लोकप्रतिनिधींनी आपत्तीच्या वेळी आणि अन्य वेळीही इतरांना सुविधा घेण्यासाठी प्राधान्य देणे हे त्यांचे दायित्व आहे. जनतेला त्यांचा त्रास झाल्यास जनतेचा विश्वास ते कधी संपादू शकणार का ?
सातारा, २९ एप्रिल (वार्ता.) – संपूर्ण जिल्ह्यात लसीकरण चालू आहे. आरोग्य विभागाने नगरपालिकेच्या साहाय्याने लसीकरण चालू केल्यामुळे सातारा शहरातील कस्तुरबा रुग्णालय आणि गोडोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्र यांमध्ये लसीकरण चालू आहे. शहरातील ४५ वर्षांवरील नागरिक सकाळी ६ वाजल्यापासून लसीकरण केंद्राबाहेर रांगा लावत आहेत; मात्र लोकप्रतिनिधी आणि त्यांचे नातेवाईक रांगेत उभे न रहाता सवडीने येऊन लस घेऊन जात आहेत, असे चित्र पहायला मिळत आहे.
सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरणासाठी येणारे आरोग्य कर्मचारी १० वाजता येत आहेत. त्यातच दिवसाला केवळ १०० लसीकरण करण्याचे निश्चित केल्यामुळे नागरिक दिवस उगवला की, त्वरित लसीकरण केंद्र गाठत आहेत. घंटोन्घंटे रांगेत उभे राहिल्यानंतर लसीकरणासाठी क्रमांक येत आहे; मात्र त्यातही लोकप्रतिनिधी आणि त्यांने नातेवाईक हे मागील दाराने जाऊन नोंदणी करून लस टोचून घेत आहेत. सातारा नगरपालिकेच्या मक्तेदारीने लसीकरण चालू असल्यामुळे लोकप्रतिनिधींना कसे बोलायचे, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.