भ्रष्टाचार मुळापासून नष्ट व्हावा !

महाराष्ट्रात यावर्षी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ३७६ आरोपींना अटक केली आहे. गुन्हेगारांना पकडणे हा भाग चांगला असला, तरी मुळात भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन कधी होणार ? हा प्रश्‍न आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोनाने डोके वर काढले असतांना भ्रष्टाचार निपटण्यासाठी शासकीय वेळ आणि मनुष्यबळ वापरावे लागणे, हे खेदजनक आहे. कोरोनामुळे जनसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. अशा स्थितीत कामे पूर्ण करण्यासाठी नागरिक कशा प्रकारे मन:स्तापास सामोरा जात असेल ? याची कल्पना करता येईल. तसेच प्रत्येक जणच तक्रार देण्यासाठी पुढे येतो, असे नाही. काही जण तक्रारीचा ससेमिरा नको म्हणून पैसे देऊन प्रकरण मिटवतात. लाचखोरांवर वेळीच कठोर कारवाई झाली असती, तर आज चित्र निराळे असते. सामान्य नागरिकांना अल्प प्रमाणात झळ सोसावी लागली असती; पण दुर्दैवाने अजूनही भ्रष्टाचार समूळ हद्दपार करण्यात आपल्याला यश आलेले नाही !

भ्रष्टाचार, लाचखोरी रोखणे, हा एक प्रदीर्घ लढा असून त्यासाठी विविध घटकांसंदर्भात कठोर प्रयत्नांची आवश्यकता आहे. आसपास अशा घटना लक्षात आल्यास किंवा स्वत:ला कुणी लाच मागितल्यास त्याची पुढे तक्रार करणे, हे नागरिकांचे सामाजिक दायित्व आहे. त्याची पुढील योग्य कार्यवाही करण्यासाठी शासकीय यंत्रणेने कंबर कसायला हवी. लाचखोरीमुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली जाऊन नैतिक अध:पतन होत आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे. हे सर्व केव्हा होईल ? जर प्रत्येकामध्ये देशाप्रती प्रेम आणि स्वत:वरील दायित्वाची जाणीव असेल तेव्हा ! दुसरीकडे भ्रष्टाचार करणार्‍यांना ‘भ्रष्टाचार हे पाप असून त्याची वाईट फळे भोगावी लागणार’, याचे भानच नाही. त्यांच्यात ते निर्माण होण्यासाठी त्यांना धर्मशिक्षित करणे आवश्यक आहे. एकूणच समाजाच्या उत्थानासाठी धर्मशिक्षण देणे, हाच एकमेव पर्याय असून या मुळातूनच राष्ट्रप्रेम, अन्यायाविरुद्ध चीड, कर्तव्यपरायणता आणि नैतिकता या फांद्यांचा वृक्ष बहरणार आहे. शासनाने हे लक्षात घेऊन धर्मशिक्षण चालू करण्याची अपरिहार्यता जाणावी !

– कु. प्राजक्ता धोतमल, सनातन आश्रम, देवद, पनवेल.