आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत यांनी अनुभवलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अद्वितीयत्व आणि द्रष्टेपण !

परात्पर गुरु डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारख्या अवतारी गुरूंची आणि त्यांच्या अवतारी कार्याची महती माझ्यासारख्या जिवाला काय ज्ञात होणार ? तरीही, गेली २३ वर्षे मला स्थुलातून त्यांच्या जवळ रहाण्याचे भाग्य त्यांच्याच कृपेने लाभले आणि त्यांच्या माध्यमातून स्थापन होणार्‍या सनातन धर्मराज्याची (हिंदु राष्ट्राची) जडण-घडण होतांना मला ‘याची देही याची डोळा’ प्रत्यक्ष पहाता आली. जे माझ्या लक्षात आले, ते मी त्यांच्याच कृपेने लिहीत आहे. ६ मे या दिवशी आपण परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वैयक्तिक गुण पाहिले. आज त्यापुढील भाग पाहूया.

मागील भाग पहाण्यासाठी येथे क्लिक करा ः https://sanatanprabhat.org/marathi/474399.html


परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आश्रमजीवनातून साधकांना दिलेली शिकवण

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना संपादकीय टिपणी दाखवतांना तत्कालीन कार्यकारी संपादक डॉ. दुर्गेश सामंत

२०. मुंबई सेवाकेंद्र

२० अ. मुंबई सेवाकेंद्रात पदार्थ पुरवून खाणे : ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आरंभापासूनच साधकांना काटकसर आणि पुरवून खाणे याची सवय लावली. ‘सुका खाऊ किंवा आयत्या वेळी बनवलेले पदार्थ कसे पुरवून खायचे ?’, हे त्यांनी एखाद्या आदर्श गृहिणीप्रमाणे स्वतः लक्ष घालून साधकांना शिकवले, उदा. मुंबई सेवाकेंद्रात डॉ. सुहासकाका (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे धाकटे बंधू) आठवड्यातून एकदा संध्याकाळी सर्व साधकांसाठी कचोर्‍या घेऊन यायचे. त्यासमवेत शेंगदाण्याची सुकी आणि बटाट्याची परतलेली चटणी असायची. तो खाऊ आल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले कचोरी आणि शेंगदाण्याची चटणी साधकांना संध्याकाळी खायला द्यायचे आणि बटाट्याची चटणी रात्रीच्या जेवणासाठी ठेवायचे.

२० अ १. प्रत्येक साधकाच्या सेवेवर लक्ष ठेवणे : मुंबई सेवाकेंद्रात असल्यापासून आतापर्यंत परात्पर गुरु डॉ. आठवले प्रत्येक साधकाच्या सेवेवर स्वतः आणि सतत लक्ष ठेवून ‘साधकाचा वेळ वाया जाणार नाही’, याची दक्षता घेतात. मुंबई सेवाकेंद्राचे कार्य ३ सदनिकांमधून चालायचे. ते स्वतः तिन्ही सदनिकांमधून फेर्‍या मारून ‘साधकांची सेवा कुठपर्यंत आली ? कुणाला पुढची सेवा लागणार ? कुणाचा वेळ अनावश्यक किंवा साधनेला हानीकारक अशा रज-तम गोष्टींमध्ये जात नाही ना ?’, यांकडे लक्ष द्यायचे.

विद्युत् जनित्र (जनरेटर) ठेवण्यासाठी कक्षाच्या बांधकामाच्या वेळी साधकांसह सेवा करतांना १. परात्पर गुरु डॉ. आठवले

२० आ. साधकांना प्राधान्य देणे

२० आ १. साधकांना पुरेशी झोप मिळण्याकडे लक्ष देणे : परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘साधकांचा वेळ वाया जात नाही ना ?’, हे पहात असतांना कधीही साधकांवर अतिरिक्त सेवा करण्यासाठी दबाव दिला नाही. साधकांना त्यांच्या-त्यांच्या आवश्यकतेनुसार पुरेशी झोप मिळण्याकडे परात्पर गुरु डॉ. आठवले जातीने (स्वतः) लक्ष द्यायचे. काही साधकांना इतरांपेक्षा अधिक झोप लागायची. याविषयी कुणी साधकाने आक्षेप घेतला, तर ते नेहमीच साधकांना त्यांच्या आवश्यकतेनुसार झोप घ्यायला सांगायचे. आवश्यकतेनुसार साधक दिवसा झोपले असतील, तर त्यांची झोपमोड होऊ नये, याचीही ते पुरेपूर काळजी घ्यायला लावायचे.

२० आ २. सेवेतून साधकाची आध्यात्मिक उन्नती होण्याकडे कटाक्षाने लक्ष देणे : ‘साधक करत असलेल्या सेवेतून त्या साधकाची साधनेत उन्नती व्हायला हवी’, असा त्यांचा कटाक्ष असतो, उदा. वर्ष २००७ मध्ये डॉ. दुर्गेश सामंत यांची साम्यवाद, समाजवाद इत्यादी विषयांवर दैनिक ‘सनातन प्रभात’मधून लेखमाला छापून येत होती. वाचकांचा तिला चांगला प्रतिसाद लाभला होता, तरीही त्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी डॉ. दुर्गेश यांना चैतन्यमय आणि शाश्वत अशा विषयांवरच लिखाण करण्यास सांगितले.

२० आ ३. साधकांसाठी विविध सेवा उपलब्ध करून देणे : ‘साधकाच्या प्रकृतीनुसार त्याला सेवा मिळावी’, याकरता परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी विविध उपक्रम चालू केले. साधकाची व्यष्टी प्रकृती असो वा समष्टी, तो कोणत्याही वयोगटातील असो, त्याच्याकडे कितीही न्यूनाधिक वेळ असो, तो आश्रमात सेवा करणारा असो अथवा घरी राहून सेवा करणारा असो, ज्याला जी सेवा करायची इच्छा आहे, त्याला त्याच्या आवश्यकतेनुसार परात्पर गुरु डॉ. आठवले आवश्यक ती सेवा उपलब्ध करून देतात.

डॉ. (सौ.) नंदिनी सामंत

२० इ. साधकांकडून सेवा परिपूर्ण होण्यासाठी स्वतः कष्ट घेणे

२० इ १. प्रति गुरुवारी छपाईसाठी जाणार्‍या साप्ताहिकाची सेवा परिपूर्ण करवून घेणे : वर्ष १९९८ मध्ये साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ हे नियतकालिक प्रत्येक गुरुवारी छपाईसाठी जात असे. या साप्ताहिकाचे ‘डीटीपी’ करणे आणि ‘बटर’ काढणे या सेवा मुंबई सेवाकेंद्रातून होत असत. ते अंतिम करतांना लिखाणातील व्याकरण आणि लिखाणाची संरचना (‘फॉर्मॅटिंग’) १०० टक्के नीट होईपर्यंत परात्पर गुरु डॉ. आठवले ते पुनःपुन्हा पहात. त्यासाठी अनेक वेळा त्याचे ‘बटर’ काढावे लागले, तरी ते तसे करायला लावत. यासाठी आवश्यकता भासल्यास ते स्वतः पहाटेपर्यंत जागत; परंतु ‘साप्ताहिक परिपूर्णच निघायला हवे; कारण साधकांची ती साधना आहे’, असा त्यांचा कटाक्ष असायचा. यातून ‘सेवेतील परिपूर्णता कशी असायला हवी ?’, हे त्यांनी साधकांना शिकवले.

२० इ २. प्रत्येक कृती ‘सत्यं शिवं सुन्दरम्’ करायला शिकवणे : ‘ईश्वर ‘सत्यं शिवं सुन्दरम् ।’ असा असल्याने त्याच्याशी एकरूप होण्यासाठी आपणही तसेच बनायला हवे’, असा दृष्टीकोन ठेवून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘प्रत्येक कृती ‘सत्यं शिवं सुन्दरम् ’ कशी करायची ?’, हे साधकांना अत्यंत परिश्रम घेऊन शिकवले. त्यांनी साधकांना ग्रंथांच्या संरचनेपासून ध्वनीचित्र-चकतीमधील अक्षरपट्ट्यांच्या ‘अलाइनमेंट’पर्यंत प्रत्येक गोष्ट परिपूर्ण करायला शिकवले.

२० ई. स्वतःच्या कृतीतून आश्रमाच्या स्वच्छतेची शिस्त लावणे

२० ई १. नियमित स्वच्छतेची शिस्त लावणे : परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सदनिकेत सनातनचे पहिले सेवाकेंद्र चालू झाले. तेव्हापासून त्यांनी साधकांना आश्रमाच्या दैनंदिन आणि मासिक स्वच्छतेची शिस्त लावली. ते स्वतः स्वच्छतेमध्ये लक्ष घालायचे आणि ‘स्वच्छता कशी करायची ?’ ते सांगायचे. परात्पर गुरु डॉक्टर जे साधकांना जमले नाही, ते त्यांच्या लक्षात येईपर्यंत पुनःपुन्हा न कंटाळता समजावून सांगायचे.

२० ई २. आश्रमाच्या स्वच्छतेची घडी बसवणे : पुढे परात्पर गुरु डॉ. आठवले गोव्यात स्थलांतरित झाले. तेव्हा गोव्यातील फोंडा येथे मुंबई येथील सेवाकेंद्राच्या तुलनेत मोठा आश्रम स्थापन झाला. या आश्रमात आल्यावर आश्रमातील सर्व साधक मिळून मासातून (महिन्यातून) एकदा संपूर्ण आश्रमाची स्वच्छता करायचे. तेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले आश्रमाचा माळा, लाकूडसामान, बांधकामाचे सामान इत्यादीच्या स्वच्छतेमध्ये स्वतःही सहभागी व्हायचे आणि ती स्वच्छता कशी करायची, ते स्वतः प्रत्यक्ष शिकवायचे. अशा रितीने त्यांनी आश्रमाच्या स्वच्छतेची घडी बसवून दिली.

२१. फोंडा (गोवा) येथील आश्रम

२१ अ. आश्रम परिसराचे सुशोभिकरण आणि बांधकाम

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आश्रम परिसराचे सुशोभिकरण आणि बांधकाम यांत स्वतः सहभागी होऊन ते काटकसरीने, उपलब्ध वस्तू वापरून आणि साधना म्हणून केले.

२१ अ १. उपलब्ध जागेचा योग्य वापर करण्यासाठी आवश्यक सुधारणा करणे आणि त्या सेवेत स्वतः सक्रीय सहभागी होणे : साधारण वर्ष २०००-२००१ मध्ये गोव्यातील फोंडा येथे आश्रम स्थापन झाला. आश्रमाची ही वास्तू जुनी असल्याने आश्रमाच्या आवश्यकतेनुसार या वास्तूत परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अनेक सुधारणा केल्या. वास्तूच्या बाजूच्या परिसरात लाद्या बसवून आणि वर पत्रे घालून तो परिसर वापरण्यायोग्य बनवणे, विद्युत् जनित्र ठेवलेल्या (जनरेटरच्या) खोलीला ‘स्लॅब’ घालणे, आश्रमातील विहिरीचे पाणी खराब झाले असल्यामुळे ती विहीर बुजवून त्या जागेचा वापर साहित्य ठेवण्यासाठी करणे, अशा अनेक सुधारणा त्यांनाच सुचल्या आणि त्या प्रत्यक्षात आणण्यात त्यांचा स्वतःचा सक्रीय सहभाग होता. ते स्वतः बांधकामासाठी आलेले चिरे (दगड) ट्रकमधून उतरवायचे, तसेच स्लॅबच्या बांधकामात ते स्वतः वर चढून स्लॅब घालण्याच्या कामात सहभागी व्हायचे.

(क्रमश ः वाचा उद्याच्या अंकात)

– आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.४.२०१७)

पुढील भाग पहाण्याठी येथे क्लिक करा ः https://sanatanprabhat.org/marathi/475043.html