.’’

परात्पर गुरु डॉक्टरांनी सेवेसाठी मला निखिलदादासारख्या साधकाला जोडून दिले आणि त्याच्याकडून शिकण्याची संधी दिली, यासाठी मी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’

केवळ गुरुदेवांची, – कु. श्रेया गुब्याड, सोलापूर (१५.५.२०२१)

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक