इस्रालयकडून युद्धबंदीची घोषणा !

पॅलेस्टाईन लोकांचा रस्त्यांवर उतरून आनंदोत्सव !

तेल अवीव (इस्रायल) – इस्रायल आणि पॅलेस्टाईनची आतंकवादी संघटना हमास यांच्यातील युद्धामध्ये इस्रायलकडून युद्धबंदी घोषित करण्यात आली आहे. या घोषणेनंतर गाझा पट्टीमध्ये लोक आनंद साजरा करत आहेत. गेले ११ दिवस चाललेल्या या युद्धात २३२ पॅलेस्टिनी लोकांचा मृत्यू झाला, तर इस्रायलचेही ११ लोक मारले गेले आहेत. ‘आजार संपेपर्यंत आक्रमण चालूच राहील’, असे म्हणणार्‍या इस्रायलनेच शेवटी युद्धबंदीची घोषणा केल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. गेल्या ११ दिवसांत हमासकडून ४ सहस्रांहून अधिक रॉकेट डागण्यात आले, तर इस्रायलनेही गाझामध्ये क्षेपणास्त्रांचा मारा करून आणि बॉम्बवर्षाव करून शहराचा मोठा भाग उद्ध्वस्त केला.

मार खाऊनही पॅलेस्टाईनकडून ‘विजया’चा दावा

युद्धबंदीनंतर इस्रायल आणि हमास या दोघांकडून त्यांचा विजय झाल्याचा दावा करण्यात येत आहे.पॅलेस्टाईनच्या मशिदींवरील भोंग्यांवरून युद्धबंदी झाल्याची घोषणा करतांना ‘इस्रायलसमवेतच्या युद्धात विजय मिळाला आहे. एवढेच नाही, तर शांतता भंग केल्यास संबंधितांवर पलटवार करण्यास सिद्ध आहोत’, असे म्हटले आहे.

अमेरिकेच्या दबावाचा परिणाम !

अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांच्या दबावानंतर इस्रायल युद्धबंदीसाठी सिद्ध झाला, असे सांगण्यात येत आहे. तसेच इजिप्तच्या मध्यस्थीनंतर ही घोषणा करण्यात आल्याचेही म्हटले जात आहे. बायडेन यांनीही इजिप्तच्या प्रयत्नांचे कौतुक केले होते.

युद्धबंदीवरून नेतान्याहू यांच्यावर टीका

‘टाइम्स ऑफ इस्रायल’च्या वृत्तानुसार इस्रायलमधील ‘न्यू होप’ पक्षाचे नेते गिदोन सार यांनी मंत्रीमंडळामध्ये युद्धबंदीचा निर्णय होण्यापूर्वीच त्याची घोषणा केल्यावरून पंतप्रधान नेतान्याहू सरकारवर टीका केली. ‘युद्धबंदीनंतर हमास आणि अन्य आतंकवादी गटांच्या विरोधात चालू असलेल्या इस्रायलच्या मोहिमेला गंभीर हानी होईल. हमासला आणखी भक्कम होण्यापासून रोखणे, गाझामध्ये अटक करण्यात आलेले इस्रायली सैनिकांची आणि नागरिकांच्या सुटकेविना ही युद्धबंदी म्हणजे मोठे अपयश आहे.

‘एविग्डोर लिबरमॅन’ पक्षाचे अध्यक्ष इज्रियल बीटेनु सेजफायर यांनी नेतान्याहू सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे. तसेच इस्रालयमधील अन्य पक्ष आणि विविध गट यांनीही युद्धबंदीच्या घोषणावर टीका केली आहे.