माळशिरस तालुक्यातील ‘कोविड केअर सेंटर’मध्ये रुग्णांना तात्काळ औषधे उपलब्ध करून द्या !

युवासेनेचे स्वप्निल वाघमारे यांची माजी मंत्री तानाजीराव सावंत यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

तानाजीराव सावंत यांना निवेदन देतांना स्वप्निल वाघमारे आणि उपस्थित कार्यकर्ते

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – सध्या माळशिरस तालुक्यात चालू असणार्‍या अकलूज आणि महाळुंग येथील ‘कोविड केअर सेंटर’मध्ये उपचार घेत असणार्‍या २५० रुग्णांना मागील एक मासापासून कोणत्याही प्रकारच्या औषधगोळ्यांचा पुरवठा होत नाही. त्यामुळे तेथील रुग्ण ‘कोविड सेंटर’ येथे न रहाता घरीच रहाणे पसंत करत आहेत. त्यांना तात्काळ औषधे उपलब्ध करून देण्यासाठी सरकारी स्तरावर प्रयत्न करावेत, अशी मागणी युवासेनेचे जिल्हाप्रमुख स्वप्निल वाघमारे यांनी शिवसेनेचे माजी मंत्री तानाजीराव सावंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

माजी मंत्री तानाजीराव सावंत हे पंढरपूर विभागातील कोरोना महामारीचा आढावा घेण्यासाठी पंढरपूर येथे आले होते. या वेळी घेण्यात आलेल्या बैठकीला शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे, शिवसेनेचे सर्व उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, युवासेना जिल्हा चिटणीस दत्तात्रय गोरे, युवासेनेचे सर्व तालुका आणि शहर पदाधिकारी यांची उपस्थिती होती.