पुणे – सध्या रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा नाही; पण म्युकरमायकोसिस आजारावर उपचार करण्यासाठी लागणार्या औषधांचा मात्र तुटवडा आहे. या आजारावर उपचार करण्यासाठी लागणारे इंजेक्शन्स मिळवण्यासाठी संबंधित आस्थापनांना संपर्क केला आहे; परंतु ठरल्याप्रमाणे तयार होणारी इंजेक्शन्स आधी केंद्र सरकारला द्यावी लागणार आहेत, असे आस्थापनांनी सांगितल्यामुळे कोणत्या राज्याला किती इंजेक्शन द्यायची हे केंद्र सरकारच ठरवणार आहे. अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला त्या वेळी ते बोलत होते.
अजित पवार म्हणाले की, पुणे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या घटत आहे, ही समाधानकारक बाब आहे; परंतु ग्रामीण भागातील रुग्णसंख्या अपेक्षेप्रमाणे अल्प झालेली नाही. देशात सर्वाधिक लसीकरण महाराष्ट्रात झाले आहे; पण लसींचा पुरवठा जेवढा व्हायला हवा तेवढा होत नाही.