(म्हणे) ‘युद्ध झाले, तर पराजित व्हाल !’

चीनच्या सरकारी दैनिकाची अमेरिकेला धमकी !

येणारा काळच ‘कोण पराजित होईल’, हे दाखवून देईल. तुर्तास तरी चीनने कोरोना विषाणूच्या माध्यमातून संपूर्ण जगाला भंडावून सोडले आहे, हे नक्की !

बीजिंग (चीन) – जर अमेरिकेने चीनसमवेत युद्ध केले, तर अमेरिकेचा पराभव होईल, अशी धमकी चीनचे सरकारी दैनिक ‘ग्लोबल टाइम्स’च्या संपादकीयमधून देण्यात आली आहे. जपान, ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्स यांचा युद्धाभ्यास चालू असून अमेरिका त्यात सहभागी झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर ही धमकी देण्यात आली आहे. चीनने म्हटले होते की, अशा प्रकारच्या युद्धाभ्यासामुळे चीनवर कोणताही परिणाम होणार नाही. ही केवळ इंधन तेलाची नासाडी आहे.

१. चीनच्या या धमकीविषयी अमेरिकेचे तज्ञ अ‍ॅलेक्स मिहाइलोविच यांनी म्हटले की, चीन अमेरिकेच्या दक्षिण चीन सागरमधील वाढत्या शक्तीमुळे अस्वस्थ आहे, हेच या धमकीवरून लक्षात येते. अमेरिकेची येथील सक्रीयता आणि युद्धाभ्यास यांमुळे चीन भडकला आहे.

२. ब्रिटनचे माजी खासदार जॉर्ज गॅलोवे यांनी म्हटले की, अमेरिकेच्या दक्षिण चीन सागरामधील वाढत्या सक्रीयतेमुळे चीनने सैन्याच्या सिद्धतेची गती वाढवली आहे. यामुळे दोन्ही देशांत संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.