आता १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लोकांना सरकारी केंद्रावर ऑनलाईन नोंदणीविना लस मिळणार

नवी देहली – आरोग्य मंत्रालयाने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार आता १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लोक ऑनलाईन नोंदणीविनाही कोरोनावरील लस घेऊ शकणार आहेत; मात्र सध्या ही सुविधा केवळ सरकारी केंद्रात उपलब्ध असणार आहे. खासगी रुग्णालयांच्या केंद्रांना अद्याप ऑनलाईन नोंदणी करावी लागेल आणि लससाठी स्लॉट बुक करावा लागेल.

लसीकरण केंद्रात गर्दी रोखण्यासाठी सरकारने यापूर्वी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक केले होते; परंतु ऑनलाईन नोंदणीमध्ये अडचणी येत होत्या. एक म्हणजे गावातील लोकांकडे स्मार्टफोन नव्हते, त्यांना स्लॉट बुक करण्यात अडचणी येत होत्या. अनेक राज्यांमध्ये लोक स्लॉट बुकिंग करूनही लसीकरणासाठी केंद्रावर पोचत नव्हते. अशा परिस्थितीत ही लस वाया जाणार होती; मात्र आता ही उर्वरित लस नोंदणीखेरीज  आलेल्या लोकांना दिली जाणार आहे.