प.पू. (सौ.) मंगला उपाध्ये यांचे वागणे, रहाणे, बोलणे आणि चालणे हे सर्व अतिशय शांत, संयमी, मृदू; पण खंबीर होते. प्रेमळ, प्रसन्न, सुहास्यवदनी आणि सुसंस्कारी अशा त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचा प्रभाव त्यांच्या नातीवर (मुलीच्या मुलीवर) बालपणापासूनच झाला. तिने आजीसारखे घडण्याचे आणि तिचे अपूरे राहिलेले ध्येय पूर्ण करण्याचा ध्यास ठेवून संतसाहित्यात ‘पी.एच्.डी.’ ही पदवी मिळवली. तिला तिची आजी देवी सरस्वतीसारखीच वाटायची. देवी सरस्वतीच्या चरणी प्रार्थना करून आजीविषयी लहानपणापासून असलेल्या कोमल भावना व्यक्त करतांना तिने आजीच्या चरणी अर्पण केलेली शब्दसुमने पुढे दिली आहेत.
‘सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ।’
अर्थ : जी सर्व प्रकारची जडता (अज्ञान) दूर करते, अशी ती भगवती, श्री सरस्वतीदेवी माझे रक्षण करो.
१. ‘महाराष्ट्र विद्यालय’ ही आरंभी अगदी छोटी असलेली शाळा आणि या शाळेच्या संस्थापक असलेल्या प.पू. (सौ.) मंगला उपाध्ये !
गोरेगाव, मुंबई येथील उन्नतनगरच्या टेकडीवर जाऊन रिक्शा थांबली की, बैठ्या चाळीसारखी असलेली एक छोटी शाळा आणि शाळेचे वर्ग दिसू लागायचे. आईसमवेत मी रिक्शातून उतरले की, समोरच असलेल्या शाळेच्या कार्यालयाच्या दारातून आत जायचे.
तेथे ‘मुख्याध्यापक : महाराष्ट्र विद्यालय’, असे लिहिलेले शाळेचे छोटेसे कार्यालय आणि त्यातील मुख्याध्यापकाच्या आसंदीवर विराजमान असलेली माझी आजी सौ. मंगला उपाध्ये मला दिसायची.
२. सात्त्विक व्यक्तीमत्त्व म्हणजे मुख्याध्यापिका प.पू. (सौ.) मंगला उपाध्ये !
मोतिया रंगाची हलकी नक्षी असलेली सुंदर रेशमी साडी, मानेवर रुळणारा मोठा अंबाडा, ठसठशीत कुंकू आणि आजीच्या समोरच्या पटलावर असलेल्या असंख्य फायली ! मध्येच कुणी महत्त्वाची माणसे बैठकीसाठी यायची. मध्येच वाजत असलेला दूरभाष आणि त्या दूरभाषवर अत्यंत संयत; परंतु सुस्पष्ट शब्दांत ती करत असलेले संभाषण ! हे सर्व कार्य चालू असतांनाच मध्येच नववी-दहावी या मोठ्या मुलांचे वर्ग घेणे आणि पुन्हा कार्यालयात येऊन त्या आसंदीवर बसून पुढच्या कामांना गती देणे ! मला माझी आजी आठवते, ती याच रूपात !
३. आजीचे शिक्षण, तसेच ‘ती शाळेची संस्थापिका आणि मुख्याध्यापिका आहेे’, यांचा रास्त अभिमान असणे
‘मुख्याध्यापिकेच्या त्या आसंदीवर माझी आजी शोभून दिसायची कि आजीमुळेे त्या आसंदीला शोभा आणि मान प्राप्त झालेला असायचा ?’, हे कळायचे नाही. त्या वेळी मी शाळेत सातवी-आठवीत असेन. तसे कळू लागलेले माझे वय होते आणि अशा कळत्या वयात ‘माझी आजी मराठी घेऊन ‘एम.ए.,बी.एड.’ शिकली आहे, ती ‘स्पेशल एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट’ आहे’, हा माझ्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा आणि अत्यंत अभिमानाचा विषय होता अन् आजही आहे. त्यातही ती एका शाळेची संस्थापिका आणि मुख्याध्यापिकाही असल्यामुळे त्या शाळकरी वयात मला तिचा फारच अभिमान वाटायचा.
४. कुठल्याही आदर्शाच्या, अभिमानाच्या आणि आनंदाच्या ठिकाणी स्वतःची आजीच डोळ्यांसमोर येणे
त्या लहान शाळकरी वयात आपली काही खास आदराची स्थाने असतात. ‘मी मोठी झाले की, हिच्यासारखी किंवा याच्यासारखी होणार’, अशी काही व्यक्तीमत्त्वे त्या डोळ्यांसमोर असतात. आज एखाद्या मुलाला मोठेपणी ‘सचिन तेंडुलकर’ व्हायचे असते किंवा एखाद्या मुलीला ‘कल्पना चावला’ (पहिली भारतीय महिला अंतराळवीर) व्हायचे असते. माझ्या त्या वयात ‘हा प्रश्न मला कुणी विचारला होता का ?’, ते आठवत नाही; पण अशा कुठल्याही आदर्शाच्या, अभिमानाच्या आणि आनंदाच्या ठिकाणी मला माझी आजीच डोळ्यांसमोर यायची.
५. देवी सरस्वतीप्रमाणे अतिशय सात्त्विक, मंगल, सुहास्यवदनी आणि विद्यादात्री असलेल्या प.पू. (सौ.) मंगला उपाध्ये !
आजीच्या त्या कार्यालयाला दोन दारे होती. एका दारातून आत गेल्यावर आजीचे प्रशस्त पटल आणि त्याच्या समोरच माझ्या आईचे पटल होेते. दुसर्या दारातून आत गेल्यावर शारदेची एक प्रसन्न मूर्ती होती. ती मूर्तीसुद्धा अशीच शुभ्रवस्त्रावृता होती. प्रसन्न आणि मंद स्मितहास्य करत असलेली ! तिच्याही कपाळावर ठसठशीत कुंकू असायचे. तिच्या एका हातात वीणा होती, तर माझी आजी पुस्तकधारिणी होती. कुठल्याही दारातून आत आले, तरी ‘ज्ञानाचा आणि बुद्धीमत्तेचा एक प्रसन्न प्रकाश आपल्याला वेढून टाकत आहे’, असे माझ्या मनात यायचे. एका बाजूला साक्षात् सरस्वतीदेवी आणि दुसरीकडे त्याच सरस्वतीची पूजा करणारी एक तपस्विनी ! एकीकडे बुद्धीतील जडत्व नष्ट करून चैतन्य देणारी देवी सरस्वती आणि दुसरीकडे हे विद्यामंदिर स्थापून ज्ञानदानाचे व्रत अखंड करणारी माझी आजी ! दोघीही एकाच मंदिरातील देवता ! तितक्याच पूजनीय ! शारदोत्सवात शाळेत माझी आजी याच सरस्वतीचे पूजन करत असे.
५ अ. आजी आणि देवी सरस्वती यांच्यात पुष्कळ साम्य जाणवून ‘देवी सरस्वती आजीच्या विद्यादानाचे कौतुक करत असेल’, असे वाटणे : आज मागे वळून पहातांना मला सरस्वतीदेवीत आणि आजीत फारच साम्य दिसू लागले आहे. वाटले, न जाणो, ‘एखाद्या खेळीमेळीच्या वेळी देवी सरस्वती आजीला म्हणालीही असेल, ‘अगं मंगले, तुझ्या मनःशक्तीला चेतना आणि प्रेरणा मी दिली, हे खरे आहे; पण त्या मनःशक्तीला क्रयशक्तीत रूपांतरित करून या विद्यामंदिराची ही टोलेजंग इमारत तुझ्यामुळेच उभी राहिली आहे !’
आता आजीच्या शाळेची मोठी इमारत उभी राहिली आहे. विद्यार्थ्यांना अनेक सुविधा मिळाल्या आहेत. प्रयोगशाळा, संगणक अशी अद्ययावत साधने प्राप्त झाली आहेत. आजीचे मोठे स्वप्न साकार झाले आहे. जणू शाळा हे तिचे सहावे अपत्यच होते !
६. विद्यादानाचे पवित्र कार्य करतांना तिने गृहस्वामिनीचे कर्तव्यही तितक्याच दायित्वाने आणि समर्थपणे सांभाळणे
स्वतःचे कुटुंब आणि पाच मुलांचे आईपणही तिने तितक्याच समर्थपणे निभावले. आबांच्या (प.पू. आबा उपाध्ये यांच्या) संगीतप्रेमालाही तिने प्रेमपूर्वक पाठिंबा दिला होता. तिने वडिलधार्यांची आदरपूर्वक सेवा केली, तसेच आपली सर्व मुले, नातवंडे आणि पतवंडे यांच्यावर वात्सल्यपूर्ण मायाही केली. ती व्यावसायिक आणि कौटुंबिक या दोन्ही स्तरांवर अत्यंत परिपूर्ण असे जीवन जगली होती.
७. संतसाहित्यात ‘पी.एच्.डी.’ होण्याचे अधुरे राहिलेले स्वप्न नातीने पूर्ण केल्यावर कृतार्थता अनुभवणार्या प.पू. (सौ.) मंगला उपाध्ये !
७ अ. आजीचे मराठी संतसाहित्यात ‘पी.एच्.डी.’ होण्याचे स्वप्न अधुरे रहाणे : अशा परिपूर्ण जीवनात आजीची एक इच्छा मात्र राहून गेली होती. कधीतरी लहानपणी मी तिची ती इच्छा ऐकली होती आणि माझ्या मनात ती घर करून बसली होती. तिला मराठी संतसाहित्यात ‘पी.एच्.डी.’ व्हायचे होते; पण शाळेचे आणि मोठ्या कुटुंबाचे दायित्व पार पाडतांना ती त्यासाठी वेळ देऊ शकली नाही. ही खंत आणि रुखरुख तिने एकदा मला बोलून दाखवली होती.
७ आ. संतसाहित्यात ‘पी.एच्.डी.’ होण्याचे आजीचे अधुरे स्वप्न पूर्ण करणे : आमच्या कुटुंबातील प्रत्येकाने आजीकडून काही ना काही घेतले आहे. कुणी तिचे रूप, कुणी तिचे गुण, कुणी तिची वाणी, तर कुणी तिची शाळेसाठी झटण्याची तळमळ ! मी मात्र तिची ही अपूर्ण इच्छा घेतली. मी मराठी विषयात ‘एम.ए.’ केले आणि त्या वेळी मुंबई विद्यापिठाचे सुवर्णपदक मिळवले. तेव्हा आजीने मला पारितोषिक स्वरूपात तिची ‘ज्ञानेश्वरी’ दिली होती. जणू आता ‘संतसाहित्यात ‘पी.एच्.डी.’ हो’, असेच तिला मला सुचवायचे होते. ‘तिची ही इच्छा पूर्ण करायचीच’, या ध्येयाने मी अभ्यास केला आणि वर्ष २०१७ च्या ऑगस्ट मासात मला मराठी संतसाहित्यात मुंबई विद्यापीठाची ‘पी.एच्.डी.’ ही पदवी मिळाली.
७ इ. आजीच्या डोळ्यांतील कृतार्थतेने वहाणार्या ‘प्रेमाश्रूंच्या धारा’ हा सर्वात मोठा सन्मान वाटणे : माझा प्रबंध आणि प्रमाणपत्र घेऊन मी आजी-आबांसमोर गेले. त्यांना नमस्कार केला. तेव्हा आजीच्या डोळ्यांतून प्रेमाश्रूंच्या धारा वहात होत्या. ‘‘मुली, ‘माझी ही इच्छा होती’, हे तुला कसे कळले ? आज तू माझी ती इच्छाही पूर्ण केलीस !’’, असे तिचे शब्द होते. परिपूर्ण जीवन जगलेल्या आजीच्या शब्दांत आता मला कृतार्थताही जाणवत होती. ही पदवी मिळाल्यानंतर मला मिळालेल्या अनेक मान-सन्मानांपेक्षाही आजी-आबांचा हा भावाशीर्वाद माझ्यासाठी अनमोल होता आणि आजीची इच्छा पूर्ण करता आल्याचे प्रचंड समाधान माझ्या मनात भरून राहिले होते.
याच आजीची मी नात आणि तिच्याच ‘विद्येची’ (आईचे नाव ‘विद्या’ आहे.) मुलगी ! त्यामुळे ‘या दोघींमुळेच माझ्याकडे ‘विद्येचा वारसा’आलेला आहे’, हे निश्चित. ‘हा वारसा वृद्धींगत करण्याची प्रेरणा मला अशीच मिळत राहो आणि त्यांचे मंगल आशीर्वाद सदा माझ्यासमवेत राहोत’, अशी प्रार्थना करते. ‘गदिमां’च्या (ग.दि. माडगूळकर यांच्या) ‘मातृवंदने’तील समर्पक ओळींनी या लेखाचा मी समारोप करते.
‘तुझा कीर्तिविस्तार माझा प्रपंच ।
कृपेने तुझ्या रंगला रंगमंच ॥ १ ॥
वठे भूमिका पाठ जैसा दिलास ।
तुझ्या वंदितो माऊली, पाउलांस ॥ २ ॥’
– डॉ. (सौ.) अपर्णा अजित बेडेकर (प.पू. कै. (सौ.) मंगला उपाध्ये यांची नात), मुंबई (१९.४.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |