घटनेत टिकणारे आरक्षण द्या अन्यथा राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटतील ! – मराठा क्रांती मोर्चाची चेतावनी

पुणे – राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात फेरविचार याचिका दाखल करण्यासाठी काय पर्याय काढता येतील यावर विचार करावा. तसेच घटनात्मकदृष्ट्या टिकणारे आरक्षण देण्यासाठी गांभीर्याने पावले उचलावीत. अन्यथा राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटतील, अशी चेतावनी मराठा क्रांती मोर्चाने केंद्र आणि राज्य सरकारला दिली आहे. ८ मे या दिवशी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणाच्या संदर्भात भूमिका मांडण्यात आली. मराठा आरक्षणाच्या संदर्भात घेतलेल्या निर्णयाने मराठा समाजात मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला असून अन्य राज्यांमधील इतर समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भातही अनेक प्रश्‍न निर्माण होणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हा समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी सांगितले.

राजकीय नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपामुळे मराठा समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. या समाजात अंगमेहनती कामगार, माथाडी, मजूर, मोलकरीण, रिक्षावाले, डबेवाले, अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर यांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे आरक्षणाविषयी सरकारने गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली.