तौक्ते चक्रीवादळाची निर्मिती, ही अरबी समुद्राचे तापमान वाढल्याचा परिणाम ! – वैज्ञानिकांचा निष्कर्ष

वर्ष २०९९ पर्यंत अरबी समुद्र आणि भारतीय महासागर येथे तापमानात सर्वाधिक वाढ होणार आणि याचे कारण पर्यावरणीय प्रदूषण हे असेल !

अरबी समुद्राचे तापमान वाढल्याने तौक्ते चक्रीवादळाची निर्मिती

पणजी, १९ मे (वार्ता.) – अरबी समुद्राचे तापमान वाढल्याने तौक्ते चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे, तसेच यापुढेही अशा अनिष्ट घटना घडू शकतात, असे मत वैज्ञानिकांनी व्यक्त केले आहे. एरव्ही शांत असलेल्या अरबी समुद्रात ५, तर नेहमी खवळलेल्या स्थितीत असलेल्या बंगाल खाडीत ३ वादळे आली आहेत. वर्ष २०२० मध्येही हा प्रकार चालूच राहिला असून अशा प्रकारची ५ वादळे आतापर्यंत आलेली आहेत.

राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेचे (एन्.आय्.ओ.चे) माजी मुख्य वैज्ञानिक आणि हवामानशास्त्रज्ञ एम्.आर्. रमेशकुमार म्हणाले, ‘‘अरबी समुद्राचा दक्षिण भाग आणि भारतीय महासागराचा (इंडियन ओशनचा) पश्‍चिम भाग यांचे अनपेक्षितपणे तापमान वाढल्याने अरबी समुद्रात अधिकाधिक विध्वसंक वादळे निर्माण होत आहेत. राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेच्या वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनाचा अहवाल ‘क्लायमेट डायनामिक्स’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे.’’

या अहवालात ‘कपल्ड मॉडेल इंटरकम्पेरिझन’ प्रकल्पाच्या आधारे वर्ष २०९९ पर्यंत अरबी समुद्र आणि भारतीय महासागर येथे तापमानात सर्वाधिक वाढ होणार असल्याचे आणि याला ‘इनहोमोजिनस अ‍ॅन्थ्रोपोजॅनिक’ (म्हणजे मनुष्याच्या कृतीमुळे निर्माण झालेले अस्वाभाविक पर्यावरणाचे प्रदूषण) उत्तरदायी असल्याचे म्हटले आहे. यापूर्वीच्या अहवालानुसार ‘इंडियन ओशन डायपोल’ नमुन्यानुसार वाढणार्‍या तापमानामुळे अरबी समुद्रात यापुढेही अधिकाधिक वादळे निर्माण होणार आहेत. अरबी समुद्राचे तापमान भारतीय महासागरापेक्षा अधिक प्रमाणात वाढणार असल्याचेही या अहवालात म्हटले आहे.

हवामानशास्त्रज्ञ एम्.आर्. रमेशकुमार पुढे म्हणाले,‘‘गतवर्षी गोव्यात मेअखेर ‘निसर्ग’ या चक्रीवादळाने मोठा विध्वंस केला होता आणि यंदा मेच्या प्रारंभीच ‘तौक्ते’ चक्रीवादळ आले आहे. मागील १३० वर्षांच्या इतिहासात मे मासामध्ये ९१ चक्रीवादळे आली आहेत. (यामधील ६३ बंगाल खाडीमध्ये, तर उर्वरित २८ अरबी समुद्रात आली होती.) मे २०२० मध्ये बंगालच्या खाडीमध्ये विध्वंसक असे ‘अंफान’ चक्रीवादळ आले होते. १ मे या दिवशी हे चक्रीवादळ निर्माण झाले आणि २१ मे या दिवशी ते शमले.’’