यवतमाळ येथे अतिरिक्त शुल्क आकारल्याचे प्रकरण
२४ रुग्णांकडून १ लाख ९० सहस्र ८०० रुपये अतिरिक्त घेतले अशा रुग्णालयांवर कठोर कारवाईही करायला हवी !
यवतमाळ, ९ मे (वार्ता.) – जिल्ह्यातील खासगी कोविड रुग्णालयांमध्ये उपचार घेणार्या रुग्णांकडून अतिरिक्त शुल्क घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यामुळे जिल्हा प्रशासनाने तेथे निरीक्षक नियुक्त केले. निरीक्षकांनी अतिरिक्त शुल्काच्या तपासण्या करून जिल्हा प्रशासनाला अहवाल सादर केला अन् संबंधित रुग्णालयांना ४८ घंट्यांच्या आत खुलासा सादर करण्याचे आदेश दिले; मात्र संबंधित रुग्णालयांचे खुलासे समाधानकारक नसल्यामुळे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी नुकतेच शहरातील ५ खासगी रुग्णालयांना अतिरिक्त आकारणीचे शुल्क रुग्णांच्या अधिकोषामध्ये परत करण्याचे आदेश दिले. या पाचही रुग्णालयांत एकूण २४ रुग्णांकडून १ लाख ९० सहस्र ८०० रुपये अतिरिक्त घेतल्याचे निदर्शनास आले आहे. (रुग्णांना ही रक्कम परत देतांना ती सव्याज परत द्यायला हवेत ! – संपादक) ‘अतिरिक्त शुल्क संबंधित रुग्णांच्या खात्यात आदेशाच्या दिनांकापासून ७ दिवसांच्या आत जमा करावे. विहित कालावधीत कार्यवाही झाली नाही, तर प्रशासनाकडून पुढील कारवाई करण्यात येईल. तसेच रक्कम परत न केल्यास प्रतिदिन १ सहस्र रुपये याप्रमाणे दंडाची रक्कम आकारण्यात येईल’, असेही जिल्हाधिकार्यांनी म्हटले आहे.