पुणे – कोरोना महामारीमुळे राज्यात रक्ताचा तुटवडा असल्याने पुण्यातील विविध ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३६४ व्या जयंतीनिमित्त १६ मे या दिवशी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रणसंग्राम ग्रुप, पुणे शहरच्या वतीने अप्पर (बिबवेवाडी) भागात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला त्या भागातील रहिवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाला पुण्याचे मनसे शहराध्यक्ष वसंत (तात्या) मोरे, सामाजिक कार्यकर्ते अलोक भैय्या भालेराव, समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे आदी मान्यवर उपस्थित होते.
खानापूर येथेही ‘होय हिंदूच, सिंहगड रोड’ या संघटनेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. संघटनेचे प्रमुख श्री. आकाश ननावरे, गोरक्षक श्री. चेतन जावळकर यांनी हे नियोजन केले होते. या शिबिराला सिंहगड भागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनुमाने १०२ लोकांनी या शिबिरात भाग घेऊन रक्तदान केले. या कार्यक्रमास खानापूर गावचे विद्यमान पोलीस पाटील श्री. गणेश सपकाळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.