सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ लाख १० सहस्र जणांनी घेतला पहिला डोस

सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १ लाख १० सहस्र २९१ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. यामध्ये एकूण ९ सहस्र ४३५ आरोग्य कर्मचार्‍यांनी पहिला डोस, तर ६ सहस्र ४३९ जणांनी दुसरा डोस घेतला. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख २२ सहस्र ४८० लसी या ‘कोविशिल्ड’च्या, तर ३६ सहस्र ४५० लसी ‘कोवॅक्सिन’च्या अशा एकूण १ लाख ५८ सहस्र ९३० लसी प्राप्त झाल्या आहेत.

कोरोना संसर्गाच्या काळात सेवा बजावणार्‍या माजी सैनिकांना विमाकवच

सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – भारत सरकारच्या स्वास्थ्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या अंतर्गत कोविड-१९ साठी सेवा बजावणार्‍या आरोग्य सेविकांकरिता विमा योजना चालू केली आहे. ही विमा योजना कोविड-१९ च्या सेवेमध्ये असतांना कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू पावलेल्या किंवा कोविड-१९ सेवेमध्ये असतांना अपघाती मृत्यू झालेल्या माजी सैनिकांनाही लागू आहे. या संबंधीची अधिक माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग येथे उपलब्ध आहे. तरी पात्र लाभार्थ्यांनी या विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

नगराध्यक्ष संजू परब यांनी सावंतवाडीत ‘कोविड केअर सेंटर’ला १५० खाटा दिल्या

सावंतवाडी – नगराध्यक्ष संजू परब यांनी येथील २ ‘कोविड केअर सेंटर’ला एकूण १५० खाटा दिल्या आहेत. यातील उपजिल्हा रुग्णालयातील सेंटरला १३०, तर भोसले पॉलिटेक्निक येथील सेंटरला २० खाटा देण्यात आल्या.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत १२ सहस्र रुग्ण कोरोनामुक्त

उपचार चालू असलेले रुग्ण ५ सहस्र १२०

बरे झालेले एकूण रुग्ण १२ सहस्र २९

मृत्यू झालेले एकूण रुग्ण ४२०

आतापर्यंतचे एकूण रुग्ण १७ सहस्र ५७५