मनमोकळे, सतत सेवारत रहाणारे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर पूर्ण श्रद्धा असलेले मोहन चतुर्भुजकाका (वय ६७ वर्षे) !

कै. मोहन चतुर्भुज

‘३०.४.२०२१ या दिवशी पुणे येथे रहाणारे मोहन चतुर्भुज यांचे दुःखद निधन झाले. काही मासांपूर्वी ते त्यांची पत्नी आणि मुलगी कु. मधुरा यांना रामनाथी आश्रमात पोचवण्यासाठी आले होते. तेव्हा ८ दिवस ते आमच्या खोलीत निवासाला होते. तेव्हा मला जाणवलेली त्यांची काही गुणवैशिष्ट्ये येथे देत आहे.

श्री. प्रकाश मराठे

१. साधी रहाणी

त्यांची रहाणी अगदी साधी होती.

२. मनमोकळेपणा

ते सर्वांशी मनमोकळेपणाने बोलायचे. ‘मनमोकळेपणाने बोलणे’, हे त्यांचे वैशिष्ट्य होते’, असे मला जाणवले.

३. इतरांना साहाय्य करणे

ते खोलीत रहायला आल्यावर लगेचच दुसर्‍या दिवशी मला म्हणाले, ‘‘मी खोलीतील केर काढत जाईन आणि खोली पुसूनही घेईन.’’ त्याप्रमाणे त्यांनी ती सेवा चालूही केली.

४. सतत सेवारत असणे

रामनाथी आश्रमात आल्यानंतर त्यांनी लगेच स्वयंपाकघरात जाऊन ‘काय सेवा आहे का ?’, असेे विचारून घेतले. संध्याकाळी ते भाजी स्वच्छ करतांना दिसले.

५. साधनेचे गांभीर्य

ते अधिकोषात (बँकेमध्ये) मोठ्या पदावर नोकरीला होते आणि पुढच्या मोठ्या पदावर त्यांची पदोन्नती (प्रमोशन) होणार होती, तरी पूर्णवेळ साधना करता येण्यासाठी त्यांनी नोकरीचे त्यागपत्र दिले.

६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर असलेली श्रद्धा !

त्यांना पाठीचा त्रास होता; पण कशाची चिंता न करता ते देवावर आणि श्री गुरूंवर पूर्ण विश्‍वास ठेवून रहात होते. परात्पर गुरु डॉक्टरांवर त्यांची पूर्ण श्रद्धा होती. ‘तेेच आपल्याला तारणार आहेत’, असा त्यांचा भाव होता.

अशा गुणांचा समुच्चय असणारे चतुर्भुजकाका देवाला प्रिय झाले असावेत. त्यामुळे आता ते आमच्यात नाहीत. ‘ईश्‍वर त्यांच्या आत्म्याला सद्गती देवो’, हीच गुरुचरणी प्रार्थना !’

– श्री. प्रकाश रा. मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.५.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक