वाजपेययाजी केतन काळेगुरुजी यांच्या रूपात यज्ञकार्य करणारे समष्टी रत्न आम्ही गमावले ! – श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

बार्शी येथील अश्‍वमेधयाजी प.पू. नाना काळेगुरुजी यांचे ज्येष्ठ सुपुत्र वाजपेययाजी केतन काळेगुरुजी यांचे निधन झाल्याचे वृत्त कळले, तेव्हा ‘ईश्‍वरी इच्छेपुढे आपले काही चालत नाही’, हेच लक्षात आले. त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकून पुष्कळ वाईट वाटले; कारण त्यांचा आणि सनातन संस्थेचा अत्यंत घनिष्ट असा संबंध अन् संपर्क होता. प.पू. नाना काळे, केतन काळेगुरुजी आणि श्री. चैतन्य काळेगुरुजी हे आमच्या सनातन कुटुंबाचा अविभाज्य घटक होते. प.पू. नाना यांनी आम्हा साधकांवर पितृवत प्रेम केले, तसेच जिव्हाळ्याचे नाते आमचे आणि केतन काळेगुरुजी यांचेही होते.

वाजपेययाजी केतन काळेगुरुजी

अथर्ववेद आणि यज्ञसंस्कृती यांचा प्रसार करणारे केतन काळेगुरुजी !

केतन काळेगुरुजी यांच्या निधनाचे वृत्त ऐकताच माझ्या मनात विचार आला की, आजकाल वेदांचे शिक्षण सर्वत्र न्यून होत चालले आहे. त्यात विशेष करून अथर्ववेद जाणणारे फारच थोडेजण आहेत. त्यांतीलच एक वाजपेययाजी केतन काळेगुरुजी होते. या आधी त्यांनी अनेक ठिकाणी सोमयाग, पर्जन्ययाग करून वातावरण शुद्धीसाठी पुष्कळ प्रयत्न केले होते. त्यांनी यज्ञीय संशोधन करणार्‍यांना नेहमी प्रोत्साहनच दिले.

माझे बर्‍याचदा केतन काळेगुरुजी यांच्याशी यज्ञ-यागांच्या संदर्भात बोलणे होत असे आणि याविषयी ते सनातन संस्थेला मोलाचे मार्गदर्शन करायचे. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आरोग्यासाठी कधीही यज्ञ-याग करायला मी सिद्ध आहेे,’ असे ते नेहमी म्हणायचे. कोणत्या रोगावर कोणते मंत्र म्हणावे, हे त्यांना चांगले ज्ञात होते. अथर्ववेदातील मंत्रांचेही आम्ही त्यांच्या आवाजात ध्वनीमुद्रण केले आहे. यज्ञसंस्कृतीचा प्रसार करणार्‍यांपैकी ते एक होते. ते गेल्यामुळे यज्ञसंस्थेची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे.

अग्निनारायणाची सेवा करणारे समष्टी रत्न गमावल्याची मनाला वाटणारी खंत !

प.पू. नाना नेहमी म्हणायचे की, माझी मुले वेदांचे कार्य पुढे चालवतील; पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. ‘हाच का तो कलियुगातील आपत्काळ…’, असे माझ्या मनात येऊन गेले. प.पू. नानांच्या तीन हिर्‍यांमधील एक हिरा हरपला म्हणूनही वाईट वाटले. ही भावना नाही, तर यज्ञकार्य करणारे, अग्निनारायणाची सेवा करणारे एक समष्टी रत्न आम्ही गमावले, याची मनाला वाटणारी खंत आहे.

आता आम्हाला स्थुलातून मार्गदर्शन करायला जरी वाजपेययाजी केतन काळेगुरुजी नसले, तरी सूक्ष्मातून अंतस्थ प्रेरणेने त्यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद आम्हाला सतत मिळत राहो, अशी त्या यज्ञनारायणाच्या चरणी प्रार्थना !

– (श्रीचित्‌‌शक्ति) सौ. अंजली गाडगीळ (२१.५.२०२१)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.