काळा ओढा फुटल्‍याने लाखो लिटर प्रदूषित पाणी थेट पंचगंगेत !

निष्‍क्रीय आणि दायित्‍वशून्‍य प्रदूषण मंडळ !

इचलकरंजी (जिल्‍हा कोल्‍हापूर) – टाकवडे वेस येथील सांडपाणी प्रकल्‍प नादुरुस्‍तीच्‍या कारणास्‍तव वारंवार बंद ठेवला जातो. त्‍यामुळे या प्रकल्‍पातील लाखो लिटर प्रदूषित पाणी प्रतिदिन काळ्‍या ओढ्याच्‍या माध्‍यमातून मार्गक्रमण करत थेट पंचगंगा नदीत मिसळते. यामुळे पंचगंगा नदी प्रदूषित होऊन नागरिकांचे आरोग्‍य धोक्‍यात आले आहे.

(अनेक वेळा सांडपाणी पंचगंगा नदीत मिसळल्‍याने नदी प्रदूषित होत असल्‍याच्‍या घटना घडल्‍या आहेत. तरीही प्रदूषण मंडळ कागदी घोडे नाचवण्‍याच्‍या पलीकडे काहीच करत नाही ! तसेच ‘गणेशोत्‍सवात नेहमी प्रदूषण होते’ म्‍हणून गळा काढणारे कथित पर्यावरणवादी आता कुठे आहेत ? का त्‍यांना केवळ हिंदूंच्‍या उत्‍सवातील प्रदूषण दिसते ? – संपादक)
या संदर्भात एका सामाजिक कार्यकर्त्‍याने तक्रार केल्‍यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्‍या अधिकार्‍यांनी नुकतेच प्रदूषित पाण्‍याचे नमुने घेतले, तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रक्रिया केंद्राची पहाणी केल्‍यावर तातडीने ठेकेदाराने नादुरुस्‍त असलेले प्रक्रिया केंद्र चालू केले आहे. पावसाळ्‍यात तथा हिवाळ्‍यात नदी प्रवाही असल्‍याने नदी प्रदूषणाची तीव्रता तेवढ्या गांभीर्याने जाणवत नाही, उन्‍हाळ्‍यात मात्र ती प्रकर्षाने जाणवते.

पंचगंगा नदी ही कोल्‍हापूरपासून इचलकरंजीपर्यंत प्रदूषित असण्‍यास अनेक घटक कारणीभूत आहेत. त्‍यांना उत्तरदायी धरून दोन मासांपूर्वी इचलकरंजी शहर आणि परिसरातील १७ उद्योगांना बंदीची आणि ३३ उद्योगांना ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावण्‍यात आली होती, तर १२ उद्योगांची वीजजोडणी तोडण्‍यात आली होती. इतके सगळे होऊनही सांडपाणी थेट नदीत मिसळत असल्‍याने नदीचे प्रदूषण रोखण्‍यात अपयश येत असल्‍याचे दिसून येत आहे.