उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. कियांश कौशिक कुलकर्णी हा एक आहे !
नागठाणे (जि. सातारा) येथील चि. कियांश कौशिक कुलकर्णी याचा वैशाख कृष्ण पक्ष चतुर्थी (२९.५.२०२१) या दिवशी दुसरा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने कियांशच्या आजीने मुलीच्या म्हणजे अधिवक्त्या (सौ.) प्राजक्ता कुलकर्णी यांच्या साधनेविषयी लिहून दिलेली सूत्रे, तसेच आजी-आजोबा, आई आणि साधक यांना कियांशची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
चि. कियांश कौशिक कुलकर्णी याला द्वितीय वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’– (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’पालकांनो, हे लक्षात घ्या ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
१. सौ. शोभना नारखेडे (चि. कियांशची आजी, आईची आई), सनातन आश्रम, देवद, पनवेल.
१ अ. अधिवक्त्या (सौ.) प्राजक्ता कुलकर्णी (चि. कियांशची आई) यांची आध्यात्मिक वाटचाल !
१ अ १. बालपणी परात्पर गुरुदेवांप्रती श्रद्धा निर्माण होणे : ‘प्राजक्ता लहानपणापासूनच मला सेवेत साहाय्य करत असे. ती खेळतांना ‘प्रवचने घेणे, सत्संग घेणे’, असे खेळ खेळत असे. परात्पर गुरु डॉक्टरांवर तिची पुष्कळ श्रद्धा आहे. सेवेसाठी बाहेर जातांना मी तिला एकटी घरी सोडून जात असे आणि ‘परात्पर गुरु डॉक्टर तुझ्या सोबत आहेत’, असे सांगत असे. त्यामुळे तिच्या मनात परात्पर गुरुदेवांप्रती श्रद्धा निर्माण झाली.
१ अ २. सासरच्या घरातील आध्यात्मिक वातावरणाचा लाभ होणे : प्राजक्ताच्या विवाहाच्या वेळी तिला ‘आपला विवाह आश्रमात व्हावा’, असे वाटत होते. गुरुदेवांच्या कृपेने तिचा विवाह रामनाथी आश्रमात ६.७.२०१८ या दिवशी झाला. सुदैवाने तिच्या सासरचे सर्वजण अध्यात्माची आवड असणारे आहेत. ‘तिच्या यजमानांची आणि घरातील अन्य सदस्यांची साधना चांगली चालू आहे’, असे मला जाणवते. त्यामुळे घरातील आध्यात्मिक वातावरणाचा तिला लाभ झाला.
१ अ ३. गरोदरपणात सौ. प्राजक्ताला अनेक संतांचा सहवास लाभून तिने संतांनी दिलेले जप, स्तोत्रपठण करणे आणि सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी सांगितल्यानुसार देहशुद्धीविषयीची ध्वनीचकती ऐकणे : गरोदरपणात प्राजक्ताला अनेक संतांचा सहवास मिळाला. गोंदवलेकर महाराजांच्या संप्रदायानुसार साधनारत असलेले पू. डॉ. सुहास पेठेकाका, पंचमुखी हनुमानभक्त पू. विनायक फडकेआजोबा आणि कानिफनाथांच्या भक्त पू. लीलावती ससाणेआजी यांचा तिला सहवास मिळाला. पू. फडकेआजोबा यांनी तिला पाचव्या आणि आठव्या मासात, तसेच बाळंतपणाच्या वेळी करावयाचे जप दिले. प्राजक्ता प्रतिदिन रामरक्षा, अथर्वशीर्ष, मारुतिस्तोत्र आणि विष्णुसहस्रनाम ऐकायची. तिला सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी देहशुद्धीविषयीची ध्वनीचकती ऐकायला सांगितली होती.
अशा प्रकारे प्राजक्ता अतिशय सात्त्विक वातावरणात रहात असल्यामुळे तिच्या गर्भावर गर्भसंस्कार होत गेले. या काळात तिला अनेक अनुभूती आल्या.
१ आ. बाळाच्या जन्मापूर्वी : पाचव्या मासात प्राजक्ताची ‘सोनोग्राफी’ केली. ‘सोनोग्राफी’च्या अहवालात गर्भाच्या भोवती ‘ॐ’ उमटला असल्याचे दिसले.
१ इ. बाळाचा जन्म
१ इ १. बाळाच्या जन्मानंतर गणपतीचे तत्त्व अनुभवता येऊन सर्वजण उल्हसित होणे : प्रत्येक चतुर्थीला प्राजक्ता गणपतीची उपासना करायची. योगायोगाने बाळाचा जन्मही संकष्टी चतुर्थीच्या दिवशीच झाला आणि आम्हाला गणपतीचे तत्त्व अनुभवता आले. ‘हे बाळ म्हणजे परात्पर गुरुमाऊलीच्या कृपेने मिळालेला प्रसादच असून हिंदु राष्ट्रासाठी भावी पिढी पृथ्वीवर अवतरत आहे’, असा विचार माझ्या मनात येत होता. मोरया गोसावी यांचे समाधीस्थान असलेल्या चिंचवड येथे बाळाचा (कियांशचा) जन्म झाला. त्याच्या आगमनाने आम्ही सर्वजण उल्हसित झालो.
१ इ २. जन्मतःच भगवंताची ओढ असल्याचे जाणवणे : बाळाला मांडीवर घेऊन अथवा झोपवतांना नामजप केला की, तो अगदी शांतपणे ऐकत असे. त्याला श्रीकृष्णाच्या चित्राजवळ नेले की, पुष्कळ आनंद होऊन तो हसायचा. दोन मासांच्या बाळाला हे सगळे कळायचे. यावरूनच आम्हाला त्याचे वेगळेपण जाणवायचे.
प्रत्येक क्षणी देवच आम्हा सर्वांची काळजी घेत आहे आणि साधना होण्यासाठी स्मरण करून देत आहे. त्याविषयी गुरुमाऊलींच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी अल्पच आहे. मुलीच्या बाळंतपणाच्या काळात मला पुष्कळ त्रास होत होते; पण देवाने माझ्याकडून हे सर्व करून घेतले. त्यासाठी गुरुमाऊलींच्या चरणी कृतज्ञता !
२. श्री. प्रवीण नारखेडे (कियांशचे आजोबा, आईचे वडील), सनातन आश्रम, देवद, पनवेल.
२ अ. ‘कियांशला कुठल्याही खोलीत नेले, तरी तिथल्या खिडकीतील एका विशिष्ट जागी तो टक लावून बघत असे.
२ आ. चि. कियांशला लाभलेला सत्संग
१. कियांश दोन मासांचा असतांना आम्ही त्याला गुरुपौर्णिमेच्या सोहळ्याला घेऊन गेलो होतो. तिथे तो पुष्कळ आनंदाने साधक आणि सनातनच्या संत पू. संगीता पाटीलकाकू यांच्याकडे झेपावून जात होता.
२. तो सात मासांचा असतांना पू. फडकेआजोबांच्या हातून त्याचा अन्नप्राशन विधी झाला.
३. कियांश सात मासांचा असताना त्याला पंधरा दिवस देवद आश्रमात राहण्याची संधी मिळाली. या काळात त्याला आश्रमातील साधक आणि संत यांचा सत्संग मिळाला. आश्रमात तो पुष्कळ आनंदी होता आणि सर्व साधकांकडे आनंदाने जात होेता.
२ इ. धर्माचरणाची आवड
२ इ १. देवघरात जाऊन उदबत्ती ओवाळण्यास आवडणे : कियांशला देवघरात जाऊन उदबत्ती ओवाळायला पुष्कळ आवडते. माझी मोठी मुलगी प्रतिदिन पूजेसाठी देवघरात गेल्यावर कियांश पटकन जाऊन तिच्या मांडीवर बसत असे. संपूर्ण पूजा होईपर्यंत तो शांतपणे बसून रहात असे आणि नंतर ‘मी ओवाळतो’, असे म्हणून स्वतः उदबत्ती ओवाळत असे.
२ इ २. नाम लावण्यासाठी हट्ट करणे : कियांश पावणेदोन वर्षांचा असतांना आम्ही त्यांच्याकडे सातार्याला गेलो होतो. मी अंघोळ झाल्यावर नाम लावतांना तो ‘मलाही नाम लावा’, असे म्हणून हट्ट करत असे. नाम लावून झाले की, ‘मला आरशात दाखवा’, असे म्हणून तो स्वतःला लावलेले नाम आरशात बघायचा आणि हसायचा.
३. अधिवक्त्या (सौ.) प्राजक्ता कुलकर्णी (चि. कियांशची आई), सातारा
३ अ. पहिल्या मासात कियांशला दूध पिता येत नव्हते. त्या वेळी मी दत्ताचे नामस्मरण केल्यानंतर तो दूध प्यायला लागला.
३ आ. शारीरिक वाढ जलद गतीने होणे : कियांश ९ मासांचा असतांनाच चालायला लागला आणि वर्षाचा होण्याआधीच बोलायला लागला. कियांशची अनुकरण करण्याची आणि ग्रहणशक्ती चांगली आहे.
३ इ. इतरांना साहाय्य करणे
१. तो मला खोलीची स्वच्छता करण्यासाठी साहाय्य करण्याचा प्रयत्न करतो.
२. कियांशचे बाबा न्यायालयात जातात. त्या वेळी तो त्यांचे घड्याळ, लेखणी आणि पाकीट आणून देऊन त्यांची जाण्याची सिद्धता करून देतो.
३. कियांशने एप्रिल २०१९ मध्ये एकदा चिकू खाल्ला. त्या वेळी त्याच्या बाबांनी ‘आपण या बियांचे झाड लावू’, असे त्याला सांगितले. तेव्हा त्याने चिकूच्या पन्नास बिया जमवून त्या पेरण्यासाठी त्याच्या बाबांना साहाय्य केले.
३ ई. कियांश स्वतःच्याच जगात रममाण होऊन खेळत असतो.
३ उ. गोमातेची आवड असणे : प्रतिदिन आमच्या गोठ्यात सकाळी आणि संध्याकाळी दूध काढण्याच्या वेळी कियांश तेथे जातो. तो गायीला आणि वासराला माया करून त्यांना चारा घालतो.
३ ऊ. देवाची आवड : कियांश प्रतिदिन अंघोळ झाल्यावर त्याच्या बाबांसमवेत त्याला जमेल तसा गायत्रीमंत्र म्हणतो आणि देवाला नमस्कार करून देवाच्या चित्रांशी बोलतो.
३ ए. स्वभावदोष : हट्ट करणे.’
४. सौ. प्रियंका सेगु (चि. कियांशची मावशी), नेदरलँड
४ अ. बारशाच्या वेळी ‘कियांश बालदेवता असून त्याच्यामुळे चैतन्य अन् सात्त्विकता यांची स्पंदने जाणवत आहेत’, असे वाटणे : ‘कियांशच्या बारशाचा कार्यक्रमाच्या वेळी त्याचा पाळणा चालू असतांना श्रीरामाचा पाळणा लावला होता. तेव्हा ‘कियांश ‘बालदेवता’ असून सगळ्यांकडे बघत आहे. तो सगळ्या गोष्टी ऐकत आहे. त्याच्या अस्तित्वाने चैतन्य आणि सात्त्विकता यांची स्पंदने जाणवत आहेत’, असे मला वाटत होते.
४ आ. कियांशच्या पहाण्याने ‘उपाय होत आहेत’, असे जाणवणे : त्याचे ‘कियांश’ हे नाव ऐकताक्षणी माझ्या मनाला आनंद होतो. कियांश अगदी बाळ असल्यापासून त्याच्याशी बोलल्याविना माझा एक दिवसही जात नाही. तो आपल्या दृष्टीला दृष्टी भिडवतो. तेव्हा मला ‘माझ्यावर उपाय होत आहेत’, असे वाटते. त्याच्याकडे बघतांना मला बाकी जगाचा विसर पडतो. मला त्याची खूप ओढ वाटते.
४ इ. कियांशमुळे जीवनात पुष्कळ सकारात्मक प्रसंग घडणे : कियांश दीड वर्षाचा असतांना मी त्याला भेटले. तेव्हा त्याचा उत्साह दिवसभर टिकून असायचा. यावरूनच ‘हे दैवी बालक आहे’, असे मला वाटायचे. त्याचे प्रश्न, जिज्ञासा आणि त्याची चपळता बघून मला फार आश्चर्य वाटते. त्याच्या येण्याने माझ्या जीवनात पुष्कळ सकारात्मक प्रसंग घडले आहेत. कुठलेही शुभ कार्य करण्याआधी त्याला बघून मगच मी आरंभ करते.
४ ई. झाडांची आवड असणे : कियांशला त्याच्या बाबांनी शिकवल्यामुळे शेतीची पुष्कळ आवड लागली आहे. त्याची शेती आणि झाडे यांची आवड पाहून मला त्याचे फार कौतुक वाटते. तो त्याच्या आजोबांच्या समवेत झाडांना प्रतिदिन पाणी घालतो.
४ उ. पूजा करतांना स्थिर बसणे : मी भारतात असतांना तो माझ्यासमवेत संध्याकाळी देवापुढे दिवा लावून उदबत्ती लावायचा. दिवसभर तो अस्थिर असायचा; पण पूजा करतांना मात्र स्थिर बसायचा.
कधी कधी मला वाटते, ‘मला कियांशप्रती जी ओढ वाटते, तशीच ईश्वराप्रती असती, तर माझी आध्यात्मिक प्रगती किती झपाट्याने होईल ! परात्पर गुरु डॉक्टर, ‘मला तुमच्याप्रती अशी ओढ वाटू दे’, अशी मी तुमच्या चरणी प्रार्थना करते.’ (२४.५.२०२१)
५. श्रीमती जयश्री देव, चिंचवड, पुणे.
५ अ. कियांशला पाहिल्यावर चैतन्यमय प्रकाश जाणवून ‘हे दैवी बालक आहे’, असे वाटणे : ‘मी एकदा संध्याकाळी बाळाला पहाण्यासाठी गेले. त्या वेळी बाळ छान झोपले होते. पाळण्याकडे पाहून मला पुष्कळ आनंद झाला. पाळण्यामध्ये पिवळसर प्रकाश दिसत होता. त्या वेळी ‘हे दैवी बालक आहे’, असे मला जाणवले. बाळाच्या तोंडवळ्यावर स्मित हास्य होते. बाळाला पाहून ‘आमचे स्वामीच (श्रीधरस्वामी) जन्माला आले आहेत का ?’, असे मला वाटू लागले. बाळाचे हात लांब आणि मुठी आवळलेल्या पाहून ‘त्याने हातात जणू लक्ष्मी आणि सरस्वती यांनाच धरून ठेवले आहे’, असे मला वाटत होते. बाळाच्या पायातही चैतन्य जाणवत होते. तो उठल्यावर त्याचे डोळे छान पाणीदार दिसत होते.
५ आ. चि. कियांशला पाहिल्यावर सुचलेल्या ओळी
हे दैवी बालका, तू बुद्धीमान अन् कीर्तीमान हो ।
छकुल्या राजसा माझ्या, कोणाची दृष्ट लागू नये तुला ।
नवे घातले अंगडे-टोपडे, लावली तीट ही भाळी ॥ १ ॥
दैवी बालका, तू बुद्धीमान, कीर्तीमान हो ।
अन् तुला परात्पर गुरुदेवांचे आशीर्वाद लाभो ॥ २ ॥
हीच श्रीकृष्ण आणि गुरुदेव यांच्या चरणी प्रार्थना ।
कृतज्ञता, कृतज्ञता, कृतज्ञता ॥ ३ ॥’
६. श्रीमती उज्वला ढवळे, चिंचवड, पुणे.
६ अ. कियांशला पाहिल्यावर मन शांत आणि आनंदी होणे : ‘भावसत्संग आणि शुद्धीसत्संग ऐकत असतांना कियांश शांतपणे खेळत असायचा. त्या वेळी ‘तो पूर्ण सत्संग ऐकत आहे’, असे वाटायचे. जवळमपास आई दिसली, तरी तिने घ्यावे, यासाठी कियांशने कधी हट्ट केला नाही. त्याच्याकडे पाहिले की, मन शांत आणि आनंदी होत असे.’
७. कु. लीना कुलकर्णी, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
७ अ. आश्रमात आल्यावर सर्व साधकांकडे सहजतेने जाणार्या कियांशकडे पाहून आश्चर्य वाटणे : ‘कियांश ६ – ७ मासांचा असतांना देवद आश्रमात आला होता. तेव्हा त्याच्याकडे पाहिल्यावर ‘हे उच्च आध्यात्मिक स्तराचे दैवी बालक आहे’, असा विचार माझ्या मनात आला. ‘त्याच्या तोंडवळ्याकडे पहातच रहावे’, असे वाटत होते. छोट्या कुटुंबातून तो आश्रमातील एवढ्या मोठ्या कुटुंबात पहिल्यांदाच आला होता, तरी तो सर्वांकडे जायचा. तो जराही रडला नाही कि त्याने त्रास दिला नाही. याचेही मला आश्चर्य वाटले.
७ आ. ‘भविष्यात कियांश पुष्कळ समष्टी कार्य करेल’, असे वाटणे : ‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’, या उक्तीनुसार कियांशला पहिल्यांदा पाहिले, तेव्हा ‘हा कुशाग्र बुद्धीमत्तेचा असून याचा स्वभाव प्रेमळ आणि इतरांना समजून घेणारा असेल’, असे मला वाटले. ‘त्याच्यामध्ये नेतृत्व गुण आणि समष्टी भाव असून हा भविष्यात पुष्कळ समष्टी कार्य करेल’, असेही मला वाटले. त्या वेळी ‘प्रत्यक्ष भगवंतच मला हे सुचवत आहे’, असे वाटत होते.’
८. श्रीमती प्रमिला पाटील आणि कु. माया पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
८ अ. आनंदी आणि शांत : ‘चि. कियांश ३ मासांचा असतांना आम्ही त्याला पहिल्यांदा भेटलो. त्या वेळी तो पुष्कळ आनंदी आणि शांत होता. त्याला बघितल्यावर, तसेच त्याच्या सहवासात आमचा नामजप चालू झाला.
८ आ. जणू पूर्वीची ओळख असल्याप्रमाणे कियांशने पहाणे : आम्ही त्याला प्रथमच पहात होतो; पण ‘आम्हाला ओळखत आहे’, अशा प्रकारे तो आमच्याकडे पहात होता. त्याच्याकडे पाहिल्यावर ‘त्याला आमचे बोलणे समजत आहे’, असेही जाणवत होते.
८ इ. सौ. प्रियंका सुगे (चि. कियांशची मावशी) हिच्या विवाहाच्या वेळी चि. कियांशची जाणवलेली वैशिष्ट्ये
१. विवाहाच्या वेळी पुष्कळ गर्दी होती; परंतु कियांश अतिशय शांत होता.
२. तो सर्वांकडे जात होता आणि मुळीच रडत नव्हता.
३. त्याचे आई-वडील जवळ नसले, तरी तो आनंदाने खेळत होता.
८ ई. कियांशच्या सान्निध्यात आनंद जाणवणे : चि. कियांश देवद आश्रमात आल्यानंतर तो पुष्कळ आनंदी होता. त्याच्या सान्निध्यात आनंद जाणवत होता अन् उपायही होत होते.’
बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता
• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्यकरतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांतआहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्रदिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांनाडोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकटसर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |