ओ पालनहारे… !

सृष्टीची उत्पत्ती ब्रह्मदेवाने केली, त्याचे पालन भगवान विष्णु करत आहे, तर भगवान शिव लय करणारा आहे. सृष्टीवर जेव्हा जेव्हा संकट आले, तेव्हा देव, देवी, ऋषि, मुनी, भक्त यांनी भगवान विष्णूचा धावा केला आणि त्यांच्या रक्षणासाठी, धर्माच्या संस्थापनेसाठी भगवान विष्णूने ९ अवतार घेतले. मत्स्य, वराह, कूर्म हे अवतार तर प्राण्यांच्या रूपात घेतले आहेत. म्हणजे देव भक्तांच्या रक्षणासाठी कुठलेही रूप धारण करू शकतो. नरसिंह रूपातूनही देवाने हेच दाखवून दिले आहे. देवाने आपले रक्षण करावे, यासाठी आपण देवाचे भक्त होणेच आवश्यक असते. भक्त प्रल्हादाला ठार करण्याचे अनेक प्रयत्न हिरण्यकश्यपूने केले; मात्र तरीही तो भक्त प्रल्हादाला मारू शकला नाही. युगानुयुगे देव भक्तांचे रक्षण करत आला आहे, करत आहे आणि पुढेही करणार आहे.

ओ पालनहारे निर्गुण और न्यारे ।
तुमरे बिन हमरा कौनो नाहीं ।
हमरी उलझन, सुलझाओ भगवन ।
तुमरे बिन हमरा कौनो नाहीं ॥

अशी आर्तता प्राण कंठाशी आल्यावर देवावर श्रद्धा नसणार्‍या व्यक्तीतही निर्माण होत असते; मात्र केवळ अशा आर्ततेनेच भगवंत साहाय्यास धावून येत नाही, तर तो साधकांच्या, भक्तांच्या रक्षणासाठी धावून येत असतो. आयुष्यभर देवासाठी तन, मन आणि धन यांचा त्याग न करणार्‍यांनी प्राण कंठाशी आल्यावर देवाचा धावा केला, तर  देवाने तरी का वाचवावे ?, असा प्रश्‍न उपस्थित होतो. असे असले, तरी देव दयाळू आहे. जे भविष्यात साधना करू शकतील त्यांचे देव रक्षण करतो. महाभारताच्या युद्धात पक्षिणीचे तिच्या पिल्लांसह रक्षण भगवान श्रीकृष्णाने केल्याची गोष्ट ठाऊकच आहे. भाव असेल, तर मनुष्यच काय देव प्राण्यांचेही रक्षण करतो, हे गजेंद्रमोक्षाच्या घटनेतून आपल्याला अधिक स्पष्ट होते. तलावामध्ये मगरीने गजेंद्राचा पाय पकडल्यावर सुटकेसाठी विव्हळणार्‍या गजेंद्राने आर्ततेने कमलदल भगवान विष्णूला अर्पण केल्यावर त्वरित भगवंताने त्याचे रक्षण केले. त्यामुळे असा भगवंत आपले रक्षण करणार नाही, असे होऊ शकत नाही. देवांप्रमाणेच गुरु, संत हेही त्यांच्या भक्तांचे, शिष्यांचे, साधकांचे रक्षण करत असतात. या घटनांतून भक्तांची श्रद्धा अधिक दृढ होत असते. गुरु, संत हे देवाचे सगुण रूप असल्याने ते देवाचेच कार्य करत असतात. त्यांची कृपा संपादन करण्यासाठी भाव असणे आवश्यक आहे. आज भारतातील बहुसंख्य हिंदू आस्तिक आहेत. काही तरी देवाचे करत असतात; मात्र प्रतिदिन तन, मन आणि धन ईश्‍वरासाठी अर्पण केले पाहिजे, म्हणजेच साधना करायला हवी, तसे अत्यल्प हिंदू करतात. त्यामुळे साधना न करणार्‍या हिंदूंवर देवाची कृपा होत नाही. अनेक हिंदू सकाम म्हणजे धन, घर, नोकरी, विवाह, अपत्य आदींच्या प्राप्तीसाठी देवाचे काही तरी करत असतात. त्यामुळे देव त्यांना त्या स्तरावर साहाय्य करत असतो. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने म्हटले आहे, ‘निष्काम जो माझा भक्त त्याच्या सर्व अपेक्षा मी पूर्ण करतो.’ अशी निष्काम भक्ती करणार्‍या भक्ताच्या पाठीशी देव सदैव असतो.

देवाला शरण कधी जाणार ?

लोकांनी जीवन विम्यामध्ये गुंतवणूक करावी, यासाठी अनेक जीवन विमा आस्थापने भविष्यात संकट आल्यास विम्याचे पैसे कामी येतील, असे सांगत असतात. त्यामुळे देशातच नव्हे, तर जगभरात लोक विमा उतरवत असतात. विम्याचे पैसे मिळतील, याची शाश्‍वती लोकांमध्ये असते. तसा विश्‍वास देवावर, गुरूंवर ठेवण्यासाठी निष्काम भक्ती वाढवली पाहिजे. सध्याच्या कोरोनाच्या संकटाच्या वेळी जी काही देशातील नागरिकांची स्थिती निर्माण झाली आहे, ते पहाता लोकांनी देवाचा धावा करण्याचीच स्थिती आहे. कोरोनामुळे नागरिक घाबरलेले आहेत. गेल्या वर्षी नागरिकांना कोरोनाचा तितका त्रास भोगावा लागला नाही; मात्र यावर्षी त्याचे प्रचंड आक्राळविक्राळ रूप दिसून आले आहे. या वेळी शासनकर्ते, प्रशासन, डॉक्टर यांच्याकडून लोकांच्या प्राणांचे रक्षण होण्याची स्थितीही राहिलेली नाही. हे कमी म्हणून कि काय, तर मानवी चुकांमुळे घडणार्‍या घटनांतही लोकांचा मृत्यू होत आहे, हे नाशिक आणि विरार येथील घटनांमध्ये दिसून आले आहे. अशा आपत्काळात लोकांकडे कितीही पैसे असेल, तरी ते कामी येत नाहीत, हे अधिक स्पष्ट झाले आहे. असा काळ येणार आहे हे द्रष्टे, संत आणि गुरु गेली काही वर्षे सांगत आले आहेत.

पांडव बना !

महाभारतात युद्ध अटळ झाले होते. ते भगवान श्रीकृष्ण रोखू शकले असते; मात्र ते होणे ईश्‍वर इच्छा होती. त्यामुळे ते घडले आणि त्यात भयंकर विनाश झाला. श्रीकृष्णाने युद्ध न रोखल्याने त्यात कौरवांचा नाश झाला. या युद्धात त्याने त्याच्या भक्त असणार्‍या पांडवांचे रक्षण केले. सध्याचा आपत्काळ ही ईश्‍वरेच्छा आहे. पुढे येणार्‍या सत्ययुगासाठी आपत्काळ येणे आवश्यकच आहे. त्यात विनाश अटळ आहे, ती ईश्‍वरेच्छा आहे. या विनाशामध्ये स्वतःचे रक्षण होण्यासाठी पांडव व्हावे लागेल. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही नुकतेच म्हटले होते, ‘धर्म, अध्यात्म, तसेच सुस्वर रामचरितमानस यांच्या पठणामुळे कोरोनापासून रक्षण होऊ शकते.’ हे लोकांच्या लक्षात आले आहे. त्यातही सध्याच्या आपत्काळापेक्षा अधिक तीव्र आपत्काळ पुढे येणार आहे. यात तिसरे महायुद्ध, भूकंप, पूर, संसर्गजन्य आजार, अन्नपाण्याचा तुटवडा आदी संकटे येणार आहेत, असे द्रष्टे, संत, गुरु सांगत आहेत. आताच्या स्थितीतच शासनकर्ते जनतेचे रक्षण करू शकत नाहीत, असेच चित्र आहे, तर पुढच्या तीव्र आपत्काळात ते जनतेचे रक्षण करतील, असे ठामपणे सांगता येणार नाही. अशा वेळी देशात अराजक स्थिती निर्माण होऊ शकते. त्याच वेळी दंगली, हिंसाचार निर्माण झाला, तर स्थिती आणखी कठीण होऊ शकेल. अशा वेळी पांडवांप्रमाणे भगवंताची, गुरूंची, संतांची दास्य भक्ती असेल, त्यात आर्तता असेल, तर  भगवंत, गुरु, संत पांडवांप्रमाणे आपले पालनहार होऊन रक्षण करतील. ती आर्तता निर्माण करण्याचा प्रयत्न करा. आताच्या काळात पांडव बनूया !