प्रेमळ, शारीरिक त्रास असूनही तळमळीने साधना आणि सेवा करणार्‍या अन् संतांप्रती भाव असणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पुणे येथील कै. (सौ.) शोभा जोशी !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘शेवटच्या क्षणीही साधना आणि सेवा करण्याची इच्छा व्यक्त करणार्‍या सौ. शोभा जोशी यांच्या तळमळीचे कौतुक करावे, तितके अल्पच आहे. ‘सेवा आणि साधना यांची तळमळ कशी असावी ?’, याचा आदर्श सौ. जोशी यांनी सर्व साधकांसमोर ठेवला आहे. ‘त्यांची यापुढेही अशीच आध्यात्मिक प्रगती होवो’, अशी देवाच्या चरणी प्रार्थना !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना हे लिखाण वाचतांना आलेल्या अनुभूती

श्रीसत्‌शक्ति सौ. बिंदाताई

कै. (सौ.) शोभा जोशीकाकूंची लिखाण वाचतांना मला पुष्कळ चांगले वाटले आणि माझी भावजागृती झाली. ‘त्यांची निधनापूर्वी चांगली साधना चालू होती आणि त्यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली होती’, असे मला जाणवले. त्यांचे छायाचित्र पहातांना खोलीत शीतल वार्‍याची झुळूक आली. ‘गुरुकृपेमुळे मृत्यूनंतरही त्यांची पुढील प्रगती जलद गतीने होईल’, असे वाटले.’

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.६.२०२०)

माघ शुक्ल पक्ष द्वादशी (६.२.२०२०) या दिवशी पुणे येथील साधिका सौ. शोभा जोशी (वय ६३ वर्षे) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पुणे येथील साधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या निधनापूर्वी अन् निधनानंतर जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

 कै. (सौ.) शोभा जोशी

१. सौ. शोभा जोशी यांची गुणवैशिष्ट्ये

१ अ. प्रेमभाव 

१. ‘शोभाकाकू अतिशय प्रेमळ होत्या. त्या सगळ्यांशी प्रेमाने बोलायच्या.’ – सौ. राजश्री धांडे, श्री. रवींद्र धांडे आणि कु. शोभा आवटे

२. ‘एकदा मी सकाळीच जोशीकाकूंकडे गेले होते. मी त्यांच्या अंगणात त्यांना सुबक रांगोळी काढतांना पाहिले. ‘ती कशी काढायची ?’, याविषयी त्यांनी मला छान समजावून सांगितले. रांगोळी काढण्याचे महत्त्वही त्यांनी मला समजावले. तेव्हापासून मीही देवाजवळ तशी रांगोळी काढू लागले.’ – श्रीमती राधा राणु काकडे

३. ‘अन्य साधकांविषयी त्यांना पुष्कळ प्रेम वाटायचे. नामदिंडी किंवा आंदोलन यांठिकाणी गेल्यावर त्या मला बसण्यासाठी जागा शोधत असत. त्या नेहमी घरी आलेल्यांचे मनापासून आदरातिथ्य करत होत्या. घाईत असलेल्यांना हातावर खाऊ ठेवल्याविना काकू जाऊ द्यायच्या नाहीत.’ – सौ. सुजाता लांडेकर

१ आ. इतरांचा विचार करणे : ‘माझ्याकडे सेवेनिमित्त येतांना ‘तुझ्यासाठी सात्त्विक उत्पादने आणू का ?’ असे त्या आवर्जून विचारायच्या आणि ती उत्पादने घेऊन यायच्या. त्यांच्या घरी जाऊन साहित्य आणण्यापूर्वी त्या मला सूची पाठवायला सांगायच्या अन् त्याप्रमाणे साहित्य काढून ठेवायच्या.’

– सौ. मनीषा साठ्ये

१ इ. सेवा करण्याची तळमळ

 १. ‘त्या प्रत्येकाला अर्पणाचे महत्त्व सांगायच्या. उदा. कामाला येणारी बाई, हातगाडीवाला इत्यादी. त्यांच्या निधनाच्या दिवशीसुद्धा त्यांनी मला ‘आपण सभेसाठी अर्पण देऊ शकता का ?’, असा संदेश पाठवला होता. त्या शेवटच्या क्षणापर्यंत सेवेचाच विचार करत होत्या.

२. मागच्या गुरुपौर्णिमेला त्यांनी सेवेचे जे ध्येय ठेवले होते, ते पूर्ण झाल्याविषयी त्यांना पुष्कळ आनंद झाला होता. शारीरिक क्षमता नसतांनाही त्या आंदोलनाला जायच्या.’

– सौ. राजश्री धांडे, श्री. रवींद्र धांडे आणि कु. शोभा आवटे

३. ‘रुग्णाईत असतांनाही त्या श्री गणेश जयंतीला ग्रंथप्रदर्शन कक्षाची सेवा करण्यास आल्या होत्या. त्या सेवेचा आढावाही वेळेत देत होत्या.’ – सौ. सुजाता लांडेकर

४. ‘दोन मासांपूर्वी पुणे येथील एका सत्संगात डॉ. नरेंद्र दाते यांनी ‘कोथरूड येथील एक साधिका समाजातून अतिशय चांगल्या प्रकारे अर्पणाचे प्रयत्न करायच्या. मासिक अर्पण घेण्यासाठी त्या नियमित आणि तळमळीने प्रयत्न करायच्या’, असे जोशीकाकूंविषयी आठवणीने सांगितले होते.’

– श्री. रवींद्र धांडे, औंध

५. ‘स्वतःला गाडी चालवता येत नाही; म्हणून त्या सगळीकडे पायी जाण्यास सिद्ध असायच्या. कुणी साधक समवेत नसेल, तर एकटीने सगळीकडे जाऊन सात्त्विक उत्पादने देणे, अर्पण आणणे, अशा सेवा त्यांनी केली. त्यांची सेवा पाहून मलाही सेवा करण्यास प्रोत्साहन मिळायचे. प्रत्येक नवीन गोष्ट शिकण्यासाठी त्या नेहमी उत्सुक असायच्या.’ – श्रीमती राधा राणु काकडे

१ ई. साधकांना प्रोत्साहन देणे

१. ‘त्या मला सत्संगात बोलण्याविषयी पुष्कळ प्रोत्साहित करायच्या.’ – सौ. मनीषा साठ्ये

२. ‘हडपसरच्या सभेच्या वेळी त्यांनी मला बजावून सांगितले, ‘‘ताई, तुम्ही चांगले अर्पण गोळा करा. पूर्वी तुम्ही किती छान अर्पण सेवा करत होता ?’’ ‘माझ्याकडून ग्रंथ वितरण सेवा व्हावी’, अशी त्यांचीच पुष्कळ तळमळ होती’, असे मला वाटले.

१ उ. स्वत:ला पालटण्याची तळमळ : सद्गुरु स्वाती खाडयेताईंचे मार्गदर्शन ऐकल्यापासून त्यांच्यामध्ये पुष्कळ पालट झाला होता. ‘साधनेत मी किती मागे पडले आहे ?’, याची त्यांना पुष्कळ खंत वाटत होती. त्यामुळे त्या भावपूर्ण नामजप आणि स्वभावदोष अन् अहं निर्मूलन यांसाठी स्वयंसूचना सत्र करत होत्या.’

– सौ. बेबी आरगडे

१ ऊ. अल्प देहबुद्धी : ‘जोशीकाकूंना पुष्कळ शारीरिक त्रास होत असतांनाही त्या व्यष्टी आणि समष्टी साधना अतिशय तळमळीने करायच्या. त्यांची देहबुद्धी अल्प होती. त्यांची सेवेसाठी देह झिजवायची नेहमी सिद्धता असायची.

१ ए. अल्प अहं

१. त्यांनी अनेक वाचक आणि अर्पणदाते यांना जोडून ठेवले होते. अर्पण मागतांना त्यांची प्रतिमा कधी आड आली नाही.

– सौ. सुजाता लांडेकर

१ ऐ. श्रद्धा : ‘१० – १२ वर्षांपूर्वी गंभीर आजारातून प.पू. गुरुदेवांच्या कृपेने मी वाचले’, अशी त्यांची दृढ श्रद्धा होती.’ – सौ. राजश्री धांडे, श्री. रवींद्र धांडे आणि कु. शोभा आवटे

१ ओ. संतांप्रती भाव : ‘मागील वर्षी पू. होनपकाका पुण्यात असतांना त्यांना बसण्यासाठी जोशीकाकूंकडून एक प्लास्टिकची आसंदी आणली होती. ती जोशीकाकूंना परत करण्यासाठी गेल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘माझे किती भाग्य आहे ! मला आता नियमित आध्यात्मिक लाभांसाठी संतांनी वापरलेली आसंदी मिळाली. त्या वेळी त्यांची भावजागृती झाली होती.’

– श्री. रवींद्र धांडे

२. निधनापूर्वी आणि निधनानंतर जाणवलेली सूत्रे

२ अ. निधनापूर्वी हिंदु राष्ट्राची पहाट पहाण्याची इच्छा बोलून दाखवणे आणि निधनानंतर तोच भाव त्यांच्या तोंडवळ्यावर जाणवणे : ‘निधन होण्याआधी त्यांनी सर्व साधकांना भ्रमणभाषवरून संपर्क केला होता. सर्वांकडून त्यांना ऊर्जा मिळाली होती. माझ्याशी बोलतांनाही त्या म्हणाल्या होत्या, ‘‘मला हिंदु राष्ट्राची पहाट पहायची आहे; परंतु आता शरीर साथ देत नाही.’’ तेव्हा मी त्यांना म्हणाले होते, ‘‘काकू शरीर प्रारब्ध भोगत आहे; पण तुम्ही मनाने नेहमी देवाच्या अनुसंधानात रहा.’’ त्या गेल्यानंतर मला तोच भाव त्यांच्या तोंडवळ्यावर जाणवला. ‘देवाने अन् गुरुदेवांनी त्यांना अधिक त्रास होऊ न देता अलगद नेले’, असे मला जाणवले. ‘आता आपत्काळ असल्याने व्यष्टी आणि समष्टी साधनेला प्राधान्य द्यायलाच हवे. ५ मिनिटेही वेळ असल्यास तो व्यर्थ न घालवता प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त करायला हवी’, असे मला वाटते.’ – सौ. सुजाता लांडेकर

२ आ. जोशीकाकूंच्या निधनापूर्वी २ दिवस त्यांच्याशी बोलायची इच्छा होणे आणि काकूंनी सभेला येण्याची इच्छा व्यक्त करणे : ‘४.२.२०२० या दिवशी प्रकृती बिघडल्याने मला अस्वस्थ वाटत होते. ‘एखाद्या साधकाशी बोलावे’, असे मला वाटत होते. ‘कुणाशी बोलावे ?’, असा विचार करत मी भ्रमणभाषवर साधकांच्या नावांची सूची पहात असतांना शोभाचे नाव दिसल्यावर मला तिच्याशी बोलायची इच्छा झाली. मी तिला भ्रमणभाष केला. तिची विचारपूस केल्यावर तिने सांगितले, ‘‘हडपसरला सभेला येण्याची माझी पुष्कळ इच्छा आहे; पण माझी प्रकृती  ठीक नाही.’’ त्या वेळी तिने मला भ्रमणभाषवरून प्रतिदिन प्रार्थना आणि भावप्रयोग करण्यास सांगितले. आम्ही प्रतिदिन भ्रमणभाष करायचे ठरवले.

२ इ. निधनाच्या आदल्या दिवशी काकूंनी त्यांना शारीरिक त्रास होत असून नामजप होत नसल्याचे सांगणे, साधिकेने त्यांना प्रार्थना करण्यास सांगणे आणि दुसर्‍या दिवशी काकूंचे निधन झाल्याचे कळल्यावर ‘साधिकेला काकूंशी बोलावेसे वाटणे’, हे परात्पर गुरुदेवांचेच नियोजन असल्याचे लक्षात येणे : दुसर्‍या दिवशी, म्हणजे ५.२.२०२० या दिवशी ठरल्याप्रमाणे भ्रमणभाषद्वारे आध्यात्मिक चर्चा झाल्यावर शोभाने तिच्या डाव्या हातात आणि डोक्यात असह्य वेदना होत असून प्रयत्न करूनही नामजप होत नसल्याचे मला सांगितले, तसेच ‘ही हृदयविकाराची लक्षणे नसावीत ना ?’, असेही मला विचारले. त्यावर मी तिला ‘प्रार्थना कर. मग बघ मुखात नाम येते कि नाही ?’, असे सांगितले. त्यानंतर ती म्हणाली, ‘‘आत्या, मी वही आणि लेखणी घेऊन बसले आहे. तू मला प्रार्थना सांग.’’ त्यानंतर मी तिला प्रार्थना सांगितल्या. प्रार्थना सांगितल्यावर शोभा म्हणाली, ‘‘आपली सेवा कुणाला करायला लागू नये’, असे मला वाटते. साधकांमध्ये पुष्कळ प्रेमभाव आहे.’’ बोलल्यामुळे तिला मोकळे वाटल्याचे तिने मला सांगितले. आमचे हे बोलणे शेवटचेच ठरले. २ दिवसांनी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये शोभाचे निधन झाल्याचे वाचल्यावर ‘मला तिलाच भ्रमणभाष करून तिच्याशी बोलावेसे वाटणे’, हे परात्पर गुरुदेवांचेच नियोजन असल्याचे माझ्या लक्षात आले.

२ ई. ‘काकूंना साधनेची तीव्र तळमळ असल्याने त्यांच्या शेवटच्या काळात परात्पर गुरुदेवांनी साधिकेचे माध्यम बनवून त्यांना आवश्यक ते दिले’, असे जाणवणे !’ : एरव्ही जवळचे कुणी अकस्मात् गेल्याचे कळल्यावर मला पुष्कळ भीती वाटते; परंतु शोभाच्या निधनाविषयी कळल्यावर माझे मन स्थिर होते. शोभाशी बोलतांना ‘तिला सेवेची आणि सत्संगाची तीव्र तळमळ होती’, असे मला जाणवले. ‘तिच्या तळमळीमुळेच तिच्या शेवटच्या काळात परात्पर गुरुदेवांनी माझे माध्यम बनवून तिला आवश्यक ते दिले’, असे मला जाणवले. माझ्या मनालाही यातून समाधान मिळाले. ‘परात्पर गुरुदेव प्रत्येक साधकाची किती काळजी घेतात !’, हे पुन्हा एकदा शिकायला मिळाले. हे लिखाण करवून घेतल्याविषयी मी परात्पर गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– श्रीमती वृंदा कुलकर्णी (आत्या), हडपसर

२ उ. काकूंच्या निधनापूर्वी त्यांच्या तोंडवळ्यावर वेगळेच तेज आणि समाधान दिसणे अन् त्यांनी सेवा करण्याची इच्छा बोलून दाखवणे : ‘जोशीकाकूंचे निधन झाले, त्या दिवशी आणि आदल्या दिवशी मी त्यांच्याकडे गेले होते. काकूंच्या तोंडवळ्यावर वेगळेच तेज आणि समाधान दिसत होते. परात्पर गुरु डॉक्टरांप्रती त्यांच्या मनात दृढ श्रद्धा होती. त्या मला म्हणाल्या, ‘‘मी प.पू. गुरुदेवांना आत्मनिवेदन करते. ‘मी हिंदु राष्ट्राची पहाट पाहीन किंवा नाही ?’, हे मला ठाऊक नाही. आतातरी मला साधना करायची आहे. ग्रंथप्रदर्शन कक्ष लावायचे आहेत. समाजातून अर्पण आणण्याची सेवा करायची आहे. हडपसरच्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या सेवेला जायचे आहे.’’ शोभाकाकूंच्या जाण्याने औंधच्या सर्व साधकांना त्यांची पोकळी प्रकर्षाने जाणवत आहे. महाशिवरात्रीच्या कक्षावर त्यांची आठवण येत होती.’

– कु. शोभा आवटे

२ ऊ. काकूंच्या निधनानंतर ‘एक चांगली साधक मैत्रीण गमावली’, असे वाटणे आणि साधनेचे महत्त्व लक्षात येणे : ‘त्यांचे निधन झाल्याचे कळल्यावर मला दुःख झाले. ‘आपण एक चांगली साधक मैत्रीण गमावली’, असे मला वाटले. त्यांची आठवण आल्यावर मी नामजप चालू करायचे. काकूंच्या उदाहरणातून ‘आयुष्यात आपल्यावर कुठलाही प्रसंग अकस्मात् येऊ शकतो अन् आपण त्या वेळी साधना करू शकू, असे नाही. त्यामुळे आपण आता सतत साधनेत राहिले पाहिजे’, हे शिकायला मिळाले.’ – सौ. बेबी आरगडे

२ ए. ‘जोशीकाकूंच्या निधनानंतर त्यांचा तोंडवळा शांत जाणवला. दुसर्‍या दिवशी आम्ही त्यांच्या घरी गेलो. त्या वेळीही घरात पुष्कळ शांत वाटले.’ – सौ. सोनाली कामतीकर (१३.४.२०२०)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या/सद् गुरुंच्या  वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक