सातारा शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार यांच्या आईची हत्या !

कायद्याचे भय नसलेले गुन्हेगार ! पोलीस निरीक्षकांच्या आईच असुरक्षित असतील तर अन्य व्यक्तींच्या सुरक्षेचे काय ?

प्रतिकात्मक छायाचित्र

सातारा, ८ मे (वार्ता.) – सातारा शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार यांच्या आई शाबाई शेलार (वय ६५ वर्षे) यांची डोक्यात लोखंडी गज मारून अज्ञात व्यक्तीने हत्या केली आहे. ८ मेच्या पहाटे पुण्यातील वारजे भागातील रामनगर येथे ही घटना घडली. पोलीस पहाटेच घटनास्थळी पोचले असून तपासकार्य चालू केले आहे.
शाबाई शेलार यांचा भंगार विक्रीचा व्यवसाय आहे. भाजीमंडईजवळ त्यांचे दुकान असून त्या तेथेच रहात होत्या. भंगार विक्रीसाठी आलेल्या एकाने हा प्रकार पाहून पहाटेच वारजे पोलिसांना घटनेची माहिती दिली. दळणवळण बंदीच्या काळात हत्यांच्या सत्रांमध्ये वाढ झाली असून गत ४ दिवसांमध्ये पुणे परिसरात ५ हत्या घडल्या आहेत.