निगडी प्राधिकरणातील बनावट अधिकार्‍याकडून अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक !

पिंपरी – निगडी प्राधिकरणमध्‍ये ‘सब डिव्‍हिजन’ अधिकारी असल्‍याचे सांगून मुंबईतील एका व्‍यक्‍तीने अनेकांना लाखो रुपयांना फसवले. नवाज देशमुख यांनी केलेल्‍या तक्रारीवरून तुषार थिगळे याच्‍यावर गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. आरोपीने ‘सब डिव्‍हिजन’ अधिकारी असल्‍याचे बनावट ओळखपत्र सिद्ध केले होते. ते दाखवून त्‍याने देशमुख यांच्‍याकडील अलिशान मोटारी भाड्याने द्यायचा असल्‍याचे सांगून स्‍वतःकडे घेतल्‍या होत्‍या. काही दिवस मोटारींचे भाडे देऊन त्‍याने देशमुख यांचा विश्‍वास संपादन केला; मात्र त्‍यानंतर काही मासाने भाडे न देता देशमुख यांची ११ लाख ६० सहस्र रुपयांची फसवणूक केली. याचसमवेत काही जणांची ‘जुन्‍या गाड्या स्‍वस्‍तात देतो’, असे सांगून फसवणूक केली, तर इतर दोन तरुणांची रेल्‍वेत चांगल्‍या पदावर नोकरी लावून देतो, असे आमीष दाखवून फसवणूक केली.

(इतरांची फसवणूक करून धन अर्जित करण्‍याची समाजाची मानसिकता होत जाण्‍याला पोलिसांचा गमावलेला धाक कारणीभूत आहेच. त्‍याचसमवेत धर्मशिक्षणाचा अभावही कारणीभूत आहे. ते देण्‍यासाठी प्रशासन प्रयत्न करावेत. जेणेकरून समाजातील गुन्‍हेगारी रोखता येईल. – संपादक)