परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारख्या अवतारी गुरूंची आणि त्यांच्या अवतारी कार्याची महती माझ्यासारख्या जिवाला काय ज्ञात होणार ? तरीही, गेली २३ वर्षे मला स्थुलातून त्यांच्या जवळ रहाण्याचे भाग्य त्यांच्याच कृपेने लाभले आणि त्यांच्या माध्यमातून स्थापन होणार्या सनातन धर्मराज्याची (हिंदु राष्ट्राची) जडण-घडण होतांना मला ‘याची देही याची डोळा’ प्रत्यक्ष पहाता आली. जे माझ्या लक्षात आले, ते मी त्यांच्याच कृपेने लिहित आहे. ५ मे या दिवशी आपण परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे काही वैयक्तिक गुण पाहिले. आज त्यापुढील भाग पाहूया.
मागील भाग पहाण्यासाठी येथे क्लिक करा ः https://sanatanprabhat.org/marathi/474150.html
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वैयक्तिक गुण
१३. कार्यापेक्षा साधक महत्त्वाचे असणे
त्यांच्या सर्व कार्यांत त्यांना सर्वांत महत्त्वाचे आहेत, ते साधक ! याची आपल्या नित्य आणि सातत्यपूर्ण व्यवहारातून त्यांनी साधक, धर्माभिमानी, हितचिंतक यांना सदोदित प्रचीती दिली आहे.
१४. सर्वांचे आणि सगळ्या गोष्टींचे कौतुक करणे
सर्वसाधारणतः ज्याविषयी आपल्याला ठाऊक नसते, जे आपल्याला सहजसाध्य नसते अथवा जे आपल्याकडे नसते, त्याविषयी आपल्याला कौतुक असते; परंतु परात्पर गुरु डॉ. आठवले सर्वज्ञ असून, त्यांना सर्व सहजसाध्य असून त्यांनी एवढे मोठे कार्य एकहाती उभे केलेले असूनही त्यांना अक्षरशः सगळ्यांचे आणि सगळ्या गोष्टींचे सदैव कौतुक असते.
१५. चुका सांगणे आणि गुणांचे कौतुकही करणे
परात्पर गुरु डॉ. आठवले स्वतः प्रसार करत असतांना अगदी १९९३ पासून मी पहात आहे की, ते साधकांच्या चुका, चुकीचे दृष्टीकोन, अहंचे पैलू, तसेच त्यांनी केलेले चांगले प्रयत्न उघडपणे अभ्यासवर्गांतून सांगत असत. यासाठी ते साधकांनी त्यांना लिहिलेल्या पत्रांवर खुणा करून आणत असत आणि अभ्यासवर्गात उघडपणे तो भाग वाचून दाखवत किंवा प्रसंग कथन करत. यातून एवढ्या आधीपासून त्यांनी ‘अयोग्य काय आहे ?’, ते स्पष्टपणे सांगत ‘साधकत्वाचे योग्य दृष्टीकोन काय असावेत ?’, हे साधकांच्या मनावर सतत बिंबवले. जे चूक आहे, ते ते स्पष्टपणे साधकांच्या तोंडावर परखडपणे सांगत. यात त्यांनी साधकांना कधीही मानसिक स्तरावर सांभाळण्याचा प्रयत्न केला नाही.
१६. प्रसिद्धीपराङ्गमुख असणे
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अध्यात्म आणि हिंदुत्व या क्षेत्रांत ‘न भूतो न भविष्यति’ असे अभूतपूर्व कार्य केलेले आहे, तरीही ते प्रसिद्धीपराङ्गमुख आहेत. ते कुठेही सार्वजनिक सभा, दर्शन सोहळे अशा कार्यक्रमांत दिसत नाहीत. त्यांचे वास्तव्य असलेल्या आश्रमात रहाणारे साधक आणि अन्य ठिकाणाहून भेटीला येणारे साधक, हितचिंतक किंवा हिंदुत्वनिष्ठ यांच्या संदर्भातही ‘दर्शन सोहळा’ सदृश कार्यक्रम कधीच नसतात.
१७. कोणत्याही गोष्टीचे श्रेय स्वतःकडे न घेणे
परात्पर गुरु डॉक्टर सर्वकाही करूनही कोणत्याही गोष्टीचे श्रेय स्वतःकडे कधीच घेत नाहीत. ते सातत्याने अन्य संत, महर्षि, ईश्वर अथवा गुरु यांनाच ते श्रेय देत असतात.
१८. वेगळे सूत्र
१८ अ. महिलांचे सशक्तीकरण : या विषयावर अनेक राजकारणी आणि समाजसेवक केवळ गप्पा मारतात. क्वचित् एखादा यासाठी प्रत्यक्ष प्रयत्न करतांना आढळतो; परंतु ते प्रयत्नसुद्धा ‘कुठे शैक्षणिक किंवा आर्थिक साहाय्य कर, एखादे पद दे’, असे वरवरचे असतात. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘सर्व समस्यांचे ८० टक्के कारण आध्यात्मिक असते’, हे जाणून त्यावर ‘साधना करणे’, हा मूलभूत उपाय आहे’, हे जाणून जिज्ञासूंना योग्य साधना शिकवली आणि प्रत्यक्ष देखरेखीखाली त्यांच्याकडून करवून घेतली. कालमहिम्याप्रमाणे सध्याच्या काळात देवीतत्त्व अधिक कार्यरत असल्याने सनातनच्या कार्यात महिलांचा पुष्कळ मोठा सहभाग दिसून येतो. सनातनच्या कार्याची धुरा संभाळणार्यांमध्ये महिला सर्वाधिक संख्येने आहेत. विशेष म्हणजे यांतील अनेक महिला गृहिणी किंवा ग्रामीण भागातील आहेत. स्वतःच्या जीवनातील समस्यांचा समर्थपणे सामना करून समाजातील अन्यांना हे शिकवणार्या या साधिका पाहिल्या की, ‘केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीच खर्या अर्थाने ‘महिलांचे सशक्तीकरण’ केले आहे’, याची निश्चिती पटते.
१९. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची आगळी-वेगळी वैशिष्ट्ये
१९ अ. इतरत्रच्या संतांना एक उत्तराधिकारी न मिळणे, तर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अनेक उत्तरदायी साधक निर्माण करणे : अनेक संप्रदायांतील संतांनी वारंवार त्यांची व्यथा मांडली आहे की, ‘त्यांना त्यांचे कार्य यथार्थपणे पुढे नेणारा एकही लायक उत्तराधिकारी मिळत नाही.’ त्यामुळे कठोर मेहनतीने त्यांनी मिळवलेले ज्ञान घ्यायला आणि त्यांनी निर्माण केलेले कार्य पुढे चालवायला कुणीच नसल्याने ते कालौघात नष्ट होते. काही ठिकाणी तथाकथित उत्तराधिकार्यांची साधनेची घडी नीट नसल्याने त्यांची आपापसांत भांडणे होतात. याच्या अगदी उलट चित्र सनातनमध्ये दिसते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संस्थेच्या कार्यारंभानंतर १० वर्षांतच कार्याची धुरा अन्य साधकांकडे सोपवून त्यांना त्यातून घडवले. त्यामुळेच पुढील १५ वर्षांत अनेक साधक जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून पार झाले (६० टक्के आध्यात्मिक पातळी) आणि संतपदही गाठू शकले. यातील अनेक साधक संस्थेच्या जगभर पसरलेल्या कार्याचा व्याप समर्थपणे सांभाळत आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांच्या हयातीतच असे अनेक समर्थ साधक घडवल्याने ‘त्यांच्या पश्चात सनातनच्या कार्याचे काय होणार ?’, याविषयी कोणतीच शंका राहिलेली नाही.
१९ आ. ‘मोठी समष्टी’ लीलया घडवणे : आजवरचा इतिहास पहाता अनेक मोठमोठ्या संप्रदायांतूनही हाताच्या बोटांवर मोजता येण्याइतके शिष्य आणि कार्य निर्माण झाल्याचे दिसते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या केवळ आतापर्यंतच्या कार्याचा आवाका पहाता त्यांनी सनातनमध्ये आणि त्याच्या बाहेरही आजच्या रज-तम प्रधान काळात साधकत्व असलेली एक मोठी समष्टी लीलया घडवली आहे.
१९ इ. एकाच वेळी ‘राजर्षि’ आणि ‘महर्षि’ यांची गुणवैशिष्ट्ये असलेले अद्वितीय परात्पर गुरु डॉ. आठवले ! : पूर्वीच्या काळच्या ऋषींचे ‘राजर्षि’ आणि ‘महर्षि’ असे दोन प्रकार आपण ऐकले अथवा वाचले आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची गुणवैशिष्ट्ये पहाता त्यांच्यात ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज दोन्ही पुरेपूर असल्याने ‘ते राजर्षिही आहेत आणि महर्षिही आहेत’, हे लक्षात येते.’
इतरांना प्राधान्य देणे
अगदी आरंभापासून परात्पर गुरु डॉ. आठवले यांना इतरांना प्राधान्य देतांना मी पाहिले आहे. ते एखाद्या सेवेत कितीही व्यस्त असले आणि कुणी त्यांच्याकडे काही शंका विचारायला अथवा आपले अन्य काही काम घेऊन गेले, तर ते आपल्या हातातील काम बाजूला सारून आधी त्यांच्याकडे आलेल्या व्यक्तीच्या कामाला प्राधान्य द्यायचे. त्यांनी कधीच ‘माझ्या हातातील काम पूर्ण करतो, मग तुम्हाला बोलवतो’, असे म्हटले नाही. हाच गुण त्यांनी त्यांच्यासह सेवा करणार्या साधकांमध्येही रुजवला आहे.
परात्पर गुरु डॉ. आठवले त्यांच्याकडे आलेल्याचे बोलणे पूर्ण एकाग्रतेने ऐकून घेतात आणि त्याला आवश्यक आहे तेवढा वेळ देतात. त्यांच्याशी कुणी बोलायला आले असतांना ‘माझा वेळ वाया जात आहे, माझी अनेक महत्त्वाची कामे पडली आहेत, हे लवकर का आवरत नाहीत ?’, अशा विचारांनी त्यांना कधीही अस्वस्थ होतांना पाहिलेले नाही. त्यांच्याशी बोलतांना ‘त्यांना आपल्यासाठी भरपूर वेळ आहे, त्यांना आपल्याशी बोलणे आवडत आहे’, असेच वाटत रहाते.
साधकांच्या प्रयत्नांचे उत्स्फूर्त कौतुक करणे
परात्पर गुरु डॉ. आठवले साधकाने केलेल्या छोट्यात-छोट्या ते मोठ्या चांगल्या प्रयत्नाची प्रत्येक वेळी तत्परतेने नोंद घेतात. तसे ते त्याला स्पष्टपणे सांगतात आणि त्यासाठी कौतुक म्हणून त्याला खाऊही देतात.
(क्रमशः वाचा उद्याच्या अंकात)
– आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.४.२०१७)
पुढील भाग पहाण्याठी येथे क्लिक करा ः https://sanatanprabhat.org/marathi/474720.html