भोळ्या भावामुळे जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी केवळ भगवंतालाच पहाणार्‍या अन् अखंड भावावस्थेचे मूर्तीमंत उदाहरण असलेल्या पू. (श्रीमती) आनंदीबाई पाटीलआजी !

साधना शिकवून साधकांना जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त करणारी आणि संत बनवणारी सनातन संस्था

भोळ्या भावामुळे जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी केवळ भगवंतालाच पहाणार्‍या अन् अखंड भावावस्थेचे मूर्तीमंत उदाहरण असलेल्या डोंबिवली, ठाणे येथील सनातनच्या ५७ व्या संत पू. (श्रीमती) आनंदीबाई पाटीलआजी (वय १०० वर्षे) !

२६.११.२०१८ या दिवशी डोंबिवली (जिल्हा-ठाणे) येथील सौ. कपिला घाणेकर (सनातनच्या संत पू. (श्रीमती) आनंदीबाई पाटील यांची नात, मुलीची मुलगी) यांच्या निवासस्थानी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या कु. प्रियांका लोटलीकर यांनी पू. पाटीलआजी यांची मुलाखत घेतली. त्यांच्या संवादामधून पू. पाटीलआजींचे भगवंतमय झालेले भावविश्‍व आणि त्यांची अखंड भावावस्था यांचे दर्शन होते.

पू. (श्रीमती) आनंदीबाई पाटीलआजी

१. पू. पाटीलआजींचा भगवंतमय झालेला दिनक्रम

सौ. कपिला घाणेकर : पू. पाटीलआजी सकाळी उठल्यावर सर्वप्रथम देवाला नमस्कार करतात. नंतर त्या स्वतःच्या अंथरुणाच्या घड्या घालतात. त्या इतर कुणालाही अंथरुणाच्या घड्या घालू देत नाहीत. अंथरुणे कितीही जड असली, तरी त्या एकसारख्या घड्या घालून ठेवतात. त्या घड्यांकडे पाहून चैतन्य जाणवते. नंतर त्या मला अंघोळीसाठी पाणी द्यायला सांगतात. अंघोळ झाल्यावर त्या सूर्यनारायणाला नमस्कार करतात. अभंग म्हणतात आणि सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉक्टरांंशी बोलतात.

कु. प्रियांका लोटलीकर

१ अ. सूर्यदेवाला नमस्कार करणे

पू. पाटीलआजी : सूर्य उगवला की, ऊन पडते. इथे पुष्कळ प्रकाश पडतो. मग मी मोठ्याने म्हणते, सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर । आडवा डोंगर, तयाला माझा नमस्कार । देवा तुम्हाला नमस्कार ॥

मला सूर्य दिसला की, मी त्याला नमस्कार करते आणि म्हणते, ‘बघवतही नाही रे बाबा तुझ्याकडे. शांत होऊन बघ ना माझ्याकडे.’ मग जरासे शांत वाटते. नंतर मला देव दिसतात. देव दिसले नाहीत, तर मी एवढ्या जोरात नाम घेते, तरी ते दिसत नाहीत. तेव्हा ‘मी काय करू ? देवा, थोडे दिसा ना’, असे म्हणते. आकाशात सूर्यदेव उगवला की, माझी दृष्टी थांबते.

१ आ. पू. आजींचे देवाशी बोलणे : देवा, एक विचारते, ‘माझा भांग बरोबर आला आहे का ?’ बरोबर आला नसला, तर मला सांगा. हे बघा, मी फणी फिरवते. भांग बरोबर आला आहे का ? आता मी तुम्हाला विचारू नको, तर आणखी कुणाला विचारू ? येथे आहे तरी कोण ? मी तुम्हालाच विचारते. तुम्हीच मला सांगा, ‘कसा आला आहे भांग ?’ वाकडा आला असेल, तर मला सांगा. मी परत फणी फिरवते. (हे बोलतांना पू. आजी मध्येे मध्येे पुष्कळ हसतात.)

१ इ. भोळ्या भावाने देवाला चहा आणि अल्पाहार घेण्यासाठी बोलावणार्‍या पू. आजी !

सौ. कपिला घाणेकर : चहा आणि अल्पाहार आणला की, त्या प्रथम सर्व देवतांना बोलावतात, ‘या या देवा, बघा, काय छान केले आहे आज ! माझ्या आवडीचे आहे. तुमच्याही आवडीचे आहे. आपण सगळे मिळून खाऊया.’

१ ई. देवाला बोलावल्यावर ‘प्रत्यक्ष देव समोर दिसत आहे’, असे समजून देवाशी बोलणार्‍या पू. आजी !

पू. पाटीलआजी : देवा, तुम्ही सगळे जण या. तुमच्या आवडीचे आहे. मला तुम्ही हे आधीच दिले आहे. तुम्ही माझ्या मनातले जाणले. तुम्ही मला काय काय खायला देता ? तुम्हाला माझी पुष्कळ चिंता असते. मी नामाला बसले की, तुम्ही सर्व देता. देवा, तुम्हीही डोसे घ्या. सर्वांसाठी केलेे आहेत. सर्व देवतांनी यावे. तुमच्या आवडीचे आहे. या लवकर लवकर या ! गुरुदेवा, परम पूज्य, परम पूज्य…. देवा, तुम्हीही या. मी तुमची वाट बघते आहे. श्रीकृष्णासह तुम्हीही या. (पू. आजी हसतात.) देव आलेत बरं का ! हाक मारली की, ते नहमी येतात; पण बोलत नाहीत. देवा, आनंद झाला ना ? तुम्ही असे थांबा. माझे साधकही तुम्हाला बघतील ना ! ‘आजी खरे सांगते कि खोटे बोलते’, असे ते म्हणतील ना ? देवा, तुम्ही सर्वजण आलात ना ! मला पुष्कळ आनंद झाला. तुम्हाला जागा कमी पडतेय ना ? तुम्ही जवळ जवळ बसा, म्हणजे जागा होईल. राधाजी कृष्ण राधाजी कृष्ण ।

१ उ. पू. आजींनी सर्व देवतांना आग्रह करून जेवायला बोलावणे

पू. पाटीलआजी : देवा, घ्या आता. भोजन घ्या. देवा, या सगळे या भोजनाला. सर्वांसाठी केले आहे. देव आले आहेत. तेे बघत आहेत. देवा, मी बसले आता. देवा सर्वांनी या. मी आता गुरूंना वाढते. गुरुदेवा या. राधाजी कृष्ण राधाजी कृष्ण.

२. पू. आजींनी पहाटे ३ वाजता उठून नामजपाला बसणे आणि पुष्कळ वेळ नामजप केल्यावर त्यांना श्रीकृष्णाचे दर्शन होणे

पू. पाटीलआजी : एकदा मी घरातच पहाटे ३ वाजता नाम घेत होते. मला झोपच येत नव्हती. नंतर मी हळूच उठले. माझे बाबा, माझी आई आणि माझ्या सगळ्या बहिणी सर्व जण झोपले होते. मी इथेच अंथरुणावर बसले. तेव्हा मला ‘मी अंगणात बसले आहे’, असे वाटत होते. मी तेथेच नामजप करत बसले. नामजप करत पुष्कळ वेळ झाला. नंतर माझ्या बाबांना जाग आली. बाबा म्हणाले, ‘‘बाय, तू इथे काय करतेस ?’’ मी म्हणाले, ‘‘बाबा, मी नामजप करते.’’ तेव्हा बाबा मला ओरडायला लागले, ‘‘अगं, नाम काय घेतेस ? किती वाजले आहेत ? ते बघ ना आधी !’’ मी विचारले, ‘‘बाबा, किती वाजले आहेत ?’’ बाबा म्हणाला, ‘‘३ वाजले. तू झोप आता. बस झाले ते नाम.’’ मी म्हणाले, ‘‘बाबा, तुम्ही जा. मी झोपते.’’ मी उदबत्ती आणली. ती माझ्या अंगावरून आणि सर्व घरात फिरवली.

बाबा झोपल्यावर मी उठून बसले आणि पुष्कळ वेळ नामजप केला. नामजप केल्यावर श्रीकृष्ण आला आणि विमानासारखा गतीने गेला. तेव्हा एकदम हळदीसारखा पिवळा प्रकाश दिसत होता. तो माझ्याकडे बघत बघत गेला. मी त्याला नमस्कार केला. ही सर्व देवाची माया आहे गं !

३. पू. आजींना होणारे देवदर्शन

३ अ. पू. आजींनी ‘देवच नामस्मरण करतो’, असे सांगणे

पू. आजी : येथे देव येतात. देवाविना येथे कोण येईल ? मी नामाचीच (देवाचीच) आहे ना ? देवानेच मला नाम दिले आहे. तेच नाम घेतात. मी कशी नामजप करणार ? मी त्यांना सांगते, ‘दमला असाल नाम घेऊन.’ मी नाम घेत नाही. तेच घेतात.

३ आ. पू. आजींनी देवाचे विविध अवयव दाखवून त्यांचा रंग पिवळा असल्याचे सांगणे

कु. प्रियांका लोटलीकर : आजी, तुम्हाला भिंतीवर देव कुठे कुठे दिसतो ? ते मला दाखवता का ?

पू. आजी : हो. हा बघ. हे बघ डोळे आणि नाक. हे पूर्ण शरीर आहे. असा दिसतो गं देव ! इथे वर पुष्कळ आहेत हो देव ! छोटे छोटे दिसतात. हे बघ, सगळे एका रांगेत उभे आहेत. या रेघा दिसतात ना पिवळ्या ?

कु. प्रियांका लोटलीकर : त्यांचे रंग कसे दिसतात ? त्यांनी मुकुट इत्यादी घातलेले असतात का ? आणि ते किती आहेत ?

पू. आजी : इथे ३ आहेत आणि तिकडे २ देव आहेत. देवाचा रंग पिवळा आहे. त्यांच्या डोक्यावर मुकुट आहे. इकडे देवाचे तोंड आहे आणि हे डोळे आहेत. पटकन पाहिले तर दिसतात, नाहीतर ते जायला लागतात.

३ इ. ‘पू. आजींनी ‘देव बोलत नाही, देवाचे मुखदर्शन होत असून श्रीकृष्ण एकदाच बोलला’, असे सांगणे

कु. प्रियांका लोटलीकर : आजी, देव तुमच्याशी बोलतात का ?

पू. आजी : नाही. ते बोलत नाहीत. ते केवळ त्यांचे मुख दाखवतात आणि बारकाईने बघतात. विष्णुदेव माझ्याशी अजून बोलला नाही. एकदा आम्ही बाहेर गेलो होतो. तेव्हा श्रीकृष्ण एकदा माझ्याशी बोलला, ‘आनंदी, पुढे पाऊल टाकू नको. पुढे जाऊ नको.’ मी म्हणाले, ‘हो. का ? एकच पाऊल टाकते.’ मी एक पाऊल उचलले, तर मी तशीच पाठीमागे आले. एकदाच श्रीकृष्ण बोलला. आता तो भेटतो; पण बोलत नाही.

३ ई. पू. आजींना भिंतीकडे पाहिल्यावर सगळीकडे देव दिसणे आणि ‘देव पुष्कळ सुंदर दिसतात’, असे सांगून पू. आजींनी केलेले त्यांचे वर्णन !

कु. प्रियांका लोटलीकर : आजी, भिंतीवर कधी तोंडवळे दिसतात का ? मला दाखवा ना कुठे दिसतात ?

पू. आजी : तोंडवळे नेहमीच दिसतात. हे काय ? देव इथे आहे. तिथेही आहे.

कु. प्रियांका लोटलीकर : आजी, देव आहेत कि देवी ?

पू. आजी : मला वाटते, देवच आहेत ते. देवी असली, तर साडी असायला हवी ना ! देवी दिसत नाही. नेहमी देवच दिसतात. मी भिंतीवर बघितले की, माझ्या डोळ्यांपाशी देव येतात.

कु. प्रियांका लोटलीकर : तुमच्याकडे पाहून हसतात का ?

पू. आजी : कधी कधी हसतात. मी बघत राहिले की, ते हसतांना गप्पच रहातात. आता तेे मोठ्याने हसले. मी बघितल्यावर खाली मान घालून हसले. त्यांचे हसणे थांबले नाही; म्हणून माझे लक्ष गेले ना ! हे सर्व देवच आहेत. मला त्यांचा एकेक डोळा दिसत आहे. काय सुंदर दिसत आहेत देव ! त्यांच्या डोक्यावर मुकुट आहे.

३ उ. पू. आजींना लादीवर सर्वत्र देव दिसत असल्याने त्यांनी कुटुंबियांना लादीवर डोके ठेवून नमस्कार करायला लावणे

पू. आजी : मी बघते, तेथेच देव येतात. मी पाय टाकते, तेथे देव दिसतो. मी देवांवर पाय देऊन कशी चालू ? देवाच्या अंगावर माझा पाय पडतो. मी त्यांच्याकडे सारखी बघत रहाते. ते छान दिसतात.

सौ. कपिला घाणेकर : आजी मध्यंतरी काहीच खाली टाकू द्यायची नाही. आम्हाला चालतांनाही थांबवायची. ‘‘जाऊ नका. त्या लादीवर देव आहेत. त्या बाजूने चाला. भिंतीवरही देव आहेत.’’ ती मला सांगते, ‘‘बाय ये, इथे डोके ठेव. दर्शन द्यायला देव आलेत. बघ तुला आशीर्वाद मिळेल.’’ ती एवढ्या उत्स्फूर्तपणे सांगते. आम्हाला तर काही दिसत नाही; पण आम्ही पाया पडतो. आम्ही पाया पडल्यावर ‘आम्हाला देवाचा आशीर्वाद मिळाला’; म्हणून तिला समाधान वाटते. कधी ती कुतूहलाने विचारते, ‘‘मला एवढे देव दिसतात. तुला खरेच दिसत नाहीत की, तू खोटे सांगतेस ? तुलाही दिसत असतील.’’ मी म्हणाले, ‘‘आजी, आम्हाला खरंच देव दिसत नाहीत. तुला दिसतात. आम्ही तू सांगशील, तेथे नमस्कार करतो.’’

कु. प्रियांका लोटलीकर : साधनेचे चैतन्य असेल, तर सर्व कृती चैतन्याच्या स्तरावरच होतात. त्यामुळे त्यांना चराचरात देवच दर्शन देतो.

४. पू. आजींची भावावस्था

सौ. कपिला घाणेकर : कधी श्रीकृष्णाचे चित्र पाहून पू. आजींची भावजागृती होते. तेव्हा त्या भिंतींना मिठी मारतात. स्वतःचे डोके आणि गाल भिंतीवर घासतात. त्या देवाला पूर्णपणे शरण जातात. तेव्हा ‘देवच उभा आहे’, असे वाटते. त्यांची भावजागृती झालेली पाहून आपलाही भाव जागृत होतो. त्यांना पाहून वाटते, ‘देवा, यांना हे कसे काय जमते ?’ आपल्याला एवढे काही कळत नाही. ही लहानशी कृती आहे; पण ती त्यांची सवय आहे. कधी कधी त्या विसरतातही.

४ अ. आजींनी भावावस्थेत असतांना कृष्णाला उद्देशून केलेले काव्य !

काय पाहिजे तुम्हाला ? सांगून द्या आम्हाला ।
काय पाहिजे तुम्हाला ? सांगून द्या आम्हाला । (३ वेळा)
आकाशी चंद्र दिसतो रंजन, नको त्या मागत राहू बाळा रे गोपाळा ॥ (२ वेळा)

नको त्या मागत राहू बाळा रे गोविंदा ॥ १ ॥  (३ वेळा)

का होे श्रीकृष्णा घातल्या लोळणी ? ।
काय पाहिजे तुम्हाला सांगून द्या आम्हाला ॥ २ ॥

सूर्याच्या तारा दे माते आणूनी ।
नको त्या मागत राहू बाळा रे गोपाळा ॥ (२ वेळा) ॥ ३ ॥

देवा, ऊन नाही सहन होत आम्हाला ।
सांगा, सूर्याच्या तारा कुठून मिळणार तुम्हाला ? ॥ ४ ॥’

(क्रमशः उद्याच्या अंकात)


उत्तरार्ध वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/468972.html

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या /साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक