गोवा राज्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करणार्‍यांची कोरोनाविषयक चाचणी करण्याचे आदेश

सावंतवाडी – कोरोनाबाधितांची वाढती संख्या पहाता गोवा राज्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करणार्‍या प्रत्येकाची कोरोनाच्या अनुषंगाने चाचणी करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी दिले आहेत.

मुंबई-गोवा महामार्गावरील बांदा तपासणी नाक्याला जिल्हा पोलीस अधीक्षक दाभाडे यांनी भेट दिली. या वेळी त्यांनी या सूचना दिल्या. ४८ घंट्यांच्या आतील आर्.टी.पी.सी.आर्. चाचणीचा अहवाल असेल, त्यालाच प्रवेश देण्यात यावा आणि ज्याच्याकडे अहवाल नसेल, त्याची ‘रॅपिड टेस्ट’ करावी, अशा सूचना या वेळी देण्यात आल्या. या वेळी बांदा, वेंगुर्ला, कुडाळ आणि सावंतवाडी येथील प्रभारी अधिकार्‍यांना  इन्सुली तपासणी नाका येथे बोलावून सूचनांची कडक कार्यवाही करण्याविषयी सांगितले.

गोवा राज्यातून येणार्‍या प्रत्येकाची तपासणी चालू केल्याने बांदा तपासणी नाक्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यापुढे डंपर चालक, मालवाहू गाड्यांचे चालक, दुचाकीस्वार आणि प्रत्येक वाहनधारक यांचा अहवाल असणे बंधनकारक करण्यात आले आहे.