आई कोरोनाबाधित ! ११ दिवसांचे अर्भक शेजारणीने सांभाळले !

माणुसकीचे अनोखे दर्शन !

माणुसकीचे अनोखे दर्शन !

कडेगाव (सांगली) – कोरोना महामारीच्या काळात एकीकडे भीतीपोटी मृत नातेवाइकांचे अग्निसंस्कार टाळणारे सगेसोयरे, तर दुसरीकडे नवजात कोरोनाबाधित मातेचे ११ दिवसांचे अर्भक शेजारणीने सांभाळून माणुसकीचे अनोखे दर्शन घडवले.

एका कोरोनाबाधित मातेने नवजात अर्भकाला कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये जन्म दिला. बाळाची तब्येत नाजूक असल्याने त्याला काचेच्या पेटीत ठेवण्यात आले. ११ दिवसांनी मातेला सोडण्यात आले. त्या वेळी बाळाला मातेपासून दूर ठेवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला; कारण त्या मातेसोबत घरातील आणखी दोघांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे बाळाच्या मातेने शेजारी रहात असलेली आपली मैत्रीण सौ. ऐश्‍वर्या वेल्हाळ यांना बाळाला सांभाळण्याची विनंती केली. ऐश्‍वर्या यांनी कोणतेही आढेवेढे न घेता ते सहजपणे मान्य केले. घरातील नवरा, सासरे, अन्य कुटुंबियांनीही यास सहमती दिली. ऐश्‍वर्या यांनी वीस दिवसापर्यंत स्वतःच्या बाळाप्रमाणे औषध पाण्यासह त्या बाळाचे संगोपन केले. त्यांनी दाखवलेल्या या अनोख्या माणुसकीचे समाजातून कौतुक होत आहे.