हिंदूंच्या प्रसिद्ध देवस्थानांचा कोरोना रोखण्यासाठी रुग्णालये, विविध सेवा, औषधे आदी माध्यमांतून सक्रीय सहभाग

  • एकीकडे हिंदूंची मंदिरे कोरोनाबाधितांना सर्वतोपरी साहाय्य करत आहेत, तर दुसरीकडे ‘कोरोनाच्या परिस्थितीचा अपलाभ उठवत काही चर्च हिंदूंचे धर्मांतर करण्यात मग्न आहेत’, असे वृत्त प्रसिद्ध झाले आहे !
  • कोरोनाबाधितांना इतक्या मोठ्या प्रमाणात साहाय्य कुठल्या मशिदीने केल्याचे ऐकिवात आहे का ?
  • कोरोनाच्या नावाखाली मंदिरे बंद करण्यावरून आकाश-पाताळ एक करणारे पुरो(अधो)गामी, नास्तिकतावादी, साम्यवादी आता मंदिरांच्या या कृतीविषयी चकार शब्द काढत नाहीत, हे लक्षात घ्या !

मुंबई – कोरोना रोखण्यासाठी हिंदूंच्या विविध ठिकाणच्या प्रसिद्ध मंदिरांकडून निधीच्या किंवा सेवेच्या माध्यमातून साहाय्य करण्यात येत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी एक असलेले श्री लेण्याद्री गणपति देवस्थान, शिर्डी येथील श्री साई देवस्थान, शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थान, वडोदरा (गुजरात) येथील श्री स्वामी नारायण मंदिर आदी विविध देवस्थानांचा समावेश आहे.

श्री शिर्डी देवस्थानकडून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाला ५१ कोटी रुपये इतका निधी देण्यात आला आहे. श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्टकडून तुळजापूर येथे कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी ३०० खाटांचे सुसज्ज रुग्णालय उभारण्यात येत आहे. यामध्ये १५० खाटा ‘ऑक्सिजन बेड’च्या असणार आहेत.

श्री लेण्याद्री गणपति देवस्थानकडून २५ सहस्र चौरस फुटांचा सभामंडप !

पुणे येथील लेण्याद्री गणपति देवस्थानच्या वतीने कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी २५ सहस्र चौरस फुटांचा सभामंडप उभारला आहे. यासह ६४ खोल्या आणि अन्य २ सभागृह शासनाला कोरोनावरील उपचारांसाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या ठिकाणी आतापर्यंत ४ सहस्र ७०० हून अधिक कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात आले. आतापर्यंत ३ सहस्र ५०० हून अधिक रुग्ण येथील उपचाराने बरे झाले आहेत. येथील कोविड सेंटरमध्ये एकाचवेळी ३५० कोरोनाबाधित रुग्णांना उपचार घेता येतात. येथे कोणत्याही रुग्णाकडून पैसे न घेता विनामूल्य उपचार केले जातात. इतकेच नव्हे, तर येथे रुग्णांना चहा, दूध, अल्पाहार आणि भोजन विनामूल्य उपलब्ध करून दिले जाते. रुग्णांसाठी ऑक्सिजनची व्यवस्थाही केली आहे.

शेगाव गजानन महाराज संस्थेने पंढरपूर येथे १०० खाटांचा कक्ष उभारला !

शेगाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थानकडून पंढरपुरात १०० खाटांचा विलगीकरण कक्ष उभारण्यात आला आहे. या ठिकाणी प्रत्येकाला २ वेळा पोटभर भोजन दिले जाते. संस्थानकडून रुग्णांना औषधेही दिली जातात. या ठिकाणी संस्थानकडून नियमित स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण केले जाते. यासह शहरातील बेघर, गरीब यांनाही संस्थानकडून भोजनाची व्यवस्था केली जाते.

वडोदरा (गुजरात) येथील श्री स्वामीनारायण मंदिराने उभारले ५०० खाटांचे कोविड रुग्णालय !

वडोदरा (गुजरात) येथील श्री स्वामीनारायण मंदिराने ५०० खाटांचे कोविड रुग्णालय उभारले आहे. या ठिकाणी ‘लिक्विड ऑक्सिजन’ची टाकी बसण्यात आली असून रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. या ठिकाणी अतीदक्षता विभागातील खाटा आणि ‘व्हेंटिलेटर बेड’ उभारण्याचे प्रस्तावित आहे. येथे भक्तगण स्वत: कोविड रुग्णालयात जाऊन रुग्णांची आस्थेने विचारपूस करतात.