१. जन्मापूर्वी
१ अ. गर्भारपणाच्या कालावधीत त्रास होत असल्याने आधुनिक वैद्यांनी गर्भपात करायला सांगणे; पण साधिकेच्या आईने गर्भपात करू न देणे : ‘चि. दीपच्या वेळी गरोदर असतांना मला पुष्कळ त्रास होत होता. मला सलग ९ मास प्रतिदिन ३ – ४ वेळा उलट्या व्हायच्या. मला मूतखड्यांचा त्रासही होत होता. गर्भाची वाढ होत असतांना माझ्या मूत्रपिंडावर अधिक दाब पडून मला पुष्कळ त्रास व्हायचा. आधुनिक वैद्यांनी मला गर्भपात करायला सांगितला. मला त्रास होत असल्यानेे माझे यजमान आणि सासूबाई यांनी त्याला सहमती दिली; पण माझ्या आईला ‘मी गर्भपात करावा’, असे वाटत नव्हते.
१ आ. ९ मास त्रास होऊनही नैसर्गिक प्रसुती होणे : माझी आई सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करत होती. त्यामुळे मला साधना ठाऊक होती; पण मी कृती करत नव्हते. आईची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर श्रद्धा असल्याने तिने मला गर्भपात करू दिला नाही. गर्भारपणाच्या ६ व्या मासात ग्रहण असल्याने मला रात्रभर जागे रहावे लागणार होते. तेव्हा आईने परात्पर गुरु डॉक्टरांच्या आवाजातील ‘शंकानिरसन’ या विषयावरील ध्वनीचकती लावून ठेवली आणि मला ऐकायला सांगितली. ९ मास त्रास होऊनही माझी नैसर्गिक प्रसुती झाली. ७.५.२००१ या बुद्धपौर्णिमेच्या दिवशी दीपचा जन्म झाला.
२. जन्मानंतर
२ अ. समंजस
२ अ १. अवघ्या २ वर्षांच्या दीपने सत्संगात शांतपणे बसणे आणि बाहेरगावी रहावे लागल्याने शाळेत जाता न आल्याविषयी गार्हाणे न करणे : वर्ष २००३ मध्ये मी साधनेला आरंभ केला. त्या वेळी दीप २ वर्षांचा असूनही सत्संगात शांत रहायचा. वर्ष २००५ पासून मी आणि दीपचे बाबा सेवा करू लागलो. तेव्हा दीप लहान असूनही जेथेे आम्ही प्रसारासाठी जायचोे, तेथेे येण्यास तो सिद्ध असायचा. वर्ष २००७ पासून हिंदु राष्ट्र-जागृती सभा चालू झाल्या. तेव्हा आम्ही सेवेसाठी बाहेरगावी मुक्कामी जात असू. त्या वेळी दीप पुष्कळ वेळा शाळेत जाऊ शकायचा नाही; पण त्याने कधीच गार्हाणे केले नाही.
२ अ २. शाळेतून आणायला उशीर झाला असतांना दीपने शाळेच्या आवारात झाडाखाली बसून अभ्यास करणे : एकदा दीपला शाळेतून आणायला आम्हाला १ घंटा उशीर झाला. त्याचे वडील त्याला आणायला गेले असतांना त्यांना ‘दीप शाळेच्या आवारातील एका झाडाखाली बसून अभ्यास करत आहे’, असे दिसले. कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त न करता तो वडिलांना म्हणाला, ‘‘माझा घरचा अभ्यास पूर्ण झाला.’’
२ अ ३. आई-वडिलांच्या सेवेतील व्यस्ततेमुळे दीपला शाळेतील स्नेहसंमेेलनाच्या कार्यक्रमात सहभागी होता न येणे आणि त्याविषयी त्याने कोणतेच गार्हाणे न करणे : एकदा मी सेवेसाठी बाहेरगावी गेले होते. त्या वेळी दीपच्या शाळेत स्नेहसंमेलन होते. दीपने एका कार्यक्रमात भाग घेतला होता. त्या वेळी त्याचे वडीलही सेवेत व्यस्त होते. त्यामुळे त्यांना दीपला शाळेत पोचवायला उशीर झाला. दीपने ज्या कार्यक्रमात भाग घेतला होता, तो कार्यक्रम दीप शाळेत पोचण्यापूर्वीच संपला होता, तरीही त्याने काहीच गार्हाणे केले नाही.
२ अ ४. आई-वडील सेवेसाठी बाहेर गेल्यावर तक्रार न करता अभ्यास करणे : आम्हाला सेवा झाल्यावर घरी जायला उशीर व्हायचा. तेव्हा दीप शाळेतून घरी येऊन खेळत असे; पण ‘तुम्ही उशीर का केला ?’, अशी तक्रार त्याने कधीच केली नाही. मला त्याचा अभ्यास कधीच घ्यावा लागला नाही. तो लक्षपूर्वक स्वतःच अभ्यास पूर्ण करायचा. शाळेतील कोणत्याच शिक्षकांनी त्याच्याविषयी कधी गार्हाणे केले नाही.
२ अ ५. आईला त्रास होत असतांना स्वयंपाक बनवण्यात अडचणी येऊनही दीपने त्याविषयी गार्हाणे न करणे : दीप तिसर्या आणि चौथ्या इयत्तेत शिकत असतांना मला तीव्र शारीरिक अन् आध्यात्मिक त्रास होत होतेे. तेव्हा यजमान सेवेनिमित्त पुष्कळ वेळा बाहेरगावी जायचे. त्या वेळी मी स्वयंपाकही करू शकत नव्हते. एकदा मी सकाळपासून काही खाल्ले नव्हते; म्हणून त्याने दुपारी माझ्यासाठी चहा बनवला. मला त्रास होऊ लागला की, त्याला पुष्कळ वाईट वाटायचे. त्याने जेवणाविषयी कधीच गार्हाणे केले नाही.
२ आ. इतरांना साहाय्य करणे
२ आ १. आई सेवेसाठी सोलापूर येथे राहिल्यावर दीपने मिरज आश्रमात रहाणे : दीप इयत्ता ५ वीत असतांना मला सेवेसाठी सोलापूर येथे रहावे लागायचे. मला तिकडे जाण्यात अडचण नको; म्हणून तो पाचव्या इयत्तेत शिकत असतांना १ वर्ष मिरज आश्रमात राहिला. तेव्हाही त्याने आम्हाला साधनेसाठी साहाय्य केले.
२ आ २. दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांच्या वेळी ‘आईने घरी थांबावे’, असा हट्ट न करता स्वतःचा अभ्यास करणे : दीप दहावी आणि बारावी इयत्तेत शिकत असतांना त्याच्या बोर्डाच्या अंतिम परीक्षेच्या वेळी जिल्ह्यात हिंदु राष्ट्र-जागृती सभा होत्या. तेव्हा मी निवासासाठी बाहेर जायचे. त्या वेळी त्याने ‘मी घरी थांबावे’, असा कधी आग्रह केला नाही. त्या वेळी ‘चांगले शिक्षण घ्यावे आणि नोकरी करावी’, हाच त्याचा उद्देश होता.
३. साधना
३ अ. दीपने साधकांना सेवेत साहाय्य करणे : दीपला सुटी असतांना तो साधकांना प्रसारसाहित्य पोचवणे, बस स्थानकावरून ‘सनातन प्रभात’चे अंक आणणे, आवश्यकता भासल्यास अंक वितरण करणे, अशा सेवा करायचा. त्याने १२ वीनंतर पुणे येथील ‘मॉडर्न कॉलेज’ येथे ‘बी.बी.ए.’च्या पहिल्या वर्षाचे शिक्षण घेतले. त्या वेळी वार्षिक परीक्षेतील १ पेपर झाला. नंतर कोरोनामुळे त्याचे महाविद्यालय बंद झाल्याने तो घरी आला.
३ आ. युवा साधक शिबिरानंतर व्यष्टी साधनेचे चिकाटीने आणि भावपूर्ण प्रयत्न करणे : नंतर जिल्ह्यात युवा साधक शिबिर झाले आणि व्यष्टी साधनेचे आढावे घेणे चालू झाले. दीपने साधनेसाठी चिकाटीने प्रयत्न चालू केले. नामजप पूर्ण झाल्याविना तो रात्री झोपत नसे. ‘भजने ऐकत भावजागृतीचे प्रयत्न करत आवरण काढणे आणि नियमित सारणी लिखाण करणे’, असे प्रयत्न करू लागला. त्याच्या मनात आढावा सेवकांप्रती पुष्कळ भाव असायचा. नंतर दीप वाचक आणि धर्मप्रेमी यांना संगणकीय प्रणाली शिकवणे अन् धर्मशिक्षणवर्गाच्या वेळी जोडणी करणे, या सेवा करू लागला.
३ इ. आपत्काळाची तीव्रता पाहून दीपने पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेणे आणि मित्र अन् नातेवाईक यांना सोडून आश्रमात जातांना होणार्या मनाच्या संघर्षावर मात करणे : आमची पूर्णवेळ साधना करण्याची सिद्धता होती; पण दीपला शिक्षण घ्यायचे असल्यास आम्हाला नोकरी करावी लागणार होती. आम्हाला पूर्णवेळ साधना करता यावी आणि एकूणच आपत्काळाची तीव्रता पहाता त्याने पूर्णवेळ साधना करण्याची सिद्धता दर्शवली. साधनेसाठी आम्ही (मी, यजमान आणि दीप) रामनाथी आश्रमात आलो. मित्र आणि नातेवाईक यांना सोडून जायचे असल्याने त्याला वाईट वाटत होते; पण त्याने त्यावर मात केली. आश्रमात आल्यापासून तो आनंदाने स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवत आहे. त्याने स्वतःमध्ये गतीने पालट करण्यास प्रयत्न केले.
दीपमध्ये इतरांना समजून घेणे, सकारात्मकता, प्रेमभाव हे गुण आहेत. त्याच्यात अहं अल्प असल्याने तो लहान मुलांशी लगेच जवळीक साधतो.
४. स्वभावदोष
आळस, अव्यवस्थितपणा आणि उद्धटपणा.’
– सौ. शुभांगी पाटणे (दीपची आई), सांगोला, सोलापूर. (११.११.२०२०)
दीप, आहेस तू पाटणे घराण्याचा कुलदीपक ।कु. दीप पाटणे याचा २६.५.२०२१ या दिवशी तिथीनुसार वाढदिवस झाला. त्या निमित्ताने त्याच्या वडिलांनी त्याच्यावर केलेले काव्य पुढे दिले आहे. दीप, आहेस तू पाटणे घराण्याचा कुलदीपक । आम्ही जन्म दिला, या नात्याने आहोत तुझे पालक । आम्हाला वाटे की, आम्हीच तुला देत आहोत संस्कार । मायेतील सर्व सुखांचा एका क्षणात करूनी त्याग । लहानपणापासूनच तू गुरुचरणांशी रहावा । आम्हा वाटे आम्हीच आहोत त्याची सावली । तुझ्या लहानपणापासूनच आई-वडिलांच्या सेवेसाठी झाली तुझी अडचण । हट्ट कधी केला नाहीस तू परिस्थिती सोडून । आठवण आम्हाला येते तुझी अधूनमधून । साजरा होत आहे तुझा वाढदिवस आश्रमात प्रथमच । कंठ दाटून येतो या आनंद सोहळ्याक्षणी । – श्री. संतोष पाटणेगुरुजी (वडील), सांगोला, जिल्हा सोलापूर. (२४.५.२०२१) |
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. |