कोरोनाविषयक नियम न पाळणार्‍यांवर गुन्हे नोंद करा !

कणकवली तालुका भाजपची तहसीलदारांकडे मागणी

कणकवली – कणकवली तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन होत आहे. हे नियम पाळण्यात चालढकलपणा केला जात आहे. त्यामुळे कोरोनाविषयक नियमांचा भंग करणार्‍यांवर फौजदारी गुन्हे नोंद करावेत, अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे, नगरसेवक शिशिर परूळेकर यांनी तहसीलदारांकडे केली आहे.

‘कणकवली शहरात कोरोनाविषयक नियमांची कडक कार्यवाही केल्यानंतर शहरातील कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण घटू लागले; मात्र तालुक्याच्या ग्रामीण भागात गृहअलगीकरणात असलेल्या व्यक्ती घराबाहेर फिरतांना दिसत आहेत. कोरोनाबाधित रुग्णाच्या घरातील व्यक्ती कोरोनाशी संबंधित तपासणी करत नाहीत. कोरोनाची तपासणी केल्यानंतर त्याचा अहवाल येईपर्यंत संबंधित व्यक्तीने घराबाहेर न जाण्याचे बंधन असतांनाही नागरिक बाहेर फिरतांना दिसत आहेत. जिल्ह्याच्या बाहेरून आलेल्या व्यक्तींच्या हातावर गृहअलगीकरणाचा

शिक्का मारलेला असतांनाही त्या बाहेर फिरत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे’, असे अण्णा कोदे, मिलिंद मेस्त्री आणि नगरसेवक परूळेकर यांनी तहसीलदारांच्या निदर्शनास आणून दिले.