आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत यांनी अनुभवलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अद्वितीयत्व आणि द्रष्टेपण !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सारख्या अवतारी गुरूंची आणि त्यांच्या अवतारी कार्याची महती माझ्यासारख्या जिवाला काय ज्ञात होणार ? तरीही गेली २३ वर्षे मला स्थुलातून त्यांच्या जवळ रहाण्याचे भाग्य त्यांच्याच कृपेने लाभले आणि त्यांच्या माध्यमातून स्थापन होणार्‍या सनातन धर्मराज्याची (हिंदु राष्ट्राची) जडण-घडण होतांना मला ‘याची देही याची डोळा’ प्रत्यक्ष पहाता आली. जे माझ्या लक्षात आले, ते मी त्यांच्याच कृपेने लिहीत आहे. ११ मे या दिवशी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आश्रम जीवनातून साधकांना दिलेली शिकवण’ या लेखातील काही भाग पाहिला. आज त्याचा पुढील भाग पाहूया.

परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले, संस्थापक, सनातन संस्था.

२३. रामनाथी आश्रम

आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत

२३ अं. कर्तेपणा घालवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न : ‘ईश्वर कर्ता नसून मी कर्ता आहे’, हा साधनेला अत्यंत हानीकारक; परंतु समाजात अत्यंत प्रचलित असा अहंचा एक मूलभूत पैलू आहे. यासंदर्भात भारत भरातील साधकांमध्ये व्यापक आणि सखोल जागृती निर्माण करून कर्तेपणा घालवण्यासाठी त्यांना सखोल मार्गदर्शन केले जाते. साधकांकडून त्यासंदर्भात दैनंदिन प्रयत्न करवून घेतले जातात. हे प्रयत्न करतांना साधकांना आलेल्या अडचणी आणि त्यांच्या शंका यांचे निरसन केले जाते. या प्रयत्नांचा नियमित आढावा घेतला जातो. यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या माध्यमातून संगणकीय प्रणालीद्वारे भारत भरातील साधकांसाठी अनेक साप्ताहिक भावसत्संग घेतले. साधकांना याचा पुष्कळ लाभ झाला.

​‘परात्पर गुरु डॉ. आठवले प्रत्येक साधकाच्या साधनेसाठी आवश्यक अशा प्रत्येक सूत्रासाठी किती व्यापकतेने आणि खोलवर जाऊन प्रयत्नांची पराकाष्ठा करतात !’, हे यातून आपण समजू शकतो.

२३ क.  रामनाथी आश्रम हा हिंदु राष्ट्राची (सनातन धर्मराज्याची, सत्त्वप्रधान; म्हणजेच सज्जन आणि साधक यांच्या राज्याची) प्रतिकृती असणे

२३ क १. रामनाथी आश्रमात हिंदु राष्ट्रात अपेक्षित अशा व्यक्ती, कार्यपद्धती, सात्त्विकता इत्यादींची निर्मिती करण्यात येत असणे : ‘सध्या भारताला (नव्हे जगालाच) ग्रासणार्‍या सर्व समस्यांवरचा सर्वंकष उपाय म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना होय’, हे विविध उदाहरणांतून पुनःपुन्हा लक्षात आले आहे. अन्य सर्व उपायांचा फोलपणाही निर्विवाद सिद्ध झाला आहे. असे हे हिंदु राष्ट्र स्थापन करण्याची प्रक्रिया ईश्वरेच्छेने सर्वत्र चालू आहे. त्याचाच एक भाग म्हणून गोव्यातील रामनाथी येथील सनातनचा आश्रम आहे. सनातनचा रामनाथी आश्रम म्हणजे ‘हिंदु राष्ट्राची प्रतिकृतीच’ होय. हिंदु राष्ट्रात जागृत आणि सजग नागरिक, सात्त्विकता इत्यादींची इथे निर्मिती करण्यात येत आहे.

२३ क २. आश्रमातील प्रत्येक साधक स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रकिया राबवत असल्याने रामनाथी आश्रमात कुटुंबभावना निर्माण झालेली असणे : आज समाजात एका कुटुंबातील ३ – ४ व्यक्तीही गुण्या-गोविंदाने राहू शकत नाहीत. त्यांच्यात सतत संघर्ष आणि कलह रहातो. एकमेकांपासून विभक्त होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. याउलट सनातनच्या या आश्रमात भारतभरातीलच नव्हे, तर विदेशातून आलेलेही सर्व साधक आनंदाने ‘एक कुटुंबभावा’ने रहातात. प्रत्येक साधक स्वतःतील स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्याची प्रक्रिया स्वतःच्या साधनेचा अविभाज्य घटक म्हणून गांभीर्याने करत असल्याने हे साध्य झाले आहे. या आश्रमाच्या स्थापनेला आता १ तपाहून अधिक वर्षे उलटून गेली आहेत.

जिज्ञासू वृत्तीमुळे परात्पर गुरु डॉ. आठवले  यांनी केलेले अध्यात्मशास्त्रातील अद्वितीय संशोधन

‘आध्यात्मिक त्रास’या विषयावर सखोल अभ्यास करून परिपूर्ण उपाय शोधून काढणे

विविध आध्यात्मिक त्रासांच्या निवारणार्थ चर्चा करतांना  योगिराज डॉ. राज अहमद पटेल, सिंधुदुर्ग; प.पू. परूळेकर महाराज, सिंधुदुर्ग आणि  परात्पर गुरु डॉ. आठवले

१. साधकांना त्रास होऊ लागल्यावर तो दूर करण्यासाठी सखोल आणि परिपूर्ण अभ्यास करणे : आध्यात्मिक त्रासाविषयी समाजात मोठ्या प्रमाणात अज्ञान आणि अपसमजुती आहेत. याचे कारण म्हणजे या विषयाचा मूलभूत अभ्यास नसणे आणि बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी केलेला अपप्रचार ! परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वतः साधनेला प्रारंभ केल्यावर काही संतांच्या सान्निध्यात या विषयाचा अभ्यास केला होता; परंतु साधारणतः वर्ष २००० मध्ये सनातनच्या अनेक साधकांना मोठ्या प्रमाणात आध्यात्मिक त्रास जाणवू लागला. त्या वेळी त्यांनी या विषयाचा अत्यंत सखोल आणि परिपूर्ण अभ्यास केला.

२. आध्यात्मिक त्रासाविषयी माहिती असलेल्या संतांना आश्रमात निमंत्रित करून आणि त्रास असलेल्या साधकांना अशा संतांकडे पाठवून उपाय करवून घेणे : साधकांना होणारे त्रास दूर करण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी या विषयाची माहिती असलेल्या आणि या क्षेत्रात कार्य करणार्‍या अनेक संतांना आश्रमात निमंत्रित केले. त्यांच्याकडून याविषयी जाणून घेतले. त्यांच्याकडून साधकांसाठी उपाय करवून घेतले आणि त्या उपायपद्धतींचा सखोल अभ्यासही केला. ‘साधकांसाठी प्रभावी उपाय होऊन ते या त्रासातून मुक्त व्हावेत’, यासाठी त्यांनी उपाय करणार्‍या संतांच्या आश्रमात त्रास असणार्‍या साधकांना पाठवले आणि तिथे त्यांची रहाण्याची अन् उपाय होण्याची व्यवस्थाही केली.

३. स्वतः संतांकडे राहून उपाय करण्याची पद्धत शिकून घेणे : प.पू. शामराव महाराज या संतांकडे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वतः काही मास (महिने) वास्तव्य करून त्यांच्याकडून आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांसाठी उपाय करण्याची पद्धत शिकून घेतली.

४. अथक परिश्रमातून विविध उपायपद्धतींचा शोध घेणे

४ अ. स्वतः रात्रंदिवस जागून सलग अनेक घंटे साधकांसाठी उपाय करणे : परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना आध्यात्मिक त्रासातून मुक्ती मिळावी, यासाठी अनेक दिवस अनेक घंटे सलग नामजपादी उपाय केले आहेत. अनेक वेळा त्यांनी रात्री न झोपता, रात्री १० ते पहाटे ५ असे सलग नामजपादी उपाय करून आणि तरीही दुसर्‍या दिवशी नेहमीचा दिनक्रम ठेवत दुसर्‍या दिवशीही नेहमीप्रमाणेच नामजपादी उपाय केले आहेत.

४ आ. प्रत्येक साधकाचा त्रास पूर्ण जाईपर्यंत न कंटाळता पुढील उपाययोजनेचा वेध आणि शोध घेणे : परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अनेक संतांकडून उपाय करवून घेतल्यावर आणि स्वतः अनेक वर्षे सातत्याने विविध पद्धतींनी उपाय केल्यावरही प्रत्येक साधकाचा त्रास पूर्ण जाईपर्यंत न कंटाळता पुढील-पुढील उपाययोजनांचा वेध आणि शोध अथकपणे घेतला. यातूनच त्यांनी आध्यात्मिक त्रासांवर अनेकविध उपायपद्धती शोधून काढल्या आणि उपायांच्या अनेक पद्धती विकसितही केल्या.

५. उपायांसंदर्भात साधकांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी सहज, सोपे; पण प्रभावी उपाय शोधून काढून त्यांचा उपयोग करवून घेणे : ‘केवळ भारतभरातीलच नव्हे, तर जगभरातील साधकांसाठी एकटेच उपाय कसे करू शकणार ?’, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी उपाय करण्याची क्षमता असणारे साधक आणि संत सर्वत्र निर्माण केले. त्याही पुढे त्यांनी ‘उपायांसाठी साधकांना इतरांवर अवलंबून रहायला लागू नये आणि साधकांनी स्वयंपूर्ण बनावे’, यासाठी साधक सहजतेने प्रत्येक दिवशी दिवसभर करू शकतील असे सोपे; परंतु अत्यंत प्रभावी असे उपाय शोधून काढले. याची काही उदाहरणे म्हणजे अत्तराचा वास घेणे, कापराचा वास घेणे, कापूर लावणे, उदबत्तीचा वास घेणे, प्रज्वलित उदबत्ती जवळ ठेवणे, मीठ घातलेल्या पाण्यात पाय बुडवून बसणे, रिकामे खोके सभोवती ठेवणे, रिकामे खोके डोक्यावर लावणे इत्यादी. या उपायांचा साधकांकडून नियमित वापरही करवून घेतला. या सर्वांमुळे अनेक जन्मांपासून साधकांना असलेल्या आध्यात्मिक त्रासांपासून त्यांना आराम मिळाला. त्यामुळे साधकांचे जीवनमान सुधारले. महत्त्वाचे म्हणजे साधकांच्या साधनेतील मोठा अडथळा दूर झाला.

६. आधुनिक उपकरणांच्या साहाय्याने आध्यात्मिक त्रासाविषयीचे संशोधन करणे : परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आधुनिक उपकरणांचा वापर करूनही आध्यात्मिक त्रास असलेल्या शेकडो साधकांच्या माध्यमातून हे अध्यात्मशास्त्रीय संशोधन केले आहे. ‘जिज्ञासू संशोधकांना पुढील दिशा मिळावी आणि पुढील पिढ्यांना अभ्यास करता यावा’, यासाठी त्यांनी ‘आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांना होत असलेला त्रास, नामजपादी त्यांच्यासाठी केलेले उपाय, उपायांनंतर जाणवलेला पालट, पालट किती काळ टिकला’ इत्यादी सूत्रांचे साधकांच्या शब्दांत लेखी नोंदीही ठेवल्या आहेत. (क्रमश : वाचा उद्याच्या अंकात)

– आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.४.२०१७)

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा ! : https://sanatanprabhat.org/marathi/476598.html

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.