मुंबई – सध्या राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे; मात्र त्याचा अपेक्षित लाभ होतांना दिसत नाही. अनेक व्यापार्यांचा दळणवळण बंदीला विरोध होता; मात्र आता व्यापारी, जीवनावश्यक वस्तूंचे वितरक आणि अन्य लहान दुकानदार १०० टक्के दळणवळण बंदीची मागणी करत आहेत. आम्ही मुख्यमंत्र्यांना याविषयी माहिती दिली आहे. ते संबंधितांशी चर्चा करून निर्णय घेतील. येत्या २ दिवसांत कडक दळणवळण बंदीविषयी निर्णय अपेक्षित आहे, असे प्रतिपादन राज्याचे साहाय्य आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी १९ एप्रिल या दिवशी पत्रकार परिषदेत केले.
या वेळी विजय वडेट्टीवार म्हणाले की,
१. कोरोनाच्या दुसर्या लाटेचे अनुमान चुकले. सर्वांना ही लाट सौम्य असेल, असे वाटत होते; मात्र ही लाट तीव्र निघाली.
२. देहली येथे कडक दळणवळण बंदी केली असून त्याची माहिती आम्ही घेत आहोत. दळणवळण बंदी कशी आहे ? त्याची नियमावली काय आहे ? यावर चर्चा करण्यात येणार आहे.
३. कोरोनाच्या लढाईसाठी शासनाने ५ सहस्र ५०० कोटी रुपये राखीव ठेवले आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आरोग्ययंत्रणा बळकट करायची असेल किंवा ‘रेमडेसिविर’, ऑक्सिजन आणि खाटा यांचे प्रमाण वाढवायचे असेल, तर त्यासाठी ३ सहस्र ३०० कोटी रुपये इतका व्यय आणि आमदारांना १ कोटी रुपये व्यय त्यांच्या निधीतून करायचा आहे.
४. केंद्र सरकारने ‘एस्.डी.आर्.एफ्.’मध्ये कोरोनावरील उपचारांसाठी पैसे दिलेले नाहीत. ही टीका नाही; पण विलंब झाला आहे. यावर्षी केंद्र सरकारकडून १ सहस्र ६०० कोटी रुपये अपेक्षित आहेत.
कोरोनाच्या युद्धजन्य स्थितीवर चर्चेसाठी संसदेचे २ दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवा ! – संजय राऊत, खासदार, शिवसेना
मुंबई – देशात सर्वत्र कोरोनामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. सध्या सगळीकडे गोंधळ आणि चिंतेचे वातावरण आहे. देशात युद्धजन्य आणि अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी खाटा, ऑक्सिजनचा साठा, तसेच उपचारांसाठी लागणार्या औषधांचा तुटवडा जाणवत आहे आणि लसही उपलब्ध नाही. या अभूतपूर्व परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी संसदेचे २ दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवा, अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत केंद्र सरकारकडे केली आहे.