कोरोना महामारीशी संबंधित राज्यातील महत्त्वपूर्ण घडामोडी

संचारबंदीमुळे मांडवी नदीतील प्रदूषणात घट !

गोव्यात मांडवी आणि झुआरी या २ प्रमुख नद्या समुद्राला मिळतात. गेल्या काही वर्षांत विविध प्रदूषणकारी घटकांमुळे या नद्यांचे पाणी आणि जैवविविधता यांची पुष्कळ हानी झाली. वर्ष २०१४ पासून मांडवी नदीतील ‘सीडॉम’च्या प्रमाणावर देखरेख ठेवली जात आहे. सूर्यमालेच्या वर्णपटलातील अतिनील आणि नील किरणांतून ‘सीडॉम’ मोठ्या प्रमाणावर प्रकाश शोषून घेतो. नदीच्या पाण्यात ‘सीडॉम’चे प्रमाण अधिक असेल, तर त्यामुळे पाण्यातून प्रकाश परिवर्तीत होणार नाही. ज्याचा विपरीत परिणाम सागरी जीवसंस्थेवर होतो. ‘सीडॉम’ची निर्मिती ही नैसर्गिक किंवा प्रदूषणकारी घटकांद्वारे होते. वर्ष २०२० मध्ये केंद्राने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लागू केलेल्या दळणवळण बंदीच्या काळात (२४ मार्च ते ८ जून २०२०) ‘सीडॉम’चे प्रमाण लक्षणीय म्हणजे दुपटीने न्यून झाल्याचे निदर्शनास आले आहे. ‘सेंटीनेल-२’ या उपग्रहानेदेखील हे प्रमाण न्यून झाल्याची नोंद केली आहे. या काळात कॅसिनो, क्रूझ, पाण्यातून जाणारे तराफे आणि इतर व्यावसायिक अशा मानवी कृती पूर्णपणे बंद असल्याने ‘सीडॉम’ अन् विविध प्रदूषणकारी घटक यांचे प्रमाण न्यून झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

  • कोरोना प्रतिबंधक लसीवर विश्‍वास ठेवा, लसीविषयी व्यापक दृष्टीकोन ठेवा ! – डॉ. जगदीश काकोडकर, प्रमुख, प्रिव्हेंटिव्ह आणि सोशल मेडिसीन विभाग, गोमेकॉ

  • कोरोनाविरोधी लसीचे २ डोस घेऊनही तिघांचा मृत्यू झाल्याचे प्रकरण

कोरोनाची लस घेतलेल्यांचे मृत्यू होण्याचे प्रमाण न्यून आहे. कोरोना प्रतिबंधक लसीवर विश्‍वास ठेवणे आवश्यक आहे, असे आवाहन गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रिव्हेंटीव्ह आणि सोशल मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. जगदीश काकोडकर यांनी केले आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचे २ डोस घेऊनही तिघांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणावरून काही जणांकडून कोरोनाच्या लसीविषयी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात असल्याच्या पार्श्‍वभूमीवर डॉ. जगदीश काकोडकर यांनी हे आवाहन केले.

डॉ. जगदीश काकोडकर पुढे म्हणाले,‘‘कोरोनाचा संसर्ग झाल्याने आतापर्यंत राज्यात सुमारे २ सहस्र ३०० जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये कोरोना प्रतिबंधक लसीचे २ डोस घेतलेल्या केवळ तिघांचा समावेश आहे. यामुळे एकूण मृतांपैकी बहुतेकांनी कोरोनाची लस घेतली नव्हती, हे स्पष्ट होते. कोरोनाची लस घेतल्याने शरिरावर विपरीत परिणाम होण्याच्या घटना अल्प आहेत. कोरोनाच्या लसीमुळे कुणाचाही मृत्यू झालेला नाही. कोरोनाची लस घेण्यासाठी सर्वांनी न घाबरता पुढे यायला पाहिजे.’’