साधकांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे श्रीविष्णुरूपात दर्शन घेण्याची पर्वणी ठरलेला ‘ऑनलाईन’ भावसोहळा !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा ७९ वा जन्मोत्सव !

‘गुरु परमेश्‍वर गुरु माऊली ।
सदा कृपेची देई साऊली ।
भक्तांसाठी गुरु होऊनी देव घेई अवतार ॥’

याची सनातनच्या साधकांनी घेतली प्रचीती

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे औक्षण करतांना श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि श्रीसत्‌शक्ति(सौ.) बिंदा सिंगबाळ (वर्ष २०१९)

रामनाथी (गोवा) – सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा जन्मोत्सव म्हणजे साधकांना भरभरून चैतन्य आणि आनंद मिळण्याची महापर्वणी ! प्रीतीस्वरूप, कृपावत्सल, करूणाकर अशा श्रीगुरूंच्या केवळ दर्शनाने भयमुक्त, चिंतामुक्त होऊन संकटांचा भवसागर पार होतो, याची अनुभूती शेकडो साधकांनी घेतली आहे. महर्षींच्या आज्ञेने परात्पर गुरुदेवांचा जन्मोत्सव साजरा करण्यात येतो; मात्र यावर्षी कोरोना महामारीमुळे जन्मोत्सव साजरा करता आला नाही. २ मे २०२१ या दिवशी जन्मोत्सवाच्या निमित्ताने ‘ऑनलाईन’ भावसत्संगात यापूर्वीच्या जन्मोत्सवांमध्ये परात्पर गुरुदेवांनी साधकांना श्रीविष्णु आणि श्रीराम रूपात दिलेल्या दर्शनाच्या ध्वनीचित्रचकत्या दाखवण्यात आल्या. त्यामुळे साधकांना पुन्हा एकदा गुुरुमाऊलींच्या अवतारत्वाची अनुभूती घेण्याचे भाग्य लाभले. या घोर आपत्काळातही या भावसोहळ्याद्वारे साधकांवर कृपावर्षाव करणार्‍या गुरुमाऊलींविषयी साधकांनी मनोमन कृतज्ञता व्यक्त केली.

साधकांच्या भक्तीभावामध्ये वाढ  !

कोरोनारूपी आपत्काळामुळे सर्वत्र अशांती, अस्वस्थता आणि दुःखी वातावरण आहे. अधर्म माजल्यावर ईश्‍वर अवतार घेऊन साधक आणि सज्जन यांचे रक्षण करतो. ही ध्वनीचित्रचकती पहातांना साधकांना त्या वचनाची आठवण झाली. साधक विष्णुलोकातील आनंद अनुभवत होते. ‘श्रीमन्नारायणस्वरूप गुरुमाऊली साक्षात् आपल्या समवेत असून कृपेचा वर्षाव करत आहेत’, याची अनुभूती साधकांनी घेतली. ही ध्वनीचित्रचकती म्हणजे साधकांमध्ये गुरूंविषयी श्रद्धा आणि भावभक्ती वाढवणारा एक अनुपम सोहळा होता.

असा झाला ‘ऑनलाईन’ भावसत्संग !

१. प्रारंभी यापूर्वी झालेला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा विष्णुरूपातील ‘डोलोत्सव’ (झोपाळ्यावर बसवून स्तुती करणे) याविषयीची ध्वनीचित्रफीत दाखवण्यात आली.

२. त्यानंतर साधकांना श्रीरामरूपातील परात्पर गुरुदेवांचे दर्शन झाले.

क्षणचित्र

परात्पर गुरु डॉक्टरांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात रांगोळ्या काढून आणि पणत्या लावून साधेपणाने सजावट करण्यात आली होती.