गुढीपाडव्‍याच्‍या निमित्ताने सोलापूर येथे ‘ऑनलाईन’ पद्धतीने सामूहिक नामजप सोहळ्‍याचे आयोजन

जिल्‍ह्यातील ४१० हून अधिक जिज्ञासूंनी घेतला लाभ

सोलापूर, १९ एप्रिल (वार्ता.) – सनातन संस्‍था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने गुढीपाडव्‍याच्‍या निमित्ताने ‘ऑनलाईन’ (संगणकीय प्रणालीद्वारे) पद्धतीने सामूहिक नामजप सोहोळ्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते. या सोहळ्‍याचा ४१० हून अधिक जिज्ञासू आणि धर्मप्रेमी यांनी लाभ घेतला. या सोहळ्‍यामध्‍ये सनातन संस्‍थेच्‍या कु. दीपाली मतकर यांनी श्रीरामाची मानसपूजा सांगितली. त्‍यानंतर श्रीरामाची आरती करण्‍यात आली. हिंदु जनजागृती समितीचे श्री. दत्तात्रय पिसे यांनी परात्‍पर गुरु (डॉ.) आठवले यांनी गुढीपाडव्‍याच्‍या निमित्ताने दिलेल्‍या संदेशाचे वाचन केले. या वेळी हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेसाठी प्रतिज्ञा करून सांगता करण्‍यात आली.

या वेळी श्रीरामाचा सामूहिक नामजप करण्‍यात आला. उपस्‍थित जिज्ञासू आणि धर्मप्रेमी यांनी हा नामजप करतांना आलेल्‍या अनुभूती सांगितल्‍या. त्‍या अनुभूतींचे विश्‍लेेषण हिंदु जनजागृती समितीच्‍या श्रीमती अलका व्‍हनमारे यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धर्मप्रेमी श्री. विक्रम लोंढे यांनी केले.

नामजपाच्‍या वेळी सहभागी झालेल्‍या जिज्ञासूंना आलेल्‍या वैशिष्‍ट्यपूर्ण अनुभूती

१. श्री. गणेश पाटील – सामूहिक नामजप केल्‍यामुळे आनंद जाणवला. मन एकाग्र झाले. नामजप चालू असतांना आणि झाल्‍यानंतर हलकेपणा जाणवला.

२. श्री. ऋतुराज आर्शिद – जप करण्‍यापूर्वी वातावरण अगदी दमट किंवा उष्‍ण होते, ते नामजपाला प्रारंभ झाल्‍यानंतर श्रीरामाच्‍या नाम शक्‍तीने अतिशय आल्‍हाददायक आणि शितल झाले होते. नामजप करण्‍यासाठी आम्‍ही घरातील सर्व कुटुंबीय एकत्र बसलो होतो. नामजप करतांना पुष्‍कळ प्रसन्‍न वाटले.