चंद्रपूर येथे आधुनिक वैद्य आणि जिल्हा प्रशासन यांच्या हलगर्जीपणामुळे कोरोनाबाधित तरुणाचा तडफडून मृत्यू !

प्रतिकात्मक छायाचित्र

चंद्रपूर – ‘कोविड ऑनलाईन मॅनेजमेंट पोर्टल’ रुग्ण भरती करण्याची प्रक्रिया रुग्णांसाठी जीवघेणी ठरली आहे. ६ मेपासून या ‘पोर्टल’वर नोंदणी केलेले कोरोनाबाधित रुग्ण उमेश चिमूरकर (वय ४२ वर्षे) यांना ७ मे या दिवशी ६ घंटेपर्यंत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयात खाट उपलब्ध न झाल्यामुळे त्यांचा रुग्णालयातच तडफडून मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकारी रुग्णालयात उपस्थित असतांनाही या गंभीर रुग्णाला भरती करून घेण्यासाठी टाळाटाळ करण्यात आली. आधुनिक वैद्य आणि जिल्हा प्रशासन यांच्या हलगर्जीपणामुळे या तरुणाचा मृत्यू झाला आहे. कोविड रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजन आणि ‘व्हेंटिलेटर’ खाट उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी ‘कोविड ऑनलाईन मॅनेजमेंट पोर्टल’ ही यंत्रणा रुग्ण भरती करून घेण्यासाठी चालू केली आहे; मात्र वरील घटनेवरून हे ‘ऑनलाईन पोर्टल’ गंभीर रुग्णांसाठी कुठल्याही कामाची नाही, उलट मृत्यूच्या दारात लोटणारी ठरली आहे.

उमेश चिमूरकर आणि त्याचे कुटुंबीय खाट मिळावी, यासाठी सकाळी ११ वाजल्यापासून रुग्णालयात आधुनिक वैद्यांकडे विनंती करत होते. त्याचवेळी त्याच रुग्णालयात चिमूरकर कुटुंबियांना ३ दलाल येऊन भेटले. ‘आम्हाला २-३ सहस्र रुपये द्या. आम्ही आता तुम्हाला याच रुग्णालयात खाट उपलब्ध करून देतो’, असे ते म्हणत होते; मात्र यंत्रणेवर विश्वास असलेल्या या कुटुंबाने पैसे देण्यास नकार दिला. परिणामी खाट मिळाली नाही; मात्र त्या मोबदल्यात रुग्णाला जीव गमवावा लागला.