कोरोनाच्या काळात अंबरनाथ-बदलापूर विभागातील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्‍यांचे रुग्णांना साहाय्य !

कठीण प्रसंगात रुग्णसेवा करून त्यांना आधार देणार्‍या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्‍यांचे कार्य कौतुकास्पद आहे. त्यांचे अभिनंदन ! यांचा आदर्श अन्य समाजसेवी संघटनांनीही घ्यावा !

ठाणे – दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णाची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत रुग्णांसमवेत एखादी माहितगार व्यक्ती नसेल, तर रुग्णालयात खाटा उपलब्ध होणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अंबरनाथ-बदलापूर विभागातील धारकरी श्री. विनीत मोरे आणि श्री. अजय राठोड तसेच त्यांच्या सहकार्‍यांनी १४९ रुग्णांना ऑक्सिजन सुविधा असलेल्या खाटा तसेच साध्या खाटा उपलब्ध करून देण्यास साहाय्य केले आहे, तर एका रुग्णाचे लाखो रुपयांचे देयक सातारा जिल्ह्यातील धारकरी अभिजीत बारटक्के आणि अन्य धारकरी यांच्या साहाय्याने न्यून केले आहे. त्यामुळे दळणवळण बंदीच्या काळात रुग्णाच्या नातेवाइकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

देशसेवेसाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी सदैव तत्पर असतात, याचे उदाहरण पुन्हा एकदा धारकर्‍यांनी दाखवून दिले आहे.