प्रेमभावामुळे सर्वांशी जवळीक साधून नात्यांची वीण घट्ट करणार्‍या अकलूज (जि. सोलापूर) येथील कै. (सौ.) वैजयंती रमणलाल जबडे (वय ६४ वर्षे) ! 

प्रेमभावामुळे सर्वांशी जवळीक साधून नात्यांची वीण घट्ट करणार्‍या आणि साधनेची तळमळ असल्याने मुलीला सेवेसाठी सर्वतोपरी साहाय्य करणार्‍या अकलूज (जि. सोलापूर) येथील कै. (सौ.) वैजयंती रमणलाल जबडे (वय ६४ वर्षे) ! 

रामनाथी आश्रमात रहाणार्‍या साधिका कु. वर्षा जबडे यांच्या आई सौ. वैजयंती रमणलाल जबडे (वय ६४ वर्षे) यांचे ९.५.२०२१ या दिवशी अकलूज (जि. सोलापूर) येथे अल्पशा आजाराने निधन झाले. २१.५.२०२१ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा तेरावा दिवस आहे. त्या निमित्त कु. वर्षा जबडे यांना जाणवलेली त्यांची वैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

कै. (सौ.) वैजयंती जबडे

१. प्रेमभाव

१ अ. मोठ्या जाऊबाईंना मान देऊन, तर लहान जावांशी बहिणींप्रमाणे वागून कुटुंबियांना आधार आणि प्रेम देणे : ‘माझ्या आई-वडिलांच्या लग्नाच्या आधीपासूनच माझे मोठे काका काही कारणास्तव वेगळे रहात होते. बाबांचे लग्न झाल्यानंतर काही वर्षांनी आईने त्या काकांच्या कुटुंबियांशी जवळीक साधून त्यांना आमच्या कुटुंबाशी जोडून ठेवले. आईला काही अडचण आल्यास ‘मोठी जाऊ’ या नात्याने ती मोठ्या काकूंचेही मत घेत असे. मोठ्या आणि लहान जावांशी ती बहिणींप्रमाणे वागत असे. त्यांच्या सुनांसमवेतही आई मुलींप्रमाणे वागत असे. त्यामुळे सुनांना आईचा आधार आणि प्रेम वाटे. माझ्या काकांनाही आईचा आधार वाटायचा. त्यामुळे त्यांना काही अडचण असल्यास ते आईचे मत घ्यायचे.

१ आ. घरातील दुकान सांभाळत असल्यामुळे आईची बर्‍याच लोकांशी जवळीक होणे आणि शेजारी अन् नातेवाईक यांना तिचा आधार वाटणे : पूर्वी आमच्या घरातच किराणा मालाचे एक दुकान होते. ते दुकान आई सांभाळत होती. त्यामुळे तिची बर्‍याच लोकांशी जवळीक झाली होती. शेजारी आणि नातेवाईक यांच्यासाठी ती पुष्कळ करायची. त्यामुळे त्या सर्वांना तिचा पुष्कळ आधार वाटायचा. आमचे सर्व नातेवाईक आणि मैत्रिणी यांनाही आईने पुष्कळ प्रेम दिल्याने आई ज्या वेळी आजारी होती, त्या वेळी त्या सगळ्यांनी तिच्यासाठी नामजप केला.

कु. वर्षा जबडे

१ इ. कु. वैष्णवी जाधव हिला मनापासून आणि प्रेमाने सांभाळणे : पू. (सौ.) संगीता जाधव यांची कन्या कु. वैष्णवी ४ मासांची असल्यापासून आमच्या घरी येत असे. आईला तिच्यासाठी ‘काय करू नि काय नको’, असे वाटायचे. आई गंभीर स्थितीत रुग्णालयात भरती असतांना वैष्णवीने तिला भ्रमणभाष केला. तेव्हा ती वैष्णवीलाच सांगत होती, ‘‘मी बरी आहे. तू काळजी करू नकोस.’’

१ ई. आईने सुनेला मुलीप्रमाणे वागवणे आणि ‘सुनेला कसलाही त्रास व्हायला नको’, याची शेवटपर्यंत काळजी घेणे : माझ्या भावाचा विवाह झाल्यावर आई वहिनीशी मुलीप्रमाणेच वागायची. ‘सकाळी लवकर उठून फिरायला जाणे, दोघी मिळून घरातील सकाळची कामे लवकर आटोपून सकाळी ७ वाजता पारस दूरचित्रवाहिनीवरील तीर्थंकरांचे अभिषेक पहाणे आणि पूजा करणे, त्यानंतर विश्रांती घेऊन सकाळी ११ पासून पूजापाठ, स्तोत्रपठण, नामजप करणे’, असा त्यांचा दिनक्रम ठरलेला असायचा. काही वेळा आई आणि वहिनी यांच्यात काही प्रसंगांमुळे मतभिन्नता झाली, तरी आई लगेच वहिनींशी नेहमीप्रमाणे वागत असे. वहिनींना कामाचा ताण पडायला नको; म्हणून ती आम्हा बहिणींना प्रत्येक कामात साहाय्य करण्यास सांगत असे आणि स्वतःही करत असे. ‘सून असली, तरी तोही एक जीवच आहे. त्यामुळे सुनेला कसलाही त्रास व्हायला नको’, याची तिने शेवटपर्यंत काळजी घेतली. आईविषयी सांगतांना वहिनी म्हणतात, ‘‘त्या कधी माझ्याशी ‘सासू’ म्हणून वागल्या नाहीत, तर ‘आई’ म्हणूनच वागल्या. त्यामुळे मीही त्यांची आईप्रमाणे काळजी घेऊ शकले.’’ वहिनीच्या घरच्यांशीही आईने सहजतेने जवळीक केली. त्यामुळे वहिनींच्या आईला माझी आई बहिणीप्रमाणेच वाटे. त्या दोघींमध्ये चांगले नाते निर्माण झाले होते.

२. ‘कुणीही देवाचे करतांना त्यांच्या मध्ये अडथळा बनायचे नाही’, या तत्त्वाचे पालन करून मुलीला साधनेसाठी साहाय्य करणे

२ अ. विरोधाला स्वतः तोंड देऊन साधनेसाठी सर्व साहाय्य करणे : मी साधनेत आले. त्या वेळी आम्ही एकत्र कुटुंबात रहात होतो. मला आणि माझ्या चुलत बहिणींना साधना समजली. तेव्हापासून आईनेच आम्हाला साहाय्य केले. ती सांगायची, ‘‘कुणीही देवाचे करतांना त्यांच्या मध्ये अडथळा बनायचे नाही.’’ हे एक तिचे तत्त्व असल्याने ती नेहमी आम्हाला साहाय्य करत असे. घरातून जेव्हा साधनेला विरोध होऊ लागला, तेव्हा घरातील विरोधाला स्वतःच तोंड देऊन ती आम्हाला सेवेला पाठवत असे. ‘आम्ही सायंकाळी सेवा करून दमून आलो असणार’, असे वाटून ती आम्हाला घरातील कामेही करू देत नसे.

२ आ. सेवेचे महत्त्व पटल्यावर जैन धर्मानुसार साधना करण्याची अपेक्षा सोडून देणे : चातुर्मासात जैन मुनी मंदिरात नियमित प्रवचने घेत आणि प्रवचनानंतर प्रश्‍न विचारत. आरंभी आईला वाटायचे, ‘आम्हीही प्रवचन ऐकावे आणि प्रश्‍नांची उत्तरे द्यावीत.’ ती सांगायची, ‘‘तुम्ही जैन पंथानुसारही साधना करा आणि सनातन संस्थेनुसारही करा.’’ नंतर सेवेचे महत्त्व समजावल्यावर तिने आम्ही ‘जैन धर्माचे काही करायलाच हवे’, अशी अपेक्षा कधी केली नाही.

३. भाव

३ अ. देवाधर्माची आवड असल्याने जैन मुनी आणि माताजी घरी येणे : आई किराणा मालाचे दुकान सांभाळत असल्यामुळे तिला सत्संगाला येणे शक्य होत नसे. घरकाम आणि दुकान यांतून वेळ काढून देवधर्म करण्यासाठी ती पुष्कळ धडपड करत असे. त्यामुळे बर्‍याचदा जैन मुनी आणि माताजी आमच्या घरी आहारासाठी येत असत.

३ आ. वक्त्या-साधिका घरी आल्यावर गुरुरूप समजून त्यांची पूजा करणे : एकदा अकलूजमध्ये गुरुपौर्णिमा असतांना आमच्या घरी दोन वक्त्या-साधिकांच्या निवासाचे नियोजन केले होते. ‘त्यांच्या रूपात परात्पर गुरु डॉक्टरच ‘गुरु’ म्हणून घरी आले आहेत’, या भावाने तिने त्या दोघी घरी आल्यावर पंचामृताने त्यांचे चरण धुतले आणि हळद-कुंकू लावून त्यांची पूजा केली.

४. सेवेची तळमळ आणि भाव असल्यामुळे सर्व सेवा भावपूर्ण रीतीने करणे

आईचे हस्ताक्षर चांगले होते. त्यामुळे ती मंदिरांमध्ये लावण्यासाठी धर्मशिक्षण फलक लिखाणाची सेवा करत असे. तिच्यामध्ये कौशल्य असल्याने ती गुरुपौर्णिमेला अर्पण कलश बनवण्यासाठीही साहाय्य करत असे. संत आणि साधक यांना डबे देण्याची सेवा ती मनापासून करत असे. तिच्यात भाव असल्यामुळे संस्थेचे मोठे कार्यक्रम व्हायचे, त्या वेळी तेथील वास्तूची शुद्धी, तसेच कार्यक्रमात विघ्ने येऊ नयेत; म्हणून आईला नामजप करण्याची सेवाही मिळत असे. या सर्व सेवा आई पुष्कळ भावपूर्ण रीतीने करत असे. सेवेसमवेत धन अर्पण करण्याचा तिचा भागही चांगला होता.

५. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया आधीपासून सहजतेने करणारी आई !

५ अ. शिकण्याच्या स्थितीत रहाण्यास शिकवणे : आईला नेहमी इतरांचे चांगले गुणच दिसायचे आणि ती त्याविषयी आम्हालाही सांगायची. ती सतत इतरांचे कौतुक करत असे. त्यामुळे आपोआपच आमची शिकण्याची स्थिती निर्माण होत गेली.

५ आ. मनाविरुद्ध घडले, तरी स्वतःच्या मनाला सूचना देऊन प्रसंगाला शांतपणे सामोरे जाणे : आई पूर्वीपासून वडील आणि भाऊ जे सांगतील, तसेच वागत असे. काही प्रसंगांत तिचे काही वेगळे मत असले, तरी ती त्यांचे मत सहजतेने स्वीकारत असे. काही प्रसंगांत ते स्वीकारता आले नाही,  तरी ती कधी उलट बोलत नसे. अशा वेळी ती स्वतःच्या मनाला सूचना देत असे. त्या वेळी तिला स्वयंसूचनांविषयी काही ठाऊकही नव्हते, तरी देव तिच्याकडून पूर्वीपासून हे सर्व करून घेत होता. त्यामुळे एखाद्या प्रसंगात दुःख झाले, तरी ती त्यातून शांतपणे बाहेर पडत असे. या सगळ्यामुळे तिच्यातील सहनशीलता आपोआपच वाढत गेली.

५ इ. अहंभाव अल्प असल्याने कामगार आणि काही गृहकृत्य साहाय्यक यांच्याशी आपलेपणाने वागणे : आमचे कापड दुकान असल्याने घरी कामगार आणि काही गृहकृत्य साहाय्यक (काकू) आहेत. आई त्यांना कधीच एकेरी हाक मारत नाही किंवा तिने त्यांच्याशी अधिकारवाणीने बोललेले मी पाहिले नाही. ज्या कामगारांची परिस्थिती अधिक बिकट असेल, त्यांना ती शक्य तेवढे साहाय्य करायची. घरात काम करणार्‍या काकूंनाही ती आपलेपणानेे वागवत असे.

५ ई. ‘कुणी कसेही वागले, तरी त्यांच्याशी चांगले वागले पाहिजे’, अशी शिकवण देणारी आई आणि आईच्या या शिकवणीचे पालन केल्यामुळे बहिणीच्या सासूबाईंचे झालेले परिवर्तन ! : आईची नेहमी ही शिकवण असायची की, कुणी कसेही वागू दे, आपण त्यांच्याशी चांगलेच वागायचे. पूर्वी माझ्या मोठ्या बहिणीला तिच्या सासूबाई त्रास देत. त्या वेळी ताई आईने सांगितल्याप्रमाणे त्यांच्याशी चांगलेच वागत राहिली. तिचे सासरे अधिवक्ता असल्याने त्यांना न्यायालयात सासू आणि सून यांची अनेक प्रकरणे हाताळण्यास येत. ती पाहून ताईचे सासरे माझ्या आई-बाबांना म्हणाले, ‘‘आमच्या घरात उलटच आहे. सासू त्रास देते आणि सून काहीच प्रत्युत्तर देत नाही. तुम्ही तिला बोलायला शिकवा.’’ त्या वेळी आई-बाबांनी सांगितले, ‘‘आमची मुलगी करते, तेच योग्य आहे.’’

ताईच्या चांगल्या वागण्यामुळे तिच्या सासूबाईंमध्ये चांगला पालट झाला आणि त्या ताईला म्हणाल्या, ‘‘तुमच्या घरी देवाचे करतात. त्यामुळे तुझ्यात सहनशीलता आली आहे.’’ नंतर त्या दोघी मैत्रिणीप्रमाणे राहू लागल्या.

– कु. वर्षा जबडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.५.२०२१)

परात्पर गुरु डॉक्टरांनी आईविषयी काढलेले कौतुकोद्गार !

पूर्वी एकदा आई रामनाथी आश्रमात आली होती. त्या वेळी तिची परात्पर गुरु डॉक्टरांशी भेट झाली. ते म्हणाले, ‘‘आईचा तोंडवळा तेजस्वी वाटतो. ती तुमच्या घरातील ‘गुरु’ आहे. घरातील सर्वांनी तिचे ऐकायला हवे.’’ ते आईला म्हणाले, ‘‘तुम्ही आश्रमात काही दिवस रहाण्यास या, म्हणजे तुमच्याकडून इतरांना शिकता येईल.’’