मालवण – ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग किल्ल्यात काही ठिकाणी पडझड झाली आहे. किल्ल्यातील शिवराजेश्वर मंदिरावरही झाड कोसळले असून मंदिराच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद यांच्या वतीने प्रयत्न चालू आहेत; मात्र कुठेही निधीची कमतरता भासल्यास विशेष गोष्ट म्हणून रायगड किल्ला प्राधिकरणाचा निधी सिंधुदुर्ग किल्ल्यासाठी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी येथे दिली.
तौक्ते चक्रीवादळाचा फटका सिंधुदुर्ग किल्ल्याला मोठ्या प्रमाणात बसला आहे. या पार्श्वभूमीवर खासदार छत्रपती संभाजी राजे ३१ मे या दिवशी मालवण येथे आले होते. सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाऊन ते परिस्थितीची पहाणी करणार होते; मात्र सध्या समुद्र खवळलेला असल्याने जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी किल्ल्यावर न जाण्याची विनंती केल्याने त्यांनी किल्ल्यावर न जाता बंदर जेटीवरूनच छत्रपती शिवाजी महाराजांना दंडवत घातला.
छत्रपती संभाजी राजे यांनी पदाच्या त्यागपत्राचे वृत्त फेटाळले
सध्या महाराष्ट्रात आरक्षण मिळण्यावरून मराठा समाजामध्ये अप्रसन्नता आहे. यातच आरक्षण मिळण्यासाठी प्रसंगी छत्रपती संभाजी राजे पदाचे त्यागपत्र देणार असल्याचे वृत्त प्रसारित झाले होते. हे वृत्त फेटाळून लावतांना छत्रपती संभाजी राजे म्हणाले, ‘‘मी त्यागपत्र दिल्याने मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही आणि जर मी त्यागपत्र देऊन आरक्षण मिळणार असेल, तर नक्कीच त्यागपत्र देईन. मराठा आरक्षणावर मी माझी भूमिका यापूर्वीच स्पष्ट केली आहे.’’
बीड येथे होणार्या आरक्षण मोर्च्याला अधिकाधिक मराठा बांधव जाणार
कुडाळ – मराठा आरक्षणावर सध्या राज्यात सर्वत्र चर्चा चालू आहे, तसेच मराठा समाज आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहे. ५ जूनला बीड येथे मराठा समाजाकडून मोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर ३० मे या दिवशी शिवसंग्राम संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांच्या निवासस्थानी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची बैठक पार पडली. या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अधिकाधिक मराठा बांधव बीड येथील मोर्चाला जाण्याविषयी नियोजन करण्यात आले.