८ वर्षांच्या मुलाला विष पाजून आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या पित्याला जन्मठेप

सातारा – कौटुंबिक कलहातून ८ वर्षांच्या मुलाला विष पाजून स्वत: आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या वडिलांना जिल्हा मुख्य न्यायाधीश आर्.डी. सावंत यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे) जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.

संतोष लक्ष्मण भिंगारे असे जन्मठेप झालेल्या पित्याचे नाव असून त्यांची पत्नी वैशाली आणि संतोष यांच्यात सतत वाद होत असत. त्यामुळे पती-पत्नी वेगवेगळ्या गावी रहात होते. त्यांना दोन मुले होती. ती वैशाली यांच्याकडे होती. संतोष यांनी एकेदिवशी मुलांची शाळा गाठून शिवराज या मुलाला शाळेतून आणले. शिक्षकांनी वडील असल्याने मुलाचा ताबा दिला आणि वैशाली यांना कळवले. संतोष यांनी मुलाला स्वत:च्या गावी आणून स्वत: आणि शिवराज याला विष पाजले आणि वैशालीला याची माहिती भ्रमणभाषद्वारे दिली. दोघांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले; मात्र १० मार्च २०१७ या दिवशी शिवराज याचा मृत्यू झाला. वैशाली यांनी याविषयी भुईंज पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार भुईंज पोलिसांनी तपास करून जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. साक्षीदारांच्या साक्षी आणि साहाय्यक सरकारी अधिवक्ता नितीन मुके यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायाधीश सावंत यांनी संतोष यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.