आपत्काळातील संजीवनी औषधी वनस्पती !
संत-महात्मे यांच्या सांगण्यानुसार भीषण आपत्काळ चालू आहे. या काळात डॉक्टर, वैद्य, पेठेतील (बाजारातील) औषधे इत्यादी उपलब्ध होणार नाहीत. आपत्काळात स्वतःसह कुटुंबियांच्याही आरोग्याचे रक्षण करणे, हे मोठे आव्हानच असते. अशा वेळी आपण लागवड केलेल्या औषधी वनस्पतीच उपयोगी पडतील; म्हणून आतापासूनच आपण त्यांच्या लागवडीकडे लक्ष द्यायला हवे. या लेखामध्ये औषधी वनस्पतींच्या लागवडीची आवश्यकता, त्यांच्या लागवडीमुळे होणारे लाभ, तसेच अत्यल्प श्रमात लावता येण्याजोग्या आणि चालू शेतीत आंतरपीक म्हणून लावता येण्याजोग्या औषधी वनस्पती, यांविषयीची माहिती या लेखमालेद्वारे देत आहोत.
भाग १ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/481437.html
भाग २
५. लागवडीची आवश्यकता नसलेल्या; परंतु भोवतालच्या परिसरातून हेरून ठेवण्याजोग्या औषधी वनस्पती
५ अ. आपोआप उगवणार्या औषधी वनस्पतींची ओळख होणे आवश्यक असणे : काही वनस्पती निसर्गतःच पुष्कळ मोठ्या प्रमाणात उगवत असतात. पावसाळ्यात तणस्वरूपात उगवणार्या अनेक वनस्पतींमध्ये औषधी गुणधर्म असतात. टाकळा, मोठी नायटी (दुधाणी), एकदंडी, बला, पुनर्नवा यांसारख्या वनस्पती तर आपण प्रतिदिन पहात असतो; पण ‘त्या औषधी वनस्पती आहेत आणि त्यांचा विकार बरे करण्यासाठी उपयोग होऊ शकतो’, हेच आपल्याला ठाऊक नसते. निसर्गामध्ये तण स्वरूपात मोठ्या प्रमाणात उगवणार्या वनस्पतींची वेगळी लागवड करण्याची आवश्यकता नसते; परंतु आपल्याला अशा वनस्पतींची ओळख होणे आणि त्या आपल्या भोवताली कुठे मिळतात, हे ठाऊक असणे आवश्यक असते. यासाठी अशा वनस्पती आपल्या भोवतालच्या जागेत कुठे आहेत, हे हेरून ठेवावे. जाणकारांना विचारून आपण ओळखलेल्या वनस्पती योग्य आहेत ना ? याची निश्चिती करून घ्यावी. यामुळे त्या औषधी वनस्पतींची जेव्हा आवश्यकता भासेल, तेव्हा आयत्या वेळी त्या शोधण्यातील वेळ वाचवता येईल. अशा वनस्पतींचे औषधी उपयोग, गुणधर्म, तसेच त्यांच्यापासून विविध औषधे कशी बनवावीत, याची सविस्तर माहिती सनातनची ग्रंथमालिका ‘आयुर्वेदीय औषधी (४ खंड)’ यात दिली आहे.
५ आ. औषधासाठी कोणतीही वनस्पती घेण्यापूर्वी लक्षात घेण्याची महत्त्वाची सूत्रे
१. घाण, दलदल, स्मशानभूमी आदी ठिकाणची वनस्पती औषधाकरता घेऊ नये.
२. औषधी वनस्पती घेणार असू तेथील भूमीच्या अवतीभोवती प्रदूषण निर्माण करणारे, विशेषतः हानीकारक रसायने सोडणारे कारखाने नसावेत.
३. बुरशी किंवा कीड लागलेली, तसेच रोगट वनस्पती औषधासाठी घेऊ नये.
४. विषारी वृक्षावरील औषधी वनस्पती घेऊ नयेत, उदा. कुचल्याच्या (काजर्याच्या) झाडावरील गुळवेल घेऊ नये.
५. पावसाळ्यात उगवणार्या बर्याच वनस्पती पावसाळा संपल्यावर वाळून जातात. अशा वनस्पती पाऊस संपल्यावर पुरेशा प्रमाणात जमा करून सावलीत वाळवून ठेवल्यास त्या आपल्याला वर्षभर वापरता येतात.
६. औषधी वनस्पती तोडून आणल्यावर ती स्वच्छ पाण्यामध्ये २ – ३ वेळा धुवून घ्यावी.
(क्रमशः)
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘जागेच्या उपलब्धतेनुसार औषधी वनस्पतींची लागवड’)
भाग ३ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/482474.html