नेल्लोर (आंध्रप्रदेश) येथील आयुर्वेदीय औषधामुळे २ दिवसांत बरा होतो कोरोना रुग्ण !

  • औषधासाठी लोकांची सहस्रोंच्या संख्येने गर्दी

  • आय.सी.एम्.आर्.कडून होत आहे पडताळणी

  • मुख्यमंत्री रेड्डी आणि उपराष्ट्रपती यांच्याकडून नोंद

आयुर्वेदाला महत्त्व देण्याचे टाळणारे आता यावर काही बोलतील का ? आयुर्वेदातील औषधांचा कोरोनाच्या विरोधात आधीपासूनच योग्य प्रकारे अभ्यास करून वापर करण्यात आला असता, तर एव्हाना देशातील कोरोनाचा प्रभाव न्यून होऊन सहस्रो जणांचे प्राण वाचवता आले असते, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

नेल्लोर (आंध्रप्रदेश) – येथील कृष्णापट्टणम् गावामध्ये कोरोनावरील आयुर्वेदीय औषध घेण्यासाठी सहस्रोंच्या संख्येने लोकांना ३ किमी अंतरापर्यंत रांगा लावल्याचे दृश्य दिसत आहे. ‘या औषधाने कोरोना बरा होतो’, असा दावा औषध घेणार्‍यांनी, तसेच औषध बनवणारे वैद्य बोगिनी आनंदय्या यांनी केला आहे. आनंदय्या यांचे हे औषध डोळ्यांत टाकल्यानंतर ऑक्सिजनची पातळी वाढवते. विशेष म्हणजे आनंदय्या हे औषध विनामूल्य देत आहेत. मुख्य म्हणजे त्यांच्या औषधाचा गुण येत असल्यामुळे अनेक नेते, अधिकारी त्याचा लाभ घेत असून आनंदय्या यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत आहेत.

औषध घेण्यासाठी लोकांची रांग

याची नोंद राज्याचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी घेतली आहे. या औषधाच्या पडताळणीसाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आय.सी.एम्.आर्.च्या) सदस्यांना आमंत्रित केल्यावर त्यांचे पथक गावामध्ये आले आहे. तसेच उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आयुष मंत्रालयाचे हंगामी मंत्री किरण रिजीजू आणि आय.सी.एम्.आर्.चे महासंचालक बलराम भार्गव यांच्याशी याविषयी चर्चा केली. या औषधाचा अभ्यास करून वितरणाविषयी पावले टाकावीत, अशी सूचना त्यांनी केली.

१. आय.सी.एम्.आर्.च्या पथकाने आयुर्वेदीय औषध बनवणार्‍या झाडांची पाने आणि घटकांची पडताळणी केली. तसेच आनंदय्या यांच्याकडे औषधनिर्माण प्रक्रियेची चौकशी केली.

२. आय.सी.एम्.आर्.ने औषध वितरणासाठी अनुमती दिलेली नसल्यामुळे या औषधाचे वितरण थांबवण्यात येणार आहे, असे पोलिसांनी घोषित केले आहे. यानंतर औषध न मिळाल्याने नागरिक घराकडे परतले.

३. आयुष विभागाच्या आयुर्वेदीय वैद्यांच्या पथकाने काही दिवसांपूर्वी या गावाला भेट दिली आणि औषधाची चौकशी केली. या पथकाने शासनाला अहवाल सादर केला की, औषधाची सिद्धता, उपचार प्रक्रिया आणि परिणाम यांविषयी वैज्ञानिक अभ्यास करणे आवश्यक आहे.

४. आनंदय्या गेल्या काही वर्षांपासून औषधी वनस्पतींसह आयुर्वेदीय औषधे बनवत आहेत. अलीकडेच त्यांनी कोरोनावरील औषध विकसित केले. आले, खजूर, गुळ, मध, काळे जिरे, मिरी, लवंग, कडुलिंबाची पाने, आंब्याच्या रोपट्याची पाने, आवळा, रुईचे झाड, फुलांच्या कळ्या, काटेरी वांगे आदींचा यात वापर केला आहे.

कितीही गंभीर रुग्ण २ दिवसांत बरा होतो ! – आमदाराचा दावा

आमदार काकाणी गोवर्धन आणि माजी मंत्री चंद्रमोहन रेड्डी यांनी सांगितले की, रुग्णाची स्थिती कितीही गंभीर असली, तरी २ दिवसांत तो पॉझिटिव्हचा निगेटिव्ह होत आहे. छातीतील संसर्गाची तीव्रता २४ – २५ च्या घरात असल्यास ती शून्य होत आहे. गेल्या काही दिवसांत लोकांची झुंबड उडाल्यानंतर पोलिसांनी औषधाचे वितरण रोखण्याचा प्रयत्न केला आणि ‘सरकारने औषधाचे परीक्षण करावे आणि तोपर्यंत वितरण थांबवावे’, असे सांगण्यात आले, तसेच लोकायुक्तांकडे तक्रारही करण्यात आली.

औषधाचे परीक्षण सकारात्मक !

नेल्लोरचे जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक आणि प्रमुख आयुर्वेदीय डॉक्टरांनी औषधाचे परीक्षण केले. यासाठी नेमण्यात आलेल्या समितीमधील एका तज्ञाने सांगितले की, आमच्यासमोर एका रुग्णाची ऑक्सिजन पातळी ८३ होती. डोळ्यांत औषधाचे २ थेंब टाकण्यात आल्यानंतर ती ९५ पर्यंत वाढली. औषध घेतलेल्या एकाही रुग्णाने याविषयी तक्रार केलेली नाही. उलट आनंदय्या यांच्यामुळे जीव वाचल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

औषधाचे ३ प्रकार !

वैद्य आनंदय्या यांनी सांगितले की, माझे औषध रुग्णांचा जीव वाचवते. मी ३ प्रकारचे औषध देतो. कोरोना संसर्गच होऊ नये, झाल्यास तो बरा करणारे आणि ऑक्सिजन पातळी वाढवणारे असे ३ प्रकार आहेत. मी औषधासाठी एकही पैसाही घेत नाही आणि घेणारही नाही.

सरकार औषध वापरण्यास प्रोत्साहन देणार

मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी ‘या औषधाच्या वापरास सरकार प्रोत्साहन देण्याचा विचार करत आहे’, असे सांगितले आहे. त्यासाठी अधिकार्‍यांनी औषधाचे वितरण आणि इतर पूरक गोष्टी यांचा अभ्यास करून योग्य पावले टाकावीत, असा तोंडी आदेश देण्यात आला आहे.