कोरोना लसीकरण झालेल्या विक्रेत्यांनाच महापालिकेकडून घरपोच विक्री करण्यासाठी ‘पास’

सांगली, २१ एप्रिल – दळणवळण बंदीच्या काळात जे विक्रेते आणि व्यावसायिक यांना घरपोच विक्रीची सेवा द्यायची आहे आणि ज्यांचे वय ४५ वर्षांपेक्षा अधिक आहे त्यांचे कोरोना लसीकरण झालेले असणे अत्यावश्यक आहे. ज्यांचे वय ४५ वर्षांपेक्षा अल्प आहे, त्यांची ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणी ‘निगेटिव्ह’ असेल त्यांनाच घरपोच विक्रीसाठी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेकडून ‘पास’ देण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात बंदी असूनही जे नागरिक सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडतात, अशांचे महापालिकेच्या वतीने २१ एप्रिलपासून ‘अँटिजेन टेस्टींग’ चालू करण्यात आले आहे. यामुळे अकारण फिरणार्‍यांवर चाप बसणार असून कुणी कोरोनाबाधित असल्यास त्याचा फैलाव न होण्यासाठी साहाय्य होणार आहे.