डासना मंदिराचे महंत यति नरसिंहानंद यांनी महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केल्याचे प्रकरण
घटनेनुसार कोणत्याही धर्माच्या विरोधात बोलू नये, हे योग्य आहे; पण चित्रकार एम्.एफ्. हुसेन यांनी हिंदु देवतांची विडंबनात्मक चित्रे काढली, तेव्हा मुस्लिम जमात संघटना कुठे होती ?
मडगाव, १७ एप्रिल (वार्ता.) – गाझियाबाद येथील डासना मंदिराचे महंत यति नरसिंहानंद यांनी महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केल्याच्या प्रकरणी गोव्यातील ‘मुस्लिम जमात संघटने’च्या वतीने महंत यति नरसिंहानंद यांच्या विरोधात गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे, अशी माहिती ‘मुस्लिम जमात संघटने’चे प्रतिनिधी तथा भाजपचे अल्पसंख्यांक विभागाचे पदाधिकारी उर्फान मुल्ला यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना दिली.
उर्फान मुल्ला पुढे म्हणाले, ‘‘उत्तरप्रदेश येथील डासना मंदिराचे महंत यति नरसिंहानंद यांनी महंमद पैगंबर यांच्या विरोधात केलेली टीपणी स्वीकारण्यासारखी नाही. यामुळे जगातील सर्व मुसलमानांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. राज्यघटनेप्रमाणे कोणत्याही धर्माच्या विरोधात बोलायचा कुणालाही अधिकार नाही. सर्व धर्मांचा सन्मान केला पाहिजे.
‘मुस्लिम जमात संघटने’ने महंत यति नरसिंहानंद यांच्या कथित टिपणीच्या विरोधात गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार प्रविष्ट केली आहे. या प्रकरणी महंत यति नरसिंहानंद यांना कह्यात घेण्याची मागणी करण्यात आली आहे. महंत यति नरसिंहानंद यांनी प्रसिद्धीसाठी हा प्रकार केला आहे. याविषयी मी भाजपचे प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आदींकडे तक्रार करणार आहे. सरकारने हस्तक्षेप करून असे प्रकार बंद करणे आवश्यक आहे.’’