चीनने अरुणाचल प्रदेशजवळील सीमेपर्यंत बांधला महामार्ग !

चीन वारंवार कुरापती काढत असून त्याच्या विरोधात आक्रमक धोरण राबवून त्याला धडा शिकवणे आवश्यक !

बीजिंग (चीन) – चीनने लडाखनंतर आता ईशान्य भारताच्या सीमेजवळ हालचाली चालू केल्या आहेत. चीनने अरुणाचल प्रदेशच्या सीमेपर्यंत येण्यासाठी एक महामार्ग बांधला आहे. तिबेटच्या दक्षिण पूर्व भागाला हा महामार्ग जोडला जाणार आहे. या महामार्गात २ किलोमीटर लांबीचा बोगदादेखील आहे. हा महामार्ग चीनच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पापैकी एक आहे. या महामार्गाद्वारे चीन तिबेटमधील इतर शहरांना जोडणार आहे. या महामार्गामुळे भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो.

हा महामार्ग जगातील सर्वांत खोल दरी घाट असलेल्या जांग्बो ग्रँडपासून चालू होत असून बाइबंग काउंटीमध्ये संपतो. हा भाग अरुणाचल प्रदेशमधील बिशिंग गावातील सीमेजवळ आहे. बिशिंग गाव अरुणाचल प्रदेशच्या गेलिंग सर्कल भागात येतो. हा भाग मॅकमोहन सीमारेषेच्या जवळ आहे. मॅकमोहन रेषा ही भारत आणि चीन यांच्यामधील  सीमारेषा आहे. चीनला मात्र ही रेषा मान्य नाही. चीन भारताच्या अरुणाचल प्रदेशवर दावा सांगतो. अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा दावा चीनकडून वारंवारपणे करण्यात येतो.