जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढूनही आढावा बैठक न घेतल्याचे प्रकरण
सोलापूर – पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची आचारसंहिता जिल्ह्यात सर्वत्र लागू होती. त्यामुळे कोरोनाविषयी बैठका घेण्यावर आणि उपाययोजनांचे निर्णय घेण्यासाठी अडचण निर्माण होत होती, असे कारण पुढे करून पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पत्रकारांसमोर त्यांची बाजू मांडत सारवासारव केली. मागील दीड मासापासून पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असूनही कोणत्याही प्रकारची आढावा बैठक किंवा पत्रकार परिषद घेतली नाही. यावरून त्यांच्यावर पुष्कळ टीकाही करण्यात आली होती.
या पार्श्वभूमीवर २३ एप्रिलपासून पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ३ दिवस सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी आढावा बैठका घेण्याचे नियोजन केले. यानिमित्ताने घेण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी पालकमंत्री भरणे म्हणाले की, मी बैठक घेतली नसली, तरी माझे प्रत्येक घटकाकडे लक्ष होते. दूरभाषवरून मी विविध अधिकार्यांच्या संपर्कात होतो, त्यामुळे माझे सोलापूरकडे दुर्लक्ष होत होते, असे नाही.